कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, फेब्रुवारी १५, २०१०

हे बंध रेशमाचे..२

असाच एका विकेंडला आपला चिल्का सरोवर बघायला जायचा प्लॅन होता.... सकाळी मला लवकर उठवायचे कठिण काम तूच फोन करुन केले होतेस. बस तुमच्या बिल्डिंग जवळून सुटणार होती. मी सगळे आवरुन धावत पळतच पोहचलो होतो... बस मधे चढलो तर नेहमी प्रमाणे तु तुझ्या बाजुच्या खुर्चीवरची बॅग उचलून घेतलीस.. नेहमी पेक्षा आज तू वेगळीच वाटत होतीस... बस सुरु झाली आणि एक एक करुन गाणे बजावणे सुरु झाले... बस मधे काय दंगा घातला होता आपण..!!! त्यात सगळ्यात पुढे आपणच दोघेजण होतो हा भाग वेगळा..... मी माझ्या भसाड्या आवजात "प्रथम तुज पाहता" गायला लागताच तुझे ते हसणे आणि नंतर ते लाजणे आजही मला चांगलेच आठवते.... ह्या गाण्याचा वेळेसच मी ठरवले आजच तुला विचारायचे... आपण चिल्काला पोहचलो तिथे मोठ्या बोटीत बसुन डॉल्फिन बघुन आलो.. आणि नंतर कुणीतरी पायडल बोटिंगला जायचे असे ओरडले आणि मग सगळेच तिकडे निघालो... आपण तिथे पोहचेपर्यंत तिथल्या चार माणसांच्या पॅडल बोटस् सगळ्यांनी ढापल्या.. नि आपल्यासाठी दोन लोकांचीच बोट शिल्लक राहिली... न ठरवताच बर्‍याच गोष्टी मला हव्या तशा घडत होत्या!!! नेहमी प्रेमाणच तू तिथे खुललेली होतीस... आपण किनार्‍यापासून बरेच लांब आल्या नंतर अचानक मी बोट थांबवली... तुझ्याकडे बघुन हसलो... अभावितपणे तू पण हसलीस.. मग हळूच मी तुला म्हणालो.. मला तुला काही सांगायचे आहे.... तु अचानक शांत झालीस.. "मी तुझ्यावर प्रेम करतो"!!! तू आधी एक मंद स्मित केलेस आणि म्हणालीस,"चल रे जाउयात" तू उत्तर द्यायचे टाळलेस.. मी परत विचारले तरी उत्तर दिले नाहीस.. आपण तिथून परत निघुन बस मधे परतलो तरी तू शांतच होतीस... परतीच्या प्रवासात आपण एकदाही एकमेकांशी बोललो नाही.. दुसर्‍या दिवशी सकाळी ऑफिसला जाताना बस मधे चढलो पण तुझ्या बाजुला माझ्यासाठी जागा नव्हती... आपण ग्रुप मधे सोबत असायचो पण तू माझ्याशी बोलायचे टाळायचीस... आपल्या ट्रेनिंगच्या शेवटच्या दिवशी मात्र तू माझ्याशी बोलायला आलीस.. "माझे प्रेम म्हणजेच सगळे काही आहे असे समजु नकोस.. मला प्रेमात पडणे शक्यच नाही... मला माझ्या घरच्यांच्या मनाप्रमाणेच लग्न करायचे आहे" एवढे सांगून तू निघून गेलीस.
ट्रेनिंग नंतर आपण सगळेच मुंबईत आलो... पहिल्याच दिवशी आपल्याला वेगवेगळे प्रोजेक्ट्स मिळाले... त्यामुळे आपला कॉन्टॅक्ट कमी झाला.. आधी तू माझ्या आसपास तर असायचीस पण आता आपले भेटणे केवळ एखाद्या विकेंडला जेव्हा सगळा ग्रुप जमायचा तेव्हाच.. त्यातही तुझा मला टाळण्याच प्रयत्न असायचा... कधीच तू मला बोलायची संधी दिली नाहीस.. तसे मला तुझ्या बद्दल इतरांकडून कळायचे.. पण अजुनही तुझ्या कडुन मला समाधानकारक उत्तर मिळालेच नाही. असेच दिवस जात होते आपल्या भेटी कमी होत होत्या... त्यातच आला तुझा वाढदिवस... खरे तर तुला भेटायची खुप इच्छा होती पण शक्य होईल असे मला वाटतच नव्ह्ते.. पण अजुन एक प्रयत्न म्हणुन मी तुला पुष्पगुच्छ पाठवायचे ठरवले... पुजाशी बोलुन मी एक बुके तुझ्या रुमवर पाठवला... तो पुजानेच रिसिव्ह केला.. तु घरी नव्हतीसच... संध्याकाळी घरी आल्या आल्या तुझा मला फोन!!! जाम चिडली होतीस... मी का बुके पाठवला??... तुला विसरुन जा वगेरे अनेक वेळा सांगितले... ह्या पुढे तुझ्याशी कोणताही संपर्क ठेवू नको असे पण सांगीतले... फार खचलो होतो गं मी...!!!

पुढे एक वर्ष आपला कोणताही कॉन्टॅक्ट नव्हता... खरे तर ठेवू नये अशी तुझीच इच्छा होती... तुझ्या पुढच्या वाढदिवसापर्यंत मी तुझ्याशी काहीच संपर्क ठेवला नव्हता... तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी पुजाचा मला फोन आला... "काय प्रेमवीर, आज पाठवणार का बुके???" असा खोचक प्रश्न विचारला.. खरे तर मला आता फारशी आशा उरलीच नव्हती.. पण पुजाच्या सांगण्यावरुन मी तुला बुके पाठवला... ह्यावेळेस दिवसभर फोन वर असल्यामुळे मी तुझा फोन नाही घेऊ शकलो... तु खुप चिडली असणार.. त्यांना कसे फेस करायचे हे मला कळत नव्हते.. शेवटी हिंमत करुन तुला फोन लावला... ह्या वेळेस तू खुप शांत असल्याचे तुझ्या पहिल्याच वाक्यात जाणवले... "मी का तुझ्यावर प्रेम करावे??? मी तर तुला नीट ओळखतही नाही... मग तुझ्याशी लग्न करायचा निर्णय कसा घेणार??? " असे काहीसे तुझे प्रश्न होते... माझ्या उत्तराने तुझे समाधान होत होते का हे मला कळत नव्हते... पण शेवटी आपण एकमेकांना जाणून घ्यायचे आणि त्यानंतरच तू माझ्यावर प्रेम करू शकतेस का नाही हे तू मला सांगणार असे आपले ठरले!!!
आज तुझा वाढदिवस होऊनही आता तीन महिने झाले आहेत... त्यादिवसा पासून आपण रोजच भेटत आहोत...रोज रात्री किती तास फोन वर बोलणे होतंय याचा हिशेबच नाही.. तुझ्या सोबत घालवलेला क्षणन् क्षण मला आठवतोय.. कुठे कुठे नाही फिरलो आपण मुंबई मधे... पुजाच्या मते आता तू परत पहिल्यासारखी खुलली आहेस... या तीन महिन्यात आपण एकमेकांना खुपच ओळखायला लागलो आहोत... आता एक क्षणही मला तुझ्या शिवाय घालवणे शक्य नाहीय... आणि आपण पुढचे आयुष्य एकमेकांसोबत छान व्यतित करू शकतो हा विश्वास आता मला नक्कीच आहे. म्हणूनच आज ह्या प्रेमदिनी मी तुला परत एकदा विचारतोय...
"माझ्याशी लग्न करशील??? तु माझी होशील का???"
तुझाच वेडा!!!

एवढे लिहुन झाले, लवकर पाठवायला हवे आता....
अरे,आता अशा अवेळी कुणी बेल वाजवली असेल???? बारा वाजायला पाचच मिनिटे बाकी आहेत ... मला बाराच्या ठोक्याला पाठवायचे होते!!!
थोड्याशा अनिच्छेनेच दार उघडले तर माझ्यासाठी एक धक्का होता... मिड-नाईट बुके डिलेव्हरी... आणि त्या सोबत एक नोट...

"माझ्याशी लग्न करशील????"
तुझीच वेडी!!!

हे बंध रेशमाचे!!!

प्रिय सखे....

तू हे वाचे पर्यंत प्रेमदिन सुरु झालेला असेल... ह्या प्रेमदिनी मी आज हे प्रेमपत्र लिहित आहे. खरे तर ह्या नंतर तुझी रिअ‍ॅक्शन काय असेल ह्या भीतीने लिहायला हात धजावतच नाहीय पण आता याचीहि सवय होत आहे असेच म्हणावेसे लागेल... गेल्या तीन वर्षा पासुन आपण एकमेकांना ओळखतो... ओळखतो म्हणजे काय? मागचे तीन महिने सोडले तर आपले बोलणे फार कमीच व्हायचे. अर्थात त्याला कारण मीच आहे हे मला मान्य आहेच.. वागलोच होतो मी तसा... त्याची शिक्षा करतोय ना सहन गेले तीन वर्ष.. आता अजुन किती सहन करणार???? माझ्या समोर अजुनही तीन वर्षापुर्वीचीच तू डोळ्या समोर आहेस...

आपला नोकरीचा पहिला दिवस होता... एका लहानशा शहरातून इंजिनीअरिंग करुन मी ह्या मोठ्या कंपनीत नोकरीला लागलो होतो... अर्थात कँपस मधूनच नोकरी मिळाल्यामुळे फारसा प्रश्न नव्हता आला... "पापा कहतें हैं" सारखी आयुष्यासाठी अनेक स्वप्नं डोळ्यांत घेऊन घरातून निघालो होतो... पहिल्यांदाच बाहेर राहणार होतो... त्यात कंपनीने ट्रेनिंगला भुवनेश्वरला पाठवले होते... आजही तो पहिला दिवस स्पष्ट आठवतो आहे.. कंपनीने दिलेल्या राह्यच्या जागेवरुन प्रशिक्षण केंद्रावर मी लवकरच पोहचलो होतो... साधारण नेहमीचेच सगळे सोपस्कार सुरवातीला झालेच.. तेच कंपनीची ओळख करुन देणारे प्रेझेंटेशन आणि भरमसाठ जाँईनिंग फॉर्म्स.. मग हळू हळू प्रत्येकाची बॅच सांगण्यात आली... त्यात आमच्या कॉलेजचे कोणीच माझ्या बॅच मधे नव्हते... त्यानंतर पुढे त्यांनी आपल्या बॅच साठी सी. आर. होण्यास कोण उत्सुक आहे विचारले.... आधी तर कोणाचाच हात वर झाला नाही. मग अचानक मुलींच्या बाजुला लक्ष गेले तर एक गोरासा हात वर झालेला दिसला... त्या गोर्‍या हाताला मग स्टेजवर बोलवण्यात आले....होय तुझाच तो हात.... आजही आठवतेयस मला तु त्याच रुपात... मोरपंखी रंगाचा तुझा तो पंजाबी ड्रेस... मानेवर रुळणारे केस... कसे विसरु तुझे ते रुप... लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट का काय असेच झाले होते... आणि तु अगदी बिनधास्त स्टेजवर जाउन स्वत:ची ओळख करुन देत होतीस...काही सेकंद माझ्यासाठी जगच थांबले होते की काय??? तु जागेवर जाऊन बसे पर्यंत मी तुझ्याच कडे बघत होतो..

कार्यक्रम संपताना आजच्या दिवशीची उपस्थिती प्रत्येकाने सी आर कडे नोंदवायची होती... माझी नजर तुलाच शोधत होती.. आणि मग मी तुझ्याकडे आलो.. तेव्हा पहिल्यांदा तुला जवळून बघितले.... तुझ्या घार्‍या डोळ्यांनी तर मला घायाळच केले म्हणावे!!! त्या मोरपंखी ड्रेस वर मोरापिसाचे कानातले...अगदी आ वासून मी तुझ्या कडे पहात होतो.. कदाचित ते तुझ्या लक्षात आलेही असावे...सगळ्यांची तुझ्याकडच्या कागदावर सही करुन झाली तरी मी तसाच उभा होतो.. शेवटी तूच माझ्या समोर आलीस आणि माझ्या हातात तो कागद दिला "Please sign this"... सही करत असतानाही माझे लक्ष तुझ्याकडेच होते म्हणा... सहीचा कागद तुझ्या हातात देताना आपली नजरा नजर झाली आणि तु माझ्या कडे बघुन गोड हसलीस... अगदी हृदयात कळ यावी असेच होते ते हसू.... आणि त्यानंतर "जोशी, माझ्या कडे बघणे झाले असेल तर वर्गा कडे चला!!!" हा टोला तर खासच होता...
त्यानंतरचे काही दिवस असेच गेले.. म्हणजे आपली ओळख तर झाली होती... आपण योगा योगाने एकाच ग्रुप मधे आलो होतो.. एकाच ग्रुप मधे असल्या मुळे रोज ट्रेनिंग संपल्या नंतर आपण एकत्र असायचो... हळु हळु बोलणेही वाढत होतेच.. ओळखीचे रुपांतर मैत्रीत होत होते... माझ्या प्रत्येक दिवसाची सुरवात तुला एस एम एस करुनच व्हायची आणि शेवट तुझ्याशी फोनवर बोलतच व्हायचा. आपल्या मैत्रीबद्दल आपल्याच ग्रुप मधे अनेक लोकांना आश्चर्य वाटायचे... तुझी तर अखंड बडबड चालू असायची... तुलाही माझ्यासोबत वेळ घालवणे आवडायचे असे वाटायला लागले होते.. त्यात रोज रात्रीच्या त्या कॉफीशॉप मधल्या गप्पा.. तू तुझ्या शेजारची जागा माझ्यासाठी वर्ग, कॉफीशॉप प्रत्येक ठिकाणी राखून ठेवणे.. ह्या सगळ्यांनी मी खरे तर सुखावतच होतो... साधारण महिना भर हे असेच चालले असेल, अगदी आपल्या चिल्का च्या ट्रिप पर्यंत....
(क्रमशः)

वावटळ

आज नेहमी प्रमाणे एक प्रश्न माझ्या मनात रेंगाळत आहेच... कुठे जायचे.... खरे तर ह्या प्रश्नाचे उत्तर मला माहीत नाहिये कारण निरर्थक भटकायचे म्हणूनच मी घरातून निघालेए??? आता मला खरंच कळत नाहिए का घराबाहेर पडले आहे???.... असे काय घडले आहे आज??? "आज"... आताश्या तर हे रोजचेच झाले आहे, कंटाळा आला आहे ह्या जगाचा... वाटते सगळे संपवावे!!! पण त्यातून काय हशील होणार??? का मी हे जीवन संपवावे??? त्यातून मला काय मिळणार??? त्रासातून सुटका होईल... बरे ज्यांचा कडून त्रास दिला जातोय ते कोण आहेत तर माझे सगेसोयरे... का हे लोक मला समजावून घेऊ शकत नाहीत...

लग्नाचे वय ओलांडले तरी माझे लग्न जमत नाही ह्यात माझा खरे तर काय दोष???? पण हे कोणीही समजावून घेत नाही... समाजात लग्न न करिता राहणे हे स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या मुलीला एवढे अवघड आहे का??? आज मी नवऱ्या नावाच्या प्राण्याशिवाय जगू शकते हा विश्वास नक्कीच माझ्या मध्ये आहे. पण घरचे.. त्यांनी हे समजावून घ्यायला नको का??? आईने कष्ट करत सौंसाराचा डोलारा सांभाळला... तीच्या कष्टामुळेच आज मी शिकून मोठी झाले आहे... जे काही आहे ते फक्त आणि फक्त तीच्याच मुळे.... पण आजकाल तीही विचित्र वागायला लागलेली आहे.... दिवसातून ४ वेळा फोन करून विचारते त्या मंत्राचा जप केलास का??? मंत्र कोणी दिला तिला हा??? आणि का सांगितले की ह्या मंत्राच्या पठणाने माझे लग्न जमणार आहे???? सगळे सांगतात लग्न जमण्यासाठी पोरीच्या जातीने थोडे तरी ऍडजस्ट करायला पाहिजे!!!! आहो पण किती??? आणि काय काय म्हणून??? माझ्या पेक्षा वयाने मोठा असलेला मुलगा जेव्हा तोंड वर करून मला विचारतो माझे लग्न का झाले नाही अजून??? अरे तो तर माझ्या पेक्षा वयाने पाच दहा वर्ष मोठा आहे??? त्याचे का नाही जमले लग्न??? त्याचा का कोणी असे हात धुऊन मागत नाही???? कॉंम्प्रमाईज करायचे पण किती आपल्या पेक्षा अर्ध्या पगाराच्या माणसाशी मी का म्हणून लग्न करायचे??? हे असेच ह्या समोरून येणाऱ्या रहदारी मध्ये चालत जावे आणि सगळे संपवावे....

खरेच इतके कठीण आहे का मला समजावून घेणे... माझ्या अपेक्षा फार माफक होत्या... सुरवातीला ह्या सगळ्या प्रकाराला मी पण न कंटाळता पुढे जात होतेच... एक नवरा नावाचा हक्काचा खांदा मिळावा हे माझे पण स्वप्न होतेच ना... इतर मुलींसारखे मी पण ती कांदेपोह्यांची प्लेट थरथरत्या हाताने पाहुण्यांना दिलेली आहे.... पण जसे जसे आयुष्य पुढे सरकत गेले तसे माझे मन ह्या गोष्टीतून उठत गेले.... कशासाठी दरवेळेस एका नवीन मुलासमोर नटून थटून उभे राहावे???? बरे ते करायची तयारी ठेवली तरी समाज शांत बसू देतो का??? घरचे तर चिंते पोटी बोलतात..... पण ज्यांचा काही संमंध नाही असे लोक पण लग्न का होत नाही ह्याचा जाब मला विचारतात... ऑफिसात.. मैत्रिणीचा घरी... गल्लीत... नातेवाईकांमधे नेहमी एकच प्रश्न लग्न कधी करणार???? एकदाचे मोकळे व्हावे ह्यातून... कुणीच नाहिए का ह्या जगात माझे जे मला समजावून घेईल??? माझ्या मैत्रिणी सुद्धा मला ह्यांवरून छेडतात... काहींना खरी चिंता तर काहींचा ढोंगी पणा.... शेवटी आता चालताना लक्षात येत आहे ती एकच गोष्ट

"My shadow is the only thing that wals beside me
my shallo hearts is the only thing thats beating"

कुठवर चालत आलेली आहे मी..... किती वेळ झाला असेल??? का चालत आहोत आपण??? जीव देण्याची हिंमत आहे का आपल्यात??? खरे तर जीव देणे हे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही हे मान्य पण ह्या संधिप्रकाशातून मी अंधकाराकडे जात आहे पण... हे काय होतंय... माझ्या आजूबाजूला एवढी गाड्यांची गर्दी का आहे??? अरे बापरे!!! मी रस्त्याच्या मधून चालतेय!!!! आणि हे लाइट्स कसले??? ती बस माझ्या कडे का झेपावत आहे... आईssss!!!!... हे काय होत आहे??? कोण मला खेचते आहे??? कोण हा मुलगा?? माझ्या डोळ्या पुढे अंधारी का येत आहे??? ....

(एकविसाव्या शतकात सुद्धा परिस्थिती फारशी बदललेली नाहिए.... अश्या घटना बरेच वेळा घडतात. )



बुधवार, जानेवारी ०६, २०१०

एक प्रवास.... भाग १

काल झालेल्या मतमोजणीत नव्याने स्थापन झालेल्या जनशक्ती पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांपैकी १९० जागा जनशक्ती पक्षाला मिळाल्या आहेत. साधारण तीन वर्षापुर्वी हा पक्ष अस्तित्वातच नव्हता पण गेल्या वर्षी झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत ह्या पक्षाने चांगलाच जोर दाखवला होता. पक्षाच्या नेत्याची निवड लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सदस्य करतील असे प्रतिपादन पक्षाध्यक्ष राजेश पवार ह्यांनी केले. महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण हे उद्या संध्याकाळ पर्यंत स्पष्ट होईल. पक्षाध्यक्ष राजेश पवार यांनी स्वतः मुख्यमंत्री होणार नसल्याचेही इथे आज स्पष्ट केले.




नव्या सरकारच्या शपथविधी साठी राजभवन सजले होते. शपथविधीचा मोठा सोहळा न करता एक साधासाच कार्यक्रम व्हावा अशी नवीन मुख्यमंत्र्यांची इच्छा होती. तरीही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहापुढे त्यांना थोडी माघार घ्यावी लागली होती. नव्या मुख्यमंत्र्यांशी बोलण्यासाठी मिडिया वाट बघत होता. काल जनशक्ती पक्षाच्या निवडून आलेल्या आमदारांनी नेत्याची निवड केल्या पासून मिडिया त्यांच्याशी बोलायला वाट बघत होता. पण त्यांनी पहिली पत्रकारपरिषद शपथविधी नंतरच असे ठरवले होते. आज सकाळपासुनच ते वेगवेगळ्या बैठकीत गुंतलेले होते. मुख्यमंत्री म्हणुन निवड झालेली असली तरीही इतर मंत्री मंडळ ठरवण्यात बराच वेळ जात होता. जनशक्ती पक्षाचे १९० पैकी १७५ आमदार पहिल्यांदा आमदारकीची शपथ घेणार होते. नेता म्हणुन त्यांचे नाव जवळजवळ एकमुखाने सर्वांनी ठरवले होते. त्याला पक्षाध्यक्षांचाही विरोध नव्हताच कारण जनशक्ती पक्षाला महाराष्ट्रभर पसरविण्यात त्याच्या टीमचा फार मोठा वाटा होता. आज आता तो दिवस आला होता आणि त्यांचे सरकार स्थापनेचे स्वप्न पुर्ण होणार होते.



" मी निरंजन प्रमोद जोशी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणुन......." ही शपथ घ्यायला जेव्हा निरंजन उभा राहिला तेव्हा एक वेगळीच लहर सभागृहातुन उमटली...अनेक भुवया उंचावल्या गेल्या. एक २७-२८ वर्षाचा मुलगा, निळ्या रंगाची मळकी जीन्स, काळ्या रंगाचा कॉलर वाला टि-शर्ट खाली फ्लोटर्स असा त्याचा गेट अप पाहुन तर अनेक राजकीय समीक्षक तोंडात बोट घालायचेच बाकी होते. काल पर्यंत नेहमीच्याच खादीच्या वेषातल्या सत्ताधार्‍यांना बघणार्यांसाठी हा नविनच अनुभव होता. निरंजन पाठोपाठ १४ मत्र्यांनी शपथ घेतली. मंत्रीमंडळ छोट्यात छोटे ठेवण्याकडेच त्यांचा कल होता. शपथविधी नंतर लगेचच पत्रकारपरिषदेला सुरवात झाली. सगळ्या भाषेतल्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाने बरीच गर्दी केली होती. एक एक करुन पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारायला सुरवात केली.



पः- "कैसा महसुस कर रहे हो आप सी. एम. की कुर्सी मिलने के बाद?"



नि:- कैसा महसुस करना चाहिए??? अच्छा तो लगताही है
पर जनता की उम्मीदों पे खरे उतरने की चुनौती सामने है




पः- Mr. Joshi you are speaking of challenges... in the near feature what challenges you see infron of the goverment??



नि:- Challenges are many more... but we see corruption,drought, suicides by farmers, lack of infrastructure are some of the challenges we need to address on a short term as well as on a long term basis.



अशा प्रकारे एक एक प्रश्न त्याच्या समोर येत राहिले तो उत्तर मोकळेपणे देत राहिला, शेवटी जाता जाता एका प्रश्न मात्र त्याला विचारात पाडून गेला.....



पः आपण राजकारणा कडे का वळलात??? कसे वळलात हे थोडक्यात सांगता येईल का???



नि:- राजकारणा कडे वळण्याचे मुख्य उद्दिष्ट होते समाजासाठी काही तरी करणे. माझ्या आजूबाजूला असंख्य प्रॉब्लेम्स असताना मी फक्त सिस्टमलाच दोष देत राहियचो... ही सिस्टम आम्ही तरुण लोक बदलणार नाहीत तर कोण बदलणार??? ह्याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याकरीता राजकारणात आलो आहे. बघूयात किती यशस्वी होतो ते!!!! बाकी राजकारणा कडे कसे वळलो हे सांगणे जरा अवघडच आहे. अहो राजकारणातुन ५५ वर्षी निवृत्ती स्विकारल्यानंतर मला एखादे पुस्तक लिहिण्यासाठी काही तरी राहू द्या हो!!!



असे म्हणताच सभागृहात थोडासा हशा पिकलाच... पण तो प्रश्न निरंजनला आठवणीत घेउन गेला खरा!!! तसाच तो त्याच्या खोलीवर परत आला... अजून तो सरकारी बंगल्यात रहायला गेला नव्हता. आणि आठवले त्याला ते दिवस सहा सात वर्षां पुर्वीचे............



======================================================



निरंजन जोशी... औरंगाबादचा.... इतर अनेक तरुणांप्रमाणे आपल्या आईवडीलांबरोबर रहात होता. सर्वसाधारण मध्यमवर्गीय घरात जसे वातावरण असते तसेच त्याच्याही घरात होते. वडील सरकारी नोकरीत, आई गृहिणी, मोठी बहीण डॉक्टर झालेली आणि हा नुकताच इंजिनिअरिंगची परीक्षा पास झालेला!!! त्यात घरच्यांची चिंता मिटवणारी बाब म्हणजे आधीच एका मोठ्या आय टी कंपनी मधे याची निवड झालेली. ज्या दिवशी निरंजनची ह्या कंपनीत निवड झाली त्यावेळेस बाबांना स्वर्ग दोन बोटच उरला होता. आपण आयुष्य भर सरळमार्गी राहिलो तरी मुलांना मोठे करु शकलो.. त्यात कमी पडलो नाही.. असा मध्यमवर्गीय विचार त्यांना सुखावत होताच!!! तर तशातच एक दिवस निरंजनला मुंबईला त्याच्या कंपनी मधे जॉइन होण्याचे पत्र आले!!!



======================================================



निरंजन आठवू लागला तो दिवस... बाबा किती टेन्शन मधे होते ना मी मुंबईला जाणार म्हणून... घरातून पहिल्यांदाच बाहेर रहाणार होतो मी..... त्यामुळेच जास्त चिंता होती!!! तसेच निघालो मुंबईला जायला... काहि नविन मित्र मिळणार... भरपूर काम करायचे... पैसा कमवायचा... हे सामान्य स्वप्न घेऊन घरातून निघालो...!!! तसे मेडिकल टेस्ट च्या वेळेस भेटलेले मित्र तिथे पण सोबत येणारच होते. सि एस टी स्टेशनावर साधारण तासा भराच्या अंतराने त्यांच्या पण गाड्या येणार होत्याच. तसे म्हणाल तर, आत्ता पर्यंत मित्र म्हणण्यासारखी आमची ओळख सुद्धा नव्हती. आमची भेट ती काय फक्त मेडिकल टेस्टच्या वेळेस झाली होती. त्यातला अभ्या म्हणजेच संग्रामसिंह कदम लातूरचा पण औरंगाबादहूनच इंजिनिअरिंग केले असल्यामुळे माझ्या आधी पासून ओळखीचा...



सि एस टि स्टेशनावर सकाळी सकाळी उतरलो... तसे जॉइनिंग दुसर्‍या दिवशी होते... रविवारचा दिवस असल्यामुळे गर्दी तशी कमीच होती. पण नेहमी प्रमाणे बाहेरगावच्या गाड्यांकडुन लोकलकडे पळणार्‍यांची गर्दी होतीच. स्टेशनवरच्या अनाउंसमेंट चालूच होत्या... मी उतरुन सामान साईडला घेऊन कुठे यांची वाट बघायाची याचा विचार करतच होतो.... तोच दोन पोलिस माझ्या दोन्ही बाजूला आले... आणि सरबत्ती सुरु केली....



"क्योंबे??? कहाँ से आये हो??"



" काय झाले साहेब??? हे काय ह्या समोरच्या देवगीरी एक्स्प्रेस मधून उतरलो आत्ता.. औरंगाबादहून आलोय."



" मुंबईत कशाला आला आहेस??"



"साहेब या या कंपनीत नोकरी लागली आहे."



"मग ह्या बॅग मधे काय बॉम्ब आहेत काय???"



" नाही हो साहेब, ह्यात माझे कपडे आहेत फक्त"



" चल बॅग उघड, आम्हाला तपासायचे आहे, तसेही हे औरंगाबाद म्हणजे अतिरेक्यांचे केंद्रच आहे"



" हे बघा साहेब, ह्या बॅगेत कपड्यांशिवाय काहीच नाहीए हो... "



त्या दोघांनी माझे सगळे कपडे उलथेपालथे करुन टाकले...



" तुला नोकरी लागली आहे ना, मग कंपनीचे आयकार्ड आहे का तुझ्या कडे???"



मला कळतच नव्हते काय चाललं होतं ते!!!!



"साहेब मी काही केलेले नाही हो"



" गप्प बैस! जेवढे विचारले तेवढे सांग!!!"



" साहेब आय कार्ड तर नाही पण कंपनीने दिलेले पत्र आहे"



ते पत्र त्याने वाचले निदान वाचण्याचे नाटक केलं.....



"चल ५० रु काढ नाही तर तुला आत टाकून देईन"



" पण साहेब माझे चुकले काय??"



