महाराष्ट्रात सुरु झालेल्या पेपर वॉरची गंमत आमच्या घरा पर्यंतही पोहचली. शनिवार रविवार औरंगाबादला पोहचल्यावर जाणवलेला सगळ्यात सुखद बदल म्हणजे लोकमतची घरातून हकालपट्टी झालेली होती. लोकमतच्या साथीला किती तरी पेपर आले आणि गेले, तरी पण आमच्या घरातून निदान गेली १५ वर्ष तरी लोकमत काही हलत नव्हता. दिव्य मराठीने हे काम करुन दाखवले. दिव्य मराठीच्या लॉन्चची तशीही जोरदार तयारी करण्यात आली होती. वातावरण निर्मितीचे प्रयत्न जोरदार होते. सुरवातीला आलेला सर्व्हे, त्यानंतर वाटलेली औरंगाबादची माहिती सांगणारी डायरी, २०० रुपयांत वार्षिक नोंदणी, असे एक ना अनेक मार्केटिंग गिमिक्स वापरण्यात आले. जालावरही बेरक्या आणि बातमीदार या आणि अशाच ब्लॉग्जनी वातावरण पेटवायला सुरवात केली होती. या ब्लॉग्ज वरुन अजून एका सद्या अद्ययावत न होणार्या ब्लॉगची आठवण नेहमीच होते. ;) अर्रर्र... इतकं काही लिहिलं आणि जो किस्सा सांगायचा होता तो तर राहूनच गेला..
शनिवारी दुपारी मस्त आमरस चेपुन तंगड्या वर करुन पडलेलो असताना घरातला फोन खणखणला. मनातून खूप शिव्या द्यायची इच्छा असतानाही कशी तरी दाबून मोठ्या कष्टाने फोन उचलला आणि आवाजात शक्य तितके मार्दव आणून बोलायला सुरवात केली.
मी : हॅलो
(समोरुन एक लाडिक आवाज)
सः हॅलो सर, मी लोकमत मधुन बोलतेय.
(आईला, ओssss म्हणजे आमच्या मातोश्रींना लोकमत सखी मंच चे बक्षीस वैगेरे लागले का काय??? मागे काकूला अशीच चटई मिळाली होती.........)
सः हॅलोs
मी: (भानावर येत) हां बोला..
सः सर तुमच्या घरचा लोकमत अशात बंद केला आहे???
मी: (आनंदून) हो हो. आम्ही बंद करुन टाकला तुमचा पेपर, एक महिना झाला.
सः सर एक मिनिट होल्ड करा, मी आमच्या साहेबांकडे फोन देते.
साधारण एखादा मिनिट मला ताटकळत ठेवल्या नंतर समोरुन बराच वेळ रिसीव्हरशी कोणीतरी खेळत बसले आहे असे मला वाटायला लागले. काय शिंची कटकट आहे. यांचे पेपराचे गठ्ठे परत जायला लागले तर आमची झोप का घालवताय???
तेवढ्यात समोरुन,
वि: नमस्कार साहेब मी वितरण व्यवस्थापक बोलतोय, आपण आपल्या घरी येणारा लोकमत का बंद केला???
मी: तुम्हाला खरच या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे आहे???
वि: हो साहेब. आम्हाला समजाऊन घ्यायचे आहे की आमच्या काय चुका झाल्या??? तुम्ही पेपर कधी बंद केला आणि तुमच्या कडे किती वर्ष लोकमत येत होता?
मी: आमच्या कडे गेली किमान १५ वर्ष लोकमत यायचा. साधारण एक महिना आधी आम्ही लोकमत बंद केला.
वि: सर कारण सांगु शकता???
(आता हा माणुस एवढ्या प्रेमाने विचारतोच आहे तर म्हणुन आम्ही आमची गाडी चालु केली)
मी: सर्व प्रथम बातम्यांचा खालावलेला दर्जा. आजकाल तुम्ही काय छापताय याचे भान तुम्हाला राहिलेले नाही. जास्तीत जास्त पेड न्युज देण्याकडे तुमचा कल आहे.
दुसरे म्हणजे बाबुजींनी आज एका सलूनचे उद्घाटन केले या आणि अशा सारख्या बातम्यांनीच तुमचे ते हॅलो भरलेले असते. जागा मिळालीच तर साथीला कोणत्या तरी जैन साधुंचे प्रवचन वगैरे कुठे झाले याच्या बातम्या छापता.
संपादकीय पानाबद्दल म्हणाल तर तुमच्या कडून कॉंग्रेसचा धोरणांचाच प्रसार होणार अशी मानसिक तयारी आम्ही केलेली आहेच.
तुमच्या पेपराची 'मंथन' नावाची एक पुरवणी आहे. सध्या तुम्हालाच अर्थात मंथन करायची गरज आहे. पण एकदा रविवारची पुरवणी कशी असावी म्हणुन लोकसत्ता कडे पहा. तुमच्या सातही दिवसांच्या अंकांमधे साहित्य, कला, संगीत क्षेत्राला किती महत्व दिले जाते याचा अभ्यास करा.
(एवढे बोलुन मलाच दम लागला)
वि: सर तुम्ही सांगितलेल्या बर्याच सुचनांवर आम्ही विचार करत आहोत. पण काय आहे सर काही बातम्या आम्हाला द्याव्याच लागतात. बाबुजीचा पेपर असल्यामुळे त्या बातम्या आम्ही देणारच.
मी: त्याचे योग्य प्रमाण तुम्ही राखु शकता. आणि माझ्या सुचना अजुन संपलेल्या नाहीत. पण जाऊ द्या तुम्ही वितरण विभागाचे, आणि माझ्या सुचना ह्या संपादकिय विभागा बद्दल जास्त आहेत.
वि: तुम्ही संपादकिय विभागातील आमच्या प्रतिनिधीस तुमच्या सुचना द्यायला इच्छुक आहात का?? तुमचे नाव काय??
यानंतर मी माझे नाव, पत्ता वगैरे त्यांना दिला, संपादकीय विभागाचे प्रतिनीधी आता घरी प्रत्यक्ष भेटायला येणार आहेत म्हणे.
या सगळ्यांतून एवढेच लक्षात येते की लोकमतचे गठ्ठे खरोखरच परत जात आहेत. दिव्य मराठी मला तितकासा आवडला नाहीच. त्याचे स्वरुप हे लोकमत आणि संध्यानंदचे मिश्रण असल्या सारखेच आहे. चाळीस पानांचा पेपर काढायचा म्हणल्यावर तशाही टेबल न्युज द्याव्याच लागणार. पण एकूणच लोकमतची औरंगाबाद विभागातली एकाधिकारशाही मोडीत निघाली हेच म्हणावे लागणार. स्वागतमुल्य एक रुपया करुन इतरांना जेरीस आणणार्या लोकमतालाही कुणीतरी सव्वाशेर मिळाला यातच समाधान.