पुस्तक:How Starbucks Saved My life
Michael Gill
भाषा: इंग्रजी
आवृत्ती: First
किंमत: 195.00
प्रकाशक: Harper Collins India
पृष्ठसंख्या: 265
काही पुस्तक सहज चाळताना वाचावेसे वाटतात अश्याच एका पुस्तक खरेदीत सापडलेले पुस्तक म्हणजे "How Startbucks Saved My Life:: A Son of Privilege Learns to Live Like Everyone Else” मायकल गेट्स गील ह्यांनी लिहिलेले पुस्तक म्हणजे त्यांचा एका मोठ्या जाहीरात कंपनीतले उच्चपदस्थ अधिकारी ते स्टारबक्स मध्ये कॉफी सर्व करणारे बरिस्ता ह्या प्रवासाचा लेखाजोखा आहे. आज मायकल हे अभिमानाने, आनंदाने स्टारबक्स मध्ये बरिस्ता म्हणून काम करतात.
मायकल हे न्युयोर्कर मध्ये लिहिणार्या प्रसिद्ध लेखक Brendan Gil ह्यांचे चिरंजीव ह्या कारणाने खरे तर त्यांना आयुष्याचा सुरवातीपासूनच सर्व सुखसोयी उपलब्ध होत्याच. पुढे येल मधून शिक्षण अर्धवट सोडल्या नंतर ते एका जाहीरात कंपनीत नोकरी सुरू करतात. साधारण पंचवीस वर्षाच्या त्यांचा करियर मध्ये ते यशाच्या एक एक पायर्या चढत सध्या क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून सहा आकडी पगार मिळवत असतात. पण कंपनीत तरुण रक्ताचे वारे वाहायला लागतात आणि त्यातच एका दिवशी मायकल ह्यांना कंपनीतून काढून टाकल्या जाते. ह्याच काळात त्यांचा विवाहबाह्य संबंधातून त्यांना एक मूल होते आणि ह्याच कारणास्तव त्यांचा बायकोशी घटस्पोट होतो व त्यांचा वीस वर्षापासून असलेला परिवार त्यांचा पासून दुरावतो. ह्याच काळात त्यांना ब्रेन ट्युमर असल्याचेही आढळते. अश्या प्रकारे आयुष्याचा उतरत्या काळात मायकल ह्यांचा कडे ना पैसा असतो ना त्यांचा कडे आरोग्य विमा असतो त्यात त्याच्यांवर त्यांचा गर्लफ्रेंड कडूनं झालेल्या लहान मुलीला सांभाळायची जवाबदारी असते.
काही दिवस छोटे मोठे काम केल्यानंतर तसेच जाहीरात एजन्सी मध्ये परत जायचे प्रयत्न केल्या नंतर अश्याच एका थकलेल्या दिवशी लेखक स्टारबक्स मध्ये बसून कॉफीपीत असतो. त्याच वेळेस तिथे एक २७-२८ वर्षाची एक आफ्रिकन-अमेरिकन मुलगी येऊन त्याला जॉब हवा आहे का विचारते. त्या मुलीचे नाव क्रिस्टल असते आणि ती स्टारबक्सची मॅनेजर असते. गील त्या परिस्थितीत तो जॉब स्वीकारतो आणि स्टारबक्स मध्ये सूट घालून कॉफी पिणारा माणूस हिरवा ऍप्रॉन घालून बरिस्ता म्हणून कॉफी सर्व करायला लागतो. पण हा जॉब मायकल गील साठी नक्कीच सोपा नाहीए... कारण त्याला इथे फरशी पुसण्यापासून ते कॉफी बनवण्या पर्यंत अनेक कामं शिकावे लागतात. ह्या स्टोअर मध्ये कामाला लागल्यावर गील ला आयुष्यात आजवर न अनुभवलेले प्रसंग अनुभवावे लागतात. त्याचा पेक्षा वयाने व शिक्षणाने अर्धे असणारे त्याचे सहकारी त्याचा पेक्षा जास्त चांगले काम करतात हे त्याला कळायला लागते. ह्या सगळ्या काम करणार्या बरिस्तांमधे हा एकटाच म्हातारा व गोरा असतो इतर सगळे हे तरुण आफ्रिकन अमेरिकन्स असतात. गील ह्यांचे इतर साथी त्यांना नेहमीच आदराने, प्रेमाने वागवत असतात, आणि त्यांतूनच हळू हळू त्याचे पूर्वग्रह गळून पडतात आणि उरतो तो फक्त एक साधा, आनंदी असा गील. गील ह्यांचा मधला हा बदल त्यांचा मुलांना अर्थातच खूप भावतो.
ह्या सगळ्या प्रवासात अजून एक महत्त्वाचे म्हणजे स्टारबक्स कसे चालते. त्याचा काउंटरच्या पलीकडचे जग पण आपल्याला पाहिला मिळते. तिथे काम कसे चालते??? तिथले बरिस्ताज कोण आहेत??? त्यांचे विश्व काय हे सगळे आपल्याला जवळून अनुभवायला मिळते त्याही पेक्षा पुढे जाऊन एखाद्या माणसाला त्याचा वर्ण जात धर्म इत्यादींच्या पलीकडे जाऊन मदत केल्यानंतर काय चमत्कार घडू शकतात हे पाहिला मिळते. ह्या पुस्तकात लेखकाची स्टाइल कुठे कुठे कंटाळवाणी वाटू शकते, त्याने आफ्रिकन अमेरिकन सहकार्यांसोबत दिलेल्या कामाचे दाखले. त्याला कॉफी करताना काय करावे लागते हे परत परत सांगितले आहे. ह्याशिवाय पुस्तकात एक जाणवणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेखकाने त्याचे पूर्व आयुष्य कसे वैतागवणे होते ह्याचे वर्णन करण्यापेक्षा जास्त भर हा स्टारबक्स मधल्या कामामुळे आणि तिथल्या एकंदरीत वर्क कल्चर मुळे त्याचे आयुष्य कसे सुधारत जाते ह्यावर दिलेला आहे. मायकल गील ह्यांनी लिहिलेले हे पुस्तक सर्वोत्तम नसले तरी वेगळा अनुभव देणारे आहे.