"जास्त आवाज नको करु"



मी विचार केला प्रकरण वाढवण्यात काहीच पॉईन्ट नाही तेव्हा यांना ५० रुपये देऊन टाकू....



"हे घ्या साहेब " असे म्हणुन ५० रुपये देताच दोघेही खुश होऊन निघुन गेले पण माझ्या समोर उभा राहिला एक प्रश्न!!!!!

" पुढे काय???"

" मुंबईने स्वागत तर चांगलेच केले आपले आता बघूयात पुढे काय काय वाढुन ठेवले आहे??"



(क्रमशः)

आज तुझा वाढदिवस

आज तिचा वाढदिवस.........

काल सकाळी उठुन ऑफिसला पोहचायचे होते, पण सोमवार रात्रीच्या बियर मुळे उशिरच झाला. धावत पळत माझ्या जागेवर पोहचलो तर आजुबाजुचा जागेवरचे सगळे गायब, मरुदे म्हण्त त्तसेच जागेवर बसलो व मि पा उघडले. थोड्या वेळाने आमचे साहेब प्रकटले, आमची मि पा ची खिडकी उघडिच होती. त्याकडे रागाने बघत म्हणाले "आज तारिख काय माहिती आहे तुला???" (आमचे साहेब व आम्ही शुद्ध मराठी मधे बोलतो सगळ्या भैयांसमोर) माझ्या चेहेर्‍यावर एक खुप मोठे प्रश्नचिन्ह जे मला पण दिसत होते. मनात आले "सकाळी सकाळी ह्याला काय झाले" (मनात थोडी विषेशणे लावली होति आम्हि, पण आम्हला संशय आहे की तो पण इकडे वाचनमात्र आहे.) साहेब जोरात आवाज करुन आमच्यावर ओरडले "अरे आज २४ तारीख आज आपला रिव्हु होता." "झाला???" अचानक माझ्या तोंडातुन निघुन गेले, आणि व्ह्यायचे तेच झाले त्याने मला शिव्यांचि लाखोळी वाहीली व निघुन गेला. बाजुच्या खुर्चीवर बसणार्‍याने लगेच आपले नाक खुपसले "यार २४ मार्च लक्षात नाही ठेवता येत का???झाले सकाळी सकाळी जे आठवु नये ते आठवले. आज २४ मार्च म्हणजे उद्या तिचा वाढदिवस.

मन आठवणीत रमायला लागले, डोळ्या समोर आला तो मागचा २४ मार्च, काय काय केले होते मी तुला सरप्राईज करायला. बारा वा़जता तझ्या घरि केक घेउन आलो होतो. आठवतय तुला??? काळ वेळ विसरुन मी हरवलो तुझ्या आठवणीत, तुझ्या सोबत घालवलेले ते क्षण. तासन तास तुझ्याशी ते फोन वर बोलत बसणे, तुझ्या सोबत समुद्र किनार्‍यावर घालवलेल्या ती संध्याकाळ. तुझ्या सोबत खाल्लेली ति तिखट मिसळ, तिखट मिसळ खाउन तुझे लालबुंद झालेले नाक. असेच आठवत होतो सर्व काही. सहजच हात फोन कडे गेला आणि इछ्छा झाली तुला फोन लावायची. तुला फोन लावणार तितक्यात तु आलिस डोळ्या समोर सांगताना "आपल्या मधले सगळे संपलय, आज पासुन आपले नाते ते फक्त मैत्रीचे.

तिला फोन लावावा की नाही हे द्वंद मनात चालु असतानाच परत आमच्या साहेबाने पकडले. माझ्या हातात फोन, मी फोन कडे पाहात बसलो आहे, समोर मि पा ची खिडकी उघडि आहे, आणि साहेब माझ्या जागेवर. वा!!! काय छान योग आहे हा????? साहेबाने आम्हला परत एकदा आपादमस्तक न्याहाळ्ले. आणि आज्ञा दिली "कम विथ मी एन वॉर रुम" परत एक प्रश्नचिन्ह. आमच्या खुद के साथ बाता सुरु झाल्या. "ईग्रंजि मधे बोलतोय??? आणि वॉर रुम मधे??? आता कोणाशी युद्ध करायचे वॉर रुम मधे जाउन??? कसे बसे तिथे जाउन बसलो तर साहेब सुरु झाले. "निखिल आज तब्येत बरी नाही का?? सकाळ पासुन खुप विचित्र वागत आहेस??? मि काही तरि थातुरमातुर उत्त्तर दिले. साहेबाने पुढची गुगली टाकली "आज जर बरे वाटत नसेल तर लवकर घरि जा" मी मनात " काय काम आहे लवकर सांग आता" "फक्त जायच्या आधी तो रिपोर्ट मला पाठवुन दे". कसे बसे बाहेर आलो व कामाला लागलो. नेहमी प्रमाणे स्वःताची समजुत घातली. काम तसे फार मोठे नव्हते पण संपवे पर्यंत पाच वाजले.

