सोमवार, फेब्रुवारी १५, २०१०

हे बंध रेशमाचे!!!

प्रिय सखे....

तू हे वाचे पर्यंत प्रेमदिन सुरु झालेला असेल... ह्या प्रेमदिनी मी आज हे प्रेमपत्र लिहित आहे. खरे तर ह्या नंतर तुझी रिअ‍ॅक्शन काय असेल ह्या भीतीने लिहायला हात धजावतच नाहीय पण आता याचीहि सवय होत आहे असेच म्हणावेसे लागेल... गेल्या तीन वर्षा पासुन आपण एकमेकांना ओळखतो... ओळखतो म्हणजे काय? मागचे तीन महिने सोडले तर आपले बोलणे फार कमीच व्हायचे. अर्थात त्याला कारण मीच आहे हे मला मान्य आहेच.. वागलोच होतो मी तसा... त्याची शिक्षा करतोय ना सहन गेले तीन वर्ष.. आता अजुन किती सहन करणार???? माझ्या समोर अजुनही तीन वर्षापुर्वीचीच तू डोळ्या समोर आहेस...

आपला नोकरीचा पहिला दिवस होता... एका लहानशा शहरातून इंजिनीअरिंग करुन मी ह्या मोठ्या कंपनीत नोकरीला लागलो होतो... अर्थात कँपस मधूनच नोकरी मिळाल्यामुळे फारसा प्रश्न नव्हता आला... "पापा कहतें हैं" सारखी आयुष्यासाठी अनेक स्वप्नं डोळ्यांत घेऊन घरातून निघालो होतो... पहिल्यांदाच बाहेर राहणार होतो... त्यात कंपनीने ट्रेनिंगला भुवनेश्वरला पाठवले होते... आजही तो पहिला दिवस स्पष्ट आठवतो आहे.. कंपनीने दिलेल्या राह्यच्या जागेवरुन प्रशिक्षण केंद्रावर मी लवकरच पोहचलो होतो... साधारण नेहमीचेच सगळे सोपस्कार सुरवातीला झालेच.. तेच कंपनीची ओळख करुन देणारे प्रेझेंटेशन आणि भरमसाठ जाँईनिंग फॉर्म्स.. मग हळू हळू प्रत्येकाची बॅच सांगण्यात आली... त्यात आमच्या कॉलेजचे कोणीच माझ्या बॅच मधे नव्हते... त्यानंतर पुढे त्यांनी आपल्या बॅच साठी सी. आर. होण्यास कोण उत्सुक आहे विचारले.... आधी तर कोणाचाच हात वर झाला नाही. मग अचानक मुलींच्या बाजुला लक्ष गेले तर एक गोरासा हात वर झालेला दिसला... त्या गोर्‍या हाताला मग स्टेजवर बोलवण्यात आले....होय तुझाच तो हात.... आजही आठवतेयस मला तु त्याच रुपात... मोरपंखी रंगाचा तुझा तो पंजाबी ड्रेस... मानेवर रुळणारे केस... कसे विसरु तुझे ते रुप... लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट का काय असेच झाले होते... आणि तु अगदी बिनधास्त स्टेजवर जाउन स्वत:ची ओळख करुन देत होतीस...काही सेकंद माझ्यासाठी जगच थांबले होते की काय??? तु जागेवर जाऊन बसे पर्यंत मी तुझ्याच कडे बघत होतो..

कार्यक्रम संपताना आजच्या दिवशीची उपस्थिती प्रत्येकाने सी आर कडे नोंदवायची होती... माझी नजर तुलाच शोधत होती.. आणि मग मी तुझ्याकडे आलो.. तेव्हा पहिल्यांदा तुला जवळून बघितले.... तुझ्या घार्‍या डोळ्यांनी तर मला घायाळच केले म्हणावे!!! त्या मोरपंखी ड्रेस वर मोरापिसाचे कानातले...अगदी आ वासून मी तुझ्या कडे पहात होतो.. कदाचित ते तुझ्या लक्षात आलेही असावे...सगळ्यांची तुझ्याकडच्या कागदावर सही करुन झाली तरी मी तसाच उभा होतो.. शेवटी तूच माझ्या समोर आलीस आणि माझ्या हातात तो कागद दिला "Please sign this"... सही करत असतानाही माझे लक्ष तुझ्याकडेच होते म्हणा... सहीचा कागद तुझ्या हातात देताना आपली नजरा नजर झाली आणि तु माझ्या कडे बघुन गोड हसलीस... अगदी हृदयात कळ यावी असेच होते ते हसू.... आणि त्यानंतर "जोशी, माझ्या कडे बघणे झाले असेल तर वर्गा कडे चला!!!" हा टोला तर खासच होता...
त्यानंतरचे काही दिवस असेच गेले.. म्हणजे आपली ओळख तर झाली होती... आपण योगा योगाने एकाच ग्रुप मधे आलो होतो.. एकाच ग्रुप मधे असल्या मुळे रोज ट्रेनिंग संपल्या नंतर आपण एकत्र असायचो... हळु हळु बोलणेही वाढत होतेच.. ओळखीचे रुपांतर मैत्रीत होत होते... माझ्या प्रत्येक दिवसाची सुरवात तुला एस एम एस करुनच व्हायची आणि शेवट तुझ्याशी फोनवर बोलतच व्हायचा. आपल्या मैत्रीबद्दल आपल्याच ग्रुप मधे अनेक लोकांना आश्चर्य वाटायचे... तुझी तर अखंड बडबड चालू असायची... तुलाही माझ्यासोबत वेळ घालवणे आवडायचे असे वाटायला लागले होते.. त्यात रोज रात्रीच्या त्या कॉफीशॉप मधल्या गप्पा.. तू तुझ्या शेजारची जागा माझ्यासाठी वर्ग, कॉफीशॉप प्रत्येक ठिकाणी राखून ठेवणे.. ह्या सगळ्यांनी मी खरे तर सुखावतच होतो... साधारण महिना भर हे असेच चालले असेल, अगदी आपल्या चिल्का च्या ट्रिप पर्यंत....
(क्रमशः)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा