पुस्तक: कृष्णा:अग्निसमाधीतला योगी भांड बाबा
भाषा:मराठी
किंमत: 200.00
प्रकाशक: साकेत प्रकाशन प्रा.लि. पृष्ठसंख्या: 240
आजच्या काळात पंचवीस वर्षाचा एक तरुण स्वतः:च्या हाताने चीता रचून अग्नीसमाधी घेतो ही एक आश्चर्याची आणि चमत्कार वाटवा अशी विश्वास न बसणारी घटना आहे. तर ही कथा आहे कृष्णा महाराज भांड ह्यांचा जीवनाची. कृष्णा ह्यांनी ज्ञानेश्वर माउलीच्या संजीवन समाधी पर्वकाळातील कार्तिक वद्य एकादशी, गुरावारी सकाळी त्यांनी त्यांचाच शेतातल्या त्रिगुणी वृक्षा खाली समाधी घेतली. जाण्यापूर्वी त्यांनी तिथेच त्यांचा ५०१ वा "कळसाचा अभंग" लिहून ठेवला होता. सकाळी जेव्हा शेतात त्यांचा गडी पोहचला तेव्हा त्याने पाहिले ते चीता पेटली होती आणि त्यावर कृष्णा महाराज पद्मासनात बसलेले होते. त्यांचा चितेशेजारीच दत्ताच्या फोटो समोर त्यांनी त्यांचा अभंगाच्या सहा वह्या ठेवल्या होत्या. ह्या सहा वह्यात मिळून एकूण ५०१ अभंग लिहिलेले होते.
औरंगाबाद जिल्हातील पैठण तालुक्यातले वडजी गावात कृष्णा ह्यांचा जन्म झाला, लहानपणापासूनच त्यांचा देवधर्माकडे ओढा होताच. त्यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण झालेले होते. त्यानंतर शेतीच्या कामात घरच्यांना मदत करत असताना त्यांचा देव धर्माकडे ओढा वाढलेलाच होता. साधारण २००४ च्या आसपास संन्यास घ्यायचा म्हणून ते घरातून निघून जातात पण घरच्यांचा प्रेमापोटी संन्यास घेत नाहीत. २००५ च्या आसपास ते चार धाम यात्रा करून येतात आणि त्यानंतर २००६ च्या कार्तिक वद्य एकादशीला ते समाधी घेतात. कृष्णा महाराज यांना कोणताही मानवी गुरू लाभला नव्हता. त्यांनी गावातील तरुणांना भक्तिमार्गाकडे वळवले होते त्यांना व्यसनापासून दूर करण्याचा प्रयत्न केला होता. ह्या सगळ्या गोष्टींमुळे गावात त्यांचे कौतुकही होत असे. त्यांचे अभंग हे साध्या व रसाळ भाषेत जीवन तत्त्वज्ञान सांगून जातात. खरं बोलणे आणि वागणे म्हणजे ईश्वराकडे जाणे. लोभ, अहंकार, राग ह्या शत्रूपासून दूर राहा, गरीबानं लुबाडणाऱ्या ढोंगी साधी-बुवांपासून दूर राहा. कर्मकांडात अडकू नका. श्रम हीच ईश्वरसेवा समजा असा संदेश त्यांनी आपल्या अभंगातून सगळ्यांसाठी दिलेला आहे. सामान्य माणसाचे जगणे आनंददायी व्हावे हे त्यांचा अभंगाचे सूत्र आहे.
ही कथा लिहिली आहे बाबा भांड ह्यांनी. ही कथा लिहितं असताना अनेक धोके संभवत होतेच कारण कथा नायक हा लेखकाचा सख्खा पुतण्या आहे. पण लेखकाने नायकाचे अटी उदात्तीकरण करण्याचे टाळल्याचे जाणवते. त्यांचा लेखनातून काका-पुतणे ह्याच्यात असलेल्या भावनिक नात्याला दूर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत लेखकाने अग्नीसमाधीच्या बद्दल आपले विचार व्यक्त केलेलेच आहे. "कृष्णाने हे चूक केले " ही त्यांची पहिली प्रतिक्रिया होती. "दहावी नंतर शिक्षण सोडून कृष्ण ह्यांनी शेतीवाडीकडे लक्ष न देता फक्त देव देव करणे" हे लेखकाला आवडले नव्हते असेही ते नमूद करून जातात. हे सगळे वाचत असताना लेखनातला वेगळे पणा निश्चितच जाणवतो. एकूणच एका वेगळ्याच विषयावर असलेला आणि वर्तमानात विश्वास न बसावे असे वास्तव ह्या कादंबरीत उत्तम रित्या मांडलेले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा