आज सकाळी ऑफिसला यायचा मुड नव्हताच.. पण घरी बसून काय करायचे हा पण तेवढाच महत्त्वाचा प्रश्न होता??? मग काय कसे बसे उठलो पेपर हातात घेऊन रमत गमत कसे बसे तयार होत होतो तेवढ्यात झेंडा चित्रपटातल्या गाण्यांची सिडी हातात आली. मराठीत हार्ड रॉक का काय तरी आणायचे असे अवधूत गुप्ते म्हणत होता ते एकूण उगाचच झेंडाची सिडी घेतली पण फार वेळेस काही ऐकणे झालेच नव्हते. गाणे ऐकत ऐकतंच घाई घाईत आवरले पाहतो तर घडाळ्यात ९ चा आकडा दिसला. पळत पळतच चार मजले उतरलो सोसायटीच्या बाहेर आलो.. उशीर झाल्यावर जे होते तेच ऑटो स्टॅण्ड वर एक पण ऑटो नाही. चार ऑटोंना मुलुंड चेक नाका विचारले एक पण यायला तयार नाहीच. खरे पाहता ठाण्याचा शेवटच्या टोकापर्यंत जायचंय तरीही हे रिक्षावाले का तयार होत नाहीत हे कळतच नाही. शेवटी कसा बसा ऑटोत बसलो.. कानात झेंडा चित्रपटातले ज्ञानेश्वर मेश्राम ह्याने गायलेले "झेंडा" हे गाणे अजूनही घोळत होतेच.
आपलीच माणसे आपलीच माती
तरी मेंढराला कळपाची भीती
विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती
खरच कोणता झेंडा घेऊन चालायचे हे एक कोडच आहे... ह्याच विचारात पोहचलो मुलुंड चेक नाक्याला.. हा चेक नाका म्हणजे मुंबई आणि ठाण्यातली हद्द. काही दिवसांनी इथे सामाना सोबत पासपोर्टही मागतील का काय... एक रिक्षा सोडून मुंबईच्या बाजूची रिक्षा पकडण्यासाठी चालत पुढे रिक्षा स्टॅण्ड पर्यंत आलो. इथेही रांग होतीच पाच मिनिटात रिक्षा मिळालीच साधारण अर्ध्या तासाचा रस्ता. रिक्षा सुरू होवून पहिला सिग्नल जेमतेम ओलांडला लगेच रिक्षावाल्याने टेप सुरू केला. रिक्षा मधल्या म्युझिक सिस्टम मध्ये एक जादू असते. काही गाणे केवळ रिक्शात वाजवण्यासाठी तयार केलेले आहेत की काय असे वाटावे असेच असतात. टेप सुरू झाला म्युझिक ऐकून गाणे ओळखायचा प्रयत्न केला आणि गाणे एकदम डोळ्या समोरच आले. काय सांगावे ह्या गाण्याबद्दल.. छायागीत आणि चित्रहार मध्ये हे गाणे तर वाजायचेच नेहमी. "जान तेरे नाम" चित्रपटातले "फर्स्ट टाइम देखा तुझे" ह्याचे गायक तर आठवत नाहीत पण रिक्शांत एकदम काहीतरी वेगळाच आनंद देऊन जात होते.
फर्स्ट टाइम देखा तुझे हम खो गया
सेंकड टाइम मे लव हो गया
ये अख्खा इंडिया जानता है हम तुम पै मरता है
दिल क्या चीज हे जानम जान तेरे नाम करता हे
ह्या गाण्याचा लुफ्त लुटल्यानंतर पुढचे गाणे कोणते असेल विचार करत होतोच.. त्यात अचानक ओळखीचे स्वर आले आणि सुरू झाले हसन जहांगिराचे हवा हवा. अरे काय जादू होती ह्या गाण्यात एका जमण्याला वेड लावले होते ह्या गाण्याने.. अर्थात रिक्शात ऐकायची मौज काही औरच.. कॅसेट नेहमी प्रमाणे घासलेलीच पण जर कॅसेट घासलेली नसेल तर रिक्शांत गाणे ऐकण्यात काय मजा??? पण हवा हवा जोरातच होते. खरे तर हा पाकिस्तानी कलाकार पण ह्यालाच भारतात पॉप गायकी पॉप्युलर करणारा मानला पाहिजे.
हवा हवा ए हवा खुशबू लुटा दे
कहा खुली हा खुली, जुल्फ बता दे
अब उसका पता दे, जरा मुझको बता दे
मै उससे मिलुंगा, एक बार मिला दे
यार मिला दे, दिलदार मिलादे
गाण्याचा शेवटी शेवटी कॅसेट अडकत होतीच.. रिक्षावाल्याने काहीतरी केले आणि पुढचे गाणे सुरू झाले. हे पण एक रिक्षा स्पेशल गाणे... मोहरा चित्रपटातले " ना कजरे की धार"... साधना सरगम आणि पंकज उदास ह्यांनी गायलेले हे गाणे ऍनादार रिक्षावाला'स फेवरीट...
ना कजरे की धार, ना मोतियोंका हार
ना कोई किया सिंगार, फिर भी कितनी सुंदर हो
मन मै प्यार भरा, और तन मैन प्यार भरा
जीवन मै प्यार भरा, तुम तो मेरे प्रियवर हो
जेम तेम हे गाणे सुरू होते आणि पुढच्या चौकातला पोलिस हवालदार पाहून रिक्षावाल्याने गाणे बंद केले. तो चौक गेल्या नंतर साधारण पाच एक मिनिटाने मीच त्याला गाणे सुरू कर म्हणून सांगितले. पुढचे गाणे असेच एक गाणे दिलवाले चित्रपटातले गाणे "इक ऐसी लाडकी थी" कुमार सानू ह्यांनी गायलेले गाणे नेहमीच रिक्शांत ऐकायला मिळते.
जिता था जिसके लिये, जिसके लिये मरता था
एक ऐसी लाडकी थी जिसे मै प्यार करता था.
हे गाणे संपायच्या आतच आमची कॅसेट अडकली... ती बाहेर काढण्याचा नादात रिक्षावाल्याकडून तुटली पण... ऑफिस जवळ आले होते. पण अशी कॅसेट खराब होवून हा प्रवास संपणे काही केल्या मनाला पटत नव्हते.. आज रिक्शात बसल्या बसल्या ही गाणी मला एका वेगळ्याच आठवणीत घेऊन गेली..निदान माझा कंटाळा तरी घालवला. तर सांगा मंडळी तुमची रिक्शातल्या स्पेशल मुजिक सिस्टम वर ऐकायची आवडती गाणी कोणती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा