काल झालेल्या मतमोजणीत नव्याने स्थापन झालेल्या जनशक्ती पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांपैकी १९० जागा जनशक्ती पक्षाला मिळाल्या आहेत. साधारण तीन वर्षापुर्वी हा पक्ष अस्तित्वातच नव्हता पण गेल्या वर्षी झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत ह्या पक्षाने चांगलाच जोर दाखवला होता. पक्षाच्या नेत्याची निवड लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सदस्य करतील असे प्रतिपादन पक्षाध्यक्ष राजेश पवार ह्यांनी केले. महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण हे उद्या संध्याकाळ पर्यंत स्पष्ट होईल. पक्षाध्यक्ष राजेश पवार यांनी स्वतः मुख्यमंत्री होणार नसल्याचेही इथे आज स्पष्ट केले.
नव्या सरकारच्या शपथविधी साठी राजभवन सजले होते. शपथविधीचा मोठा सोहळा न करता एक साधासाच कार्यक्रम व्हावा अशी नवीन मुख्यमंत्र्यांची इच्छा होती. तरीही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहापुढे त्यांना थोडी माघार घ्यावी लागली होती. नव्या मुख्यमंत्र्यांशी बोलण्यासाठी मिडिया वाट बघत होता. काल जनशक्ती पक्षाच्या निवडून आलेल्या आमदारांनी नेत्याची निवड केल्या पासून मिडिया त्यांच्याशी बोलायला वाट बघत होता. पण त्यांनी पहिली पत्रकारपरिषद शपथविधी नंतरच असे ठरवले होते. आज सकाळपासुनच ते वेगवेगळ्या बैठकीत गुंतलेले होते. मुख्यमंत्री म्हणुन निवड झालेली असली तरीही इतर मंत्री मंडळ ठरवण्यात बराच वेळ जात होता. जनशक्ती पक्षाचे १९० पैकी १७५ आमदार पहिल्यांदा आमदारकीची शपथ घेणार होते. नेता म्हणुन त्यांचे नाव जवळजवळ एकमुखाने सर्वांनी ठरवले होते. त्याला पक्षाध्यक्षांचाही विरोध नव्हताच कारण जनशक्ती पक्षाला महाराष्ट्रभर पसरविण्यात त्याच्या टीमचा फार मोठा वाटा होता. आज आता तो दिवस आला होता आणि त्यांचे सरकार स्थापनेचे स्वप्न पुर्ण होणार होते.
" मी निरंजन प्रमोद जोशी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणुन......." ही शपथ घ्यायला जेव्हा निरंजन उभा राहिला तेव्हा एक वेगळीच लहर सभागृहातुन उमटली...अनेक भुवया उंचावल्या गेल्या. एक २७-२८ वर्षाचा मुलगा, निळ्या रंगाची मळकी जीन्स, काळ्या रंगाचा कॉलर वाला टि-शर्ट खाली फ्लोटर्स असा त्याचा गेट अप पाहुन तर अनेक राजकीय समीक्षक तोंडात बोट घालायचेच बाकी होते. काल पर्यंत नेहमीच्याच खादीच्या वेषातल्या सत्ताधार्यांना बघणार्यांसाठी हा नविनच अनुभव होता. निरंजन पाठोपाठ १४ मत्र्यांनी शपथ घेतली. मंत्रीमंडळ छोट्यात छोटे ठेवण्याकडेच त्यांचा कल होता. शपथविधी नंतर लगेचच पत्रकारपरिषदेला सुरवात झाली. सगळ्या भाषेतल्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाने बरीच गर्दी केली होती. एक एक करुन पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारायला सुरवात केली.
पः- "कैसा महसुस कर रहे हो आप सी. एम. की कुर्सी मिलने के बाद?"
नि:- कैसा महसुस करना चाहिए??? अच्छा तो लगताही है
पर जनता की उम्मीदों पे खरे उतरने की चुनौती सामने है
पः- Mr. Joshi you are speaking of challenges... in the near feature what challenges you see infron of the goverment??
नि:- Challenges are many more... but we see corruption,drought, suicides by farmers, lack of infrastructure are some of the challenges we need to address on a short term as well as on a long term basis.
अशा प्रकारे एक एक प्रश्न त्याच्या समोर येत राहिले तो उत्तर मोकळेपणे देत राहिला, शेवटी जाता जाता एका प्रश्न मात्र त्याला विचारात पाडून गेला.....
पः आपण राजकारणा कडे का वळलात??? कसे वळलात हे थोडक्यात सांगता येईल का???
नि:- राजकारणा कडे वळण्याचे मुख्य उद्दिष्ट होते समाजासाठी काही तरी करणे. माझ्या आजूबाजूला असंख्य प्रॉब्लेम्स असताना मी फक्त सिस्टमलाच दोष देत राहियचो... ही सिस्टम आम्ही तरुण लोक बदलणार नाहीत तर कोण बदलणार??? ह्याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याकरीता राजकारणात आलो आहे. बघूयात किती यशस्वी होतो ते!!!! बाकी राजकारणा कडे कसे वळलो हे सांगणे जरा अवघडच आहे. अहो राजकारणातुन ५५ वर्षी निवृत्ती स्विकारल्यानंतर मला एखादे पुस्तक लिहिण्यासाठी काही तरी राहू द्या हो!!!
असे म्हणताच सभागृहात थोडासा हशा पिकलाच... पण तो प्रश्न निरंजनला आठवणीत घेउन गेला खरा!!! तसाच तो त्याच्या खोलीवर परत आला... अजून तो सरकारी बंगल्यात रहायला गेला नव्हता. आणि आठवले त्याला ते दिवस सहा सात वर्षां पुर्वीचे............
======================================================
निरंजन जोशी... औरंगाबादचा.... इतर अनेक तरुणांप्रमाणे आपल्या आईवडीलांबरोबर रहात होता. सर्वसाधारण मध्यमवर्गीय घरात जसे वातावरण असते तसेच त्याच्याही घरात होते. वडील सरकारी नोकरीत, आई गृहिणी, मोठी बहीण डॉक्टर झालेली आणि हा नुकताच इंजिनिअरिंगची परीक्षा पास झालेला!!! त्यात घरच्यांची चिंता मिटवणारी बाब म्हणजे आधीच एका मोठ्या आय टी कंपनी मधे याची निवड झालेली. ज्या दिवशी निरंजनची ह्या कंपनीत निवड झाली त्यावेळेस बाबांना स्वर्ग दोन बोटच उरला होता. आपण आयुष्य भर सरळमार्गी राहिलो तरी मुलांना मोठे करु शकलो.. त्यात कमी पडलो नाही.. असा मध्यमवर्गीय विचार त्यांना सुखावत होताच!!! तर तशातच एक दिवस निरंजनला मुंबईला त्याच्या कंपनी मधे जॉइन होण्याचे पत्र आले!!!
======================================================
निरंजन आठवू लागला तो दिवस... बाबा किती टेन्शन मधे होते ना मी मुंबईला जाणार म्हणून... घरातून पहिल्यांदाच बाहेर रहाणार होतो मी..... त्यामुळेच जास्त चिंता होती!!! तसेच निघालो मुंबईला जायला... काहि नविन मित्र मिळणार... भरपूर काम करायचे... पैसा कमवायचा... हे सामान्य स्वप्न घेऊन घरातून निघालो...!!! तसे मेडिकल टेस्ट च्या वेळेस भेटलेले मित्र तिथे पण सोबत येणारच होते. सि एस टी स्टेशनावर साधारण तासा भराच्या अंतराने त्यांच्या पण गाड्या येणार होत्याच. तसे म्हणाल तर, आत्ता पर्यंत मित्र म्हणण्यासारखी आमची ओळख सुद्धा नव्हती. आमची भेट ती काय फक्त मेडिकल टेस्टच्या वेळेस झाली होती. त्यातला अभ्या म्हणजेच संग्रामसिंह कदम लातूरचा पण औरंगाबादहूनच इंजिनिअरिंग केले असल्यामुळे माझ्या आधी पासून ओळखीचा...
सि एस टि स्टेशनावर सकाळी सकाळी उतरलो... तसे जॉइनिंग दुसर्या दिवशी होते... रविवारचा दिवस असल्यामुळे गर्दी तशी कमीच होती. पण नेहमी प्रमाणे बाहेरगावच्या गाड्यांकडुन लोकलकडे पळणार्यांची गर्दी होतीच. स्टेशनवरच्या अनाउंसमेंट चालूच होत्या... मी उतरुन सामान साईडला घेऊन कुठे यांची वाट बघायाची याचा विचार करतच होतो.... तोच दोन पोलिस माझ्या दोन्ही बाजूला आले... आणि सरबत्ती सुरु केली....
"क्योंबे??? कहाँ से आये हो??"
" काय झाले साहेब??? हे काय ह्या समोरच्या देवगीरी एक्स्प्रेस मधून उतरलो आत्ता.. औरंगाबादहून आलोय."
" मुंबईत कशाला आला आहेस??"
"साहेब या या कंपनीत नोकरी लागली आहे."
"मग ह्या बॅग मधे काय बॉम्ब आहेत काय???"
" नाही हो साहेब, ह्यात माझे कपडे आहेत फक्त"
" चल बॅग उघड, आम्हाला तपासायचे आहे, तसेही हे औरंगाबाद म्हणजे अतिरेक्यांचे केंद्रच आहे"
" हे बघा साहेब, ह्या बॅगेत कपड्यांशिवाय काहीच नाहीए हो... "
त्या दोघांनी माझे सगळे कपडे उलथेपालथे करुन टाकले...
" तुला नोकरी लागली आहे ना, मग कंपनीचे आयकार्ड आहे का तुझ्या कडे???"
मला कळतच नव्हते काय चाललं होतं ते!!!!
"साहेब मी काही केलेले नाही हो"
" गप्प बैस! जेवढे विचारले तेवढे सांग!!!"
" साहेब आय कार्ड तर नाही पण कंपनीने दिलेले पत्र आहे"
ते पत्र त्याने वाचले निदान वाचण्याचे नाटक केलं.....
"चल ५० रु काढ नाही तर तुला आत टाकून देईन"
" पण साहेब माझे चुकले काय??"
"जास्त आवाज नको करु"
मी विचार केला प्रकरण वाढवण्यात काहीच पॉईन्ट नाही तेव्हा यांना ५० रुपये देऊन टाकू....
"हे घ्या साहेब " असे म्हणुन ५० रुपये देताच दोघेही खुश होऊन निघुन गेले पण माझ्या समोर उभा राहिला एक प्रश्न!!!!!
" पुढे काय???"
" मुंबईने स्वागत तर चांगलेच केले आपले आता बघूयात पुढे काय काय वाढुन ठेवले आहे??"
(क्रमशः)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा