मंगळवार, जून १५, २०१०

जस्ट फॉर फन



पुस्तक: Just For Fun: The Story Of An Accidental Revolutionary

लेखक: Linus Torvalds

भाषा: इंग्रजी

किंमत: 554.00

पृष्ठसंख्या: 288




कॉलेजात असतानाची गोष्ट, घरात संगणक येऊन साधारण सात-आठ महीने झाले असतील. तेवढ्या दिवसात तीन-चार वेळा फॉर्मेट पण करुन झाले. त्यामुळे ओ.एस इन्स्टॉल करायची सवय झालीच होती. एक दिवस मित्र घरी आला. येताना हातात ३ सीडीज होत्या. "लिनक्स आणले आहे, करायचे का इन्स्टॉल??" या प्रश्नाचे उत्तर न कळत हो असेच गेले. त्या आधी लिनक्स कधी वापरले नव्हते. आधीच माझ्या कंप्युटरवर विंडोज ९८ आणि एम ई किंवा एक्स पी अश्या दोन ओएस होत्या. तिसरी ओ. एस. टाकण्याचा नादात त्या दिवशी आम्ही कंप्युटरची वाट लावली हे सांगायला नकोच. तेव्हाच मी या माणसाचे नाव पहिल्यांदा ऐकले. जसजसे लिनक्स वापरायला लागलो, तसतशी याच्याबद्दल नवीन नवीन माहिती कळत गेली. त्याचे नाव मधुनमधून मॅगेझिन्समधून सर्वत्र वाचायला मिळायचेच. नोकरीला लागल्यावर ऑफिसात जर एखाद्या छोट्याशा गोष्टीसाठी कुणी लिनक्स रिस्टार्ट करायचा सल्ला दिला तर त्याच्याकडे बघुन "ऐसा करेगा तो लिनस जान दे देगा.." हे तुच्छतेने म्हणण्यातली मजा वेगळीच!!!

कोण हा लिनस?? हा लिनस म्हणजे लिनक्स या संगणक प्रणालीचा पहीला कर्नल लिहिणारा माणुस. "जस्ट फॉर फन" हे त्याचेच आत्मचरित्र!!


"I was a nerd. Geek. From fairly early on. I didn't duct-tape my glasses together, but I might as well have, because I had all the other traits. Good at math, good at physics, and with no social graces whatsoever. And this was before being a nerd was considered to be a good thing." -- Linus Torvalds


जस्ट फॉर फन हे लिनस टॉरवल्ड्स यांनी डेविड डायमंडच्या सहकार्याने लिहिलेले लिनस यांचे आत्मचरीत्र. या पुस्तकात लिनस हे आपल्या आयुष्याबद्दल सांगतातच, त्याच सोबत डेविड डायमंड सुद्धा लिनस आणि त्यांच्या कुटुंबासोबत आलेले अनुभव सांगतात. लिनक्सची व्यक्तिगत माहिती म्हटले तर, त्यांचा जन्म २८ डिसेंबर १९६९ ला हेल्सिंकी या फिनलन्ड च्या राजधानी चा शहरात झाला. त्यांचे पालक निल्स आणि अ‍ॅना हे दोघेही पत्रकार होते. लिनस चा परिवार हा फिनलन्ड मधल्या स्विडीश बोलणार्‍या अल्पसंख्याक समुहाचा भाग होता ही गोष्ट माहीती नसल्यामुळेच त्याचा सुरवातीच्या काळात त्याचा "लिनक्स" चा उच्चारसमजण्यास लोकांना त्रास होत असे. लिनस हे लहानपणापासुन गणितात हुषार होते. त्यांच्यावर सुरवातीच्या काळापासुन त्यांच्या आजोबांचा बराच प्रभाव होता. त्यांचे आजोबा हे युनिवर्सिटी ऑफ हेल्सिंकी मधे स्टॅटिस्टीकचे प्राध्यापक होते. लिनस यांनी १९८८ मधे युनिवर्सिटी ऑफ हेल्सिंकी मधे कॉम्प्युटर सायन्स शिकण्यास सुरवात केली. त्याच काळात त्यांनी ईंटेल ३८६ सिरीजचा कॉम्प्युटर घेतलेला होता. त्यावर त्यांनी मिनिक्स ही युनिक्स बेस्ड ऑपरेटिंग सिस्टिम वापरायला सुरवात केली. कॉम्प्युटर क्षेत्रात शिक्षण घेतलेल्यांना अ‍ॅन्ड्र्यु टॅननबॉमचे नांव माहित नसेल तर नवलच . तर मिनिक्स ही त्याच टॅननबॉम यांची ओ एस.


लिनसना मिनिक्स प्रणाली वापरताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्याच सोबत त्यांच्या समोरची सर्वात मोठी अडचण म्हणजे लिनस यांना त्यांचा विद्यापीठाच्या नेटवर्क मधल्या कंप्युटरला जोडण्यासाठी लागणारा टर्मिनल एमॅल्युएशन चा प्रॉग्राम मिनिक्स मधे उपलब्ध नव्हता. हाच प्रॉग्राम लिहिण्याचे लिनस यांनी ठरवले आणि तीच लिनिक्स च्या निर्मीतीची पहिली पावले होती. लिनस यांनी लवकरच तो प्रॉग्राम पुर्ण केला त्यानंतर या प्रॉग्राम सोबतच त्यांना या सोबत फाईल ट्रान्स्फर सारख्या इतर गोष्टी करण्याची गरज जाणवत गेली आणि असेच हळू हळू लिनक्सची निर्मिति झाली. लिनक्स यांनी ऑगस्ट २००१ मधे ते एका मोफत ओ.एस. वर काम करत असल्याचे जाहीर केले आणि त्याचपाठोपाठ संप्टेबर २००१ मधे लिनक्सचा पहीला कर्नल ०.०१ वापरासाठी खुला करण्यात आला. आणि पुढचा सगळा इतिहास सर्वज्ञात आहे.


जर तुम्ही नॉन टेक्निकल असाल, तर या पुस्तकात खुप जास्त टेक्निकल भाषा असेल आणि आपल्याला काही कळणार नाही असा समज करुन घ्यायची काही गरज नाही. सामान्य वाचकासाठी लिनसच्या आयुष्याची कथा निश्चितच आवडेल अशी आहे. लिनस यांनी त्यांना यश मिळुनही आपले पाय जमीनीपासून हलू दिले नाहीत हे त्यांनी स्वतःवरच केलेल्या विनोदावरुन वेळोवेळी दिसुन येते. त्याच सोबत लिनस यांनी त्यांचासाठी जीवनाची व्याख्या काय हे देखील जाताजाता नमूद केले आहे.
टेन्किकल वाचकांसाठी लिनसच्या या कथेसोबतच इतर बर्‍याच गोष्टी आहेत. त्यात लिनक्स, ओपन सोर्स आणि संगणक जगताच्या भविष्याबद्द्ल लिनस यांचे विचार वाचण्यालायक आहेतच. त्याच सोबत त्याचा अ‍ॅड्रु टॅननबम यांचाशी झालेला प्रसिद्ध वादाबद्दल्च्या माहीतीतुन बरेच काही शिकण्यासारखे आहेच. कोणत्या प्रकारचे कर्नल चांगले आहेत, या बद्दलच्या या वादाबद्दल अधिक माहीती या दुव्यातुन मिळु शकतेच. या सगळ्यात लिनसच्या लेखणीतून आलेले काही निबंध देण्यात आलेले आहेत तो भाग रटाळ वाटण्याची शक्यता आहे. पण एकूणच लिनक्सच्या निर्मीतीची ही कथा


शुक्रवार, जून ११, २०१०

वी आर द चॅम्पियन्स

फिफा वर्ल्ड कप आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. परत तोच थरार अनुभवायला आपण तयारच आहोत. आता प्रत्येक खेळाडू आपल्या देशाला जिंकवण्यासाठी कौशल्याची बाजी लावेल. कारण इथे प्रत्येक जण आलाय तो चॅम्पियन होण्यासाठीच. क्वॉलिफायर्स पार करुन आता ३२ संघ सज्ज झाले आहेत उद्यापासुन होणार्‍या लढतींसाठी. तशी, प्रत्येक वर्ल्ड कप ची एक खासियत म्हणजे त्यांचे थीम साँग्ज आणि मॅस्कॉट्स... वर्ल्ड कप ची गाणी आपण ऐकतोच पण प्रत्येक वर्ल्ड कप चा शुभंकर हा त्या देशाच्या संस्कृतीचे प्रतिक असतो म्हणायला हरकत नाही!


We are the champions - my friends

And we'll keep on fighting - till the end -

We are the champions -

We are the champions

No time for losers

'Cause we are the champions - of the world


वी आर द चँपियन्स या गाण्याला क्रीडाक्षेत्रात विजयगीताचा बहुमान तर आधीपासूनच होता, आणि १९९४ च्या अमेरिकेत झालेल्या वर्ल्ड्कपच्या वेळेस त्याला ऑफिशियल गीत म्हणून गौरवले. "वी वील, वी वील, रॉक यू" म्हणता म्हणताच क्वीन हा बँड "वी आर द चँपियन्स " सारखे गाणं आपल्याला देऊन जातो. आता गाण्याबद्दल काही अधिक न लिहिता आपण सरळ व्हिडिओचा लुफ्त घेऊयात.







याच वर्ल्डकप चा मॅस्कॉट होता स्ट्राईकर :- द वर्ल्ड कप पप.

