बुधवार, ऑगस्ट ०४, २०१०

"कांदा बटाटा 'बॅचलर' रस्सा"

नमस्कार मंडळी,
काय दचकलात ना??? आधी तर निखिल देशपांडे हे नाव बोर्डावर बघुन आणि तेही पाककृती या विभागात. पण होते असे कधी तरी चुकुन एखाद्या गोष्टीचा इतका वैताग येतो की आजवर न मनावर घेतलेल्या गोष्टिंकडेही तुमचे सहज लक्ष जातेच. गेले दोन तीन दिवस मिपा वर जो काही धुडगुस चालु आहे त्याचावर आधी भरपुर हसुन घेतले मग थोडा कंटाळा आला आणि शेवटी तर वैताग आला. पण या सगळ्या व्यापातुन आम्हाला एक गोष्ट नक्कीच जाणवली "स्वयंपाकेविण बिंपाक अवघड आहे". कोण रे तो??? नक्की पराच असेल, म्हणतोय कसा बाई ठेवायची स्वयंपाक,बिंपाकाला. आहो प्रत्येकाला जमते का असे??? आता आमचा बिकाच बघा ना आज मुंबई, उद्या पुणे, परवा दुबई, तेरवा अजुन कुठे??? प्रत्येक ठीकाणी त्याने स्वयंपाकाला बाई ठेवली तर!!!!! ;) यावर बिकाने उपाय शोधलाच आहे पहा खुप आधीच त्याने कांदा टोमॅटोची 'बॅचलर' भाजी... उर्फ सुगरण्याचा सल्ला लिहुन ठेवला आहेच. अरे या बॅचलर भाजी वरुन आठवले ते आमचे चोता दोन(माफ करा राव, पण हे असेच लिहावे वाटते). दोन्याची तर म्हणे उपासाच्या सारख्या स्पेशल स्वयपांकाची मास्टरी आहे. त्यांची उपवासाची साबुदाण्याची बॅचलर थालिपीठे ... उर्फ डॉन्याचा सल्ला.. हे सगळे बघुन आम्ही ही घेउन आलो आहोत "कांदा बटाटा 'बॅचलर' रस्सा... उर्फ निख्याचा सल्ला ".

तर मंडळी आम्ही स्वयंपाक काय करायचा असा विचार करुन मिपाच्या समृद्ध पाककृती विभागात शिरलो. सर्व प्रथम पेठकर काका, गणपा अश्या जेष्ट बल्लवाचार्यांना प्रणाम करुन घेतला, मग स्वाती ताई, जागु, दिपाली पाटील यांचा पाककृतीचे स्मरण केले. पण आमच्या डोळ्यासमोर एकच पाककृती दिसत होती. जाई ताईंची "रावणी पिठले". सगळी पाककृती तिनदा वाचुन आम्ही लॅपटॉप ला ओट्यावर स्थानापन्न केले. आणि साहित्य शोधायला लागलो आणि आमच्या समोर एक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहीले.. १ वाटी डाळीचे पिठ अरे पण कोणत्या??? पहिल्यांदाच स्वयंपाक करणार्‍या नवशिक्यांनी कसे ओळखायचे कोणत्या डाळीचे ते. पहिले आठवली तुर दाळ पण मग आठवला चुचु चा धागा ज्यात तिने तुर डाळ महाग झाल्याने आम्ही कोब्रा गोड वरण भात कसे खाणार असा जागतिक प्रश्न उभा केला होता. पण याचाच अर्थ तुर डाळ वरणासाठी वापरातात, मग अचानक आठवले की अमरावतीकडे पिठल्याला बेसनही म्हणतात. मग बाजारातुन मुंबई बेसन आणावे लागेल. पण आणणार कोण??? मी??? शक्यच नाही. एकतर स्व्यंपाक करुन मी माझ्यावरच उपकार करतोय. खरे तर माझा आयडी आळश्यांचा राजा असायला हवा होता पण तो आधीच घेतलेला आहेच. मग शोधाशोध करत असताना आमच्या लक्षात आले की घरात फक्त कांदे आणि बटाटे आहेत.त्यामुळे उरला एकच ऑप्शन कांदा बटाटा रस्सा.

साहित्य :
३ मध्यम बटाटे
१ मोठा कांदा
३-४ मिरच्या
३-४ लसणाच्या पाकळ्या
अर्धा इंच आलं
तेल तुमच्या डायटनुसार

कृती
सर्व प्रथम बटाटे, कांदे एकसारखे चिरुन घ्यावेत. खास बॅचलर लोकांसाठी सुचना कांदे धुउन चिरायला घ्या उगाच जास्त रडावे लागणार नाही. आता बॅचलर असल्यावर घरात मिक्सर असण्याची शक्यता कमीच अश्या वेळेस जास्त टेन्शन घ्यायचे नाही. मिरच्या बारीक चिरुन घ्यावा त्याच सोबत लसणाचा पाकळ्यांचे सुद्धा बारिक तुकडे करुन घ्या. आता एका ताटात मिरच्या, आले लसुण ठेवुन त्याला वाटीने व्य्वस्थीत ठेचुन घ्या, छान एकजीव होई पर्यंत हे करत रहा. आता एका कढई मधे नेहमी प्रमाणे फोडणी तयार करा. तेल हे तुमच्या अंदाजाने आणि तब्येती नुसार टाका. बॅचलर लोकांनो एकटेच खाणार असाल तर हे तेल थोडे जास्त झाले तरी हरकत नाही, हळुहळु अंदाज जमेल. त्यात मोहरी, जिरे हे तुमच्या अंदाजा नुसार टाकावेत. मोहरी फुटल्या नंतर कांदा हा मिश्रणात टाकुन लालसर परतवुन घ्यावा. आता पुढे यात तुमच्या अंदाजा नुसार आधी तुम्ही तयार केलेला कांदा लसण आल्याच ठेचा टाकावा, नंतर गरम मसाला एक चमचा, पावभाजी मसाला असल्यास तोही एक चमचा टाकावा, एकवार सगळे परतुन घ्यावे. त्यानंतर तुमच्या कॅपॅसिटी नुसार तिखट टाकावे, आधीच तीन- चार हिरव्या मिरच्या आहेत त्यामुळे लाल तिखटाचा अंदाज घ्यावा. आम्ही चार चमचे तिखट टाकले होते. त्यानंतर यामधे बटाटे टाकुन साधारण एक-दिड मिनिटे परतवुन घ्यावा. परतुन झाल्यानंतर वरुन एक वाटी पाणी अ‍ॅड करावे. आणि मग मंद आचेवर बटाटा शिजे पर्यंत ठेवावा. एवढे सगळे झाल्यावर अचानक तुम्हाला आठवेल तुम्ही भाजीत मिठ विसरलात. पण कहई हरकत नहई तुम्ही आताही मिठ अ‍ॅड करुच शकता. मिठ साधारण एक चमचा ठीक असेल. तर साधारण पाच दहा मिनिटाने एका पठीवर एक बटाटा घेउन तो चमच्याने दाबुन शिजला आहे का ते तपासुन घ्या. शिजला असेल तर तुमची भाजी तय्यर पटापट एखाद्या प्लॅट किंवा वाटी मधे वाढुन घ्या आणि खायला लागा.








टिपः भाजीतले प्रमाणे एकामाणसा साठी थोडी जास्त आहेत. दोन माणसांना पुरु शकेल.

चला आता पळतो आम्ही... उद्या लवकर उठायचे आहे पण तसेही नॅचरल आलारामाची (अलार्म म्हणने जमणार नाही) सोय भाजीने केलीच आहे.