कसे बसे स्टेशन वर आलो, लवकर ऑफिस मधुन निघाल्या मुळे तेथे गर्दी नव्हतिच. चहावाल्या जवळचे बाकडे रिकामे होते. आठवत आहेत का तुला ह्या इथेच बसुन कितिदा तु माझी वाट पाहीलि होतिस. उशिर झाला म्हणुन धावत पळत मी आल्या वर तुझे ते खोटे रागवणे. मग हळुच जेव्हा मी पुला वरील आज्जी कडुन घेतलेले गुलाबाचे फुल तुला द्यायचो तेव्हा जे काही भाव तुझ्या चेहर्‍यावर असायचे ते मी आजपण विसरलो नाहिये. मागच्या तुझ्या वाढ्दिवसाच्या आद्ल्या दिवशि इथेच आपण भेटलो होतो. परत एकदा हात खिश्या मधे गेला, फोन बाहेर आला. परत तेच आले डोळ्या समोर मी तिथेच बसुन राहीलो.

थोड्यावेळानी बघतो आजुबाजुला अंधार पडला होता . तसेच उठुन मी ट्रेन पकडली व घरि निघुन आलो. घरि आल्या आल्या मला लक्षात आले की आज आपण एकटेच आहोत. रुममेट तर गावाला गेला आहे. तसाच निरिछेने बसुन राहीलो. सुचत नव्हते काही म्हनुन उचलला फोन, तुला लावणार होतो ग पण टाळुन जुन्या मित्राला लावला. ज्या मित्राशी एक वर्षात बोललो नव्हतो त्याला फोन लावला. तुझा सोडुन सगळ्या विषयावर मी मो़कळे पणे बोललो. तुझा विषय निघाल्यावर नेट्वर्क नाही म्हणुन फोन काटला. नउ वाजताच घरात अंधार करुन झोपलो. झोप येत नव्ह्ति तरि तसाच पदुन राहीलो. रात्री बारा चे टोल पडल्यावर परत फोन कडे हात गेला, समजवले मनाला नवर्‍या सोबत करत असशील साजरा. पण माझे मन आले तुझ्या घरी केक घेउन. तुला नवर्‍या सोबत आनंदी बघुन तसेच आले परत फिरुन.

मनाला समजावणे सुरु झाले , कि ति आता तिच्या नवर्‍या बरोबर सुखी आहे. आता तिच्या आठवणी काढुन काही एक फायदा नाहीये.आज सकाळी वेळेवर ऑफिसला आलो.सकाळ पासुन टाळत आलो तुला फोन करायचे. समजावत आलो की विसर तिला आता. हा काय वेडेपणा लावला आहे काल पासुन?? गेले काही दिवस तर तु तिची आठवण सुद्धा काढन नव्हतास.  खालच्या ओळी वाचल्या आणि मनाला शांत करायचा प्रयत्न केला.

कुणाची ईतकी ही ओढ नसावी ,

की पदोपदी त्याचीच वाट बघावी !

त्याची वाट बघता बघता ,

आपलीच वाट दिशाहीन व्हावी !



असाच दिवस घालवुन आज घरी पोहचलो अजुन तिला फोने केला नव्हता. आता फोने कडे हात जातही नव्हता. घरी आल्या वर असेच काय करायचे बसुन म्हणुन ह्या रवीवारी घेतलेल्या सि डी ची पिशवी घेतली, त्यातुन हातात आली ति, गुलजार आणि सौमित्र ह्यांचा कवितेची सी डि "तरिही". ह्यातल्या एका कवितेवर मी थबकलोच. ति कविता खाली देत आहे.


उद्या तिचा वाढदिवस मनात नाहीच धरायचा

खुप खुप वाटल तरी फोन नाही करायचा

उद्या तिचा वाढदिवस खुप खुप चालायच

जुने जुने मित्र शोधुन नविन सगळे बोलायच

स्वःता सोबत बोलतानाही उगाच नाही अडायच

संध्याकाळी गर्दी मधुन बाहेर नाही पडायच

गजबजलेल्या प्लॅट्फॉर्म वरती उगाच बसुन रहायच

घरी चाललेया माणसांकडे आपुलकीने पाहयच

गुड्डुप्प करुन काळोख आज लवकर झोपुन जायच

आज मोडायच नियम रात्र जागायच

पण खुप खुप वाटल तरी फोन नाही करायचा

बारा नंतर तिचि खुप आठ्वण येत राहिल

मन उठुन केक घुन तिच्या घरी जाईल

जणु काहिच घडल नाही अशिच ती पाहिल

नवरा घर मुल ह्यांचात पुन्हा रमुन जाईल

आपण पुन्हा रस्त्यावरती एकटे एकटे असतो

मध्यरात्री बारमधे मु़काट पिउन बसतो

आज पासुन असल जगण मुळिच नाही जगायच

आता पुन्हा कधिच वळुन मागे नाही बघायच

आज पासुन आपलाच हात हातात धरायचा

खुप खुप वाटल तरी फोन नाही करायचा



ह्या कवितेचा शेवटी सि डि मधे एक फोन वाजतो.हा लेख लिहित असताना माझाही फोन वाजला. सहज पाहीले तर तिचा नं होता.