म्हणजेच अमेरिकेतल्या घराघरातला पाळीव कुत्रा. त्याला लाल निळा आणि पांढरा असा टीशर्ट घातला आहे. आणि त्याच्या  टी शर्ट वर "USA 94" हे स्पर्धा वर्ष आणि देशाचं नांव ही आहेच.
त्यानंतर आला १९९८ चा वर्ल्ड कप. हा होणार होता फ्रान्स मधे. या वर्ल्ड कप चा मॅस्कॉट होता फुटिक्स. त्यावर्षीच्या यजमान फ्रान्स यांच्या निळ्या रंगा सारखाच संपुर्ण शरीर असलेला कोंबडा म्हणजेच फुटीक्स. याच्याही छातीवर "FRANCE 98" असे शब्द होते.आणि त्या वर्ल्ड कप चे ऑफिशियल गाणे होते रिकी मार्टीनचे "द कप ऑफ लाईफ". या गाण्याने रिकी मार्टीन घराघरात पोहचला. गाण्यात तीच खेळभावना आपल्याला दिसुन येते आणि कुठल्याही देशाच्या खेळाडूचे मनोधैर्य वाढवण्याचे काम अशी गाणी करतात.

The cup of life, this is the one.
Now is the time, don't ever stop
Push it along, gotta be strong.
Push it along, right to the top

या ओळी बरेच काही सांगुन जातात म्हणुनच म्हणावेस वाटते... गो, गो, गो, आले आले आले....





मधल्या दोन वर्ल्ड कपची ऑफिशियल गाणे म्हणजेच २००२ च्या कोरिया-जापान वर्ल्ड कपचे अ‍ॅनॅस्टिशिया या पॉप गायिकेचे "बुम" आणि जर्मनीत २००६ साली झालेल्या वर्ल्ड कपचे "टाईम ऑफ आवर लाईफ" हे मला कधीच तितकेसे भावले नाहीत.. पण या वेळेसचा वर्ल्डकपचा काउंटडाउन सुरु झाला आणि ई एस पी एन वर "वेविंग फ्लॅग्स" लागायला सुरवात झाली. या गाण्याने मनात वर्ल्ड कपची उत्सुकता पुन्हा एकदा नव्याने भरास आली. हे गाणे फिफाचे ऑफिशियल गाणे नाही हे कळाल्यावर दु:खही झाले. या गाण्याबद्दल इतक्या वेळा लिहिलं गेले आहे त्यामुळे पुनरूच्चार टाळतोय.


आफ्रिकेत होणार्‍या या वर्ल्डकपचा मॅस्कॉट आहे झकुमी नावाचा एक चीत्ता. याचे केस हिरवे आहेत आणि त्याने घातलेल्या टिशर्ट वर "SOUTH AFRICA 2010" लिहिलेले आहे. त्याचा असलेला हिरवा आणि पिवळा रंग हे साऊथ आफ्रिकेच्या राष्ट्रिय संघाच्या पोषाखा सारखेच आहेत.
आता जाता जाता या वेळेसच्या ऑफिशिअल गाणे आहे "वाका वाका" शकिराने गायलेल्या गाण्यात "वेविंग फ्लॅग्स" ची जादु नसली तरी हे गाणे सुद्धा चांगलेच आहे. "धीस टाईम फॉर आफ्रिका" असा संदेश देणारे गाणे नक्कीच आवडण्या सारखे आहेच.




This time for Africa असेच म्हणत आता किक- ऑफ ची वाट पाहयची आहेच. तो पर्यंत ही व इतर काही गाणी एकत बसायचा विचार आहेच.



गुरुवार, जून १०, २०१०

साखरेचं खाणार!!!

"साखरेचं खाणार त्याला देव देणार", हे अस्मादिकांच्या बाबतीत एकदम खरं ठरतं.किंवा इंग्रजीत शुगरटूथ की का काय म्हणतात तोच घेऊन जन्माला आलो म्हणा ना!!! गोड पदार्थ म्हणजे आपला एकदम जीव की प्राण. अगदी लहानपणी मला आजी, आई सगळेजण गोडघाशा म्हणूनच हाक म्हणायचे. म्हणजे माझे गोडाचे वेड इतके होते की कधी कधी आई झोपल्यावर हळूच डबा काढून चोरुन साखर खायचो. बरेच वेळा पकडलाही जायचो.(अजूनही खातोच.. पण आता पकडला जात नाही. ;)) त्या साठी अगदी आईच्या हातचे धपाटे पण अनेक वेळा खाल्लेत. आता जर मला कोणी विचारले "तुझा आवडता गोड पदार्थ कुठला?" तर उडुप्याच्या हॉटेलातल्या पोर्‍यासारखी लांबलचक यादी म्हणून दाखवेन!!!!!

आमच्या गोड खाद्ययात्रेची सुरवात झाली जालन्यापासुन. आमचे घर अगदी भर चौकातच होते. घराचा खालीच एक हॉटेल होते. तिकडे रोज सकाळी खवा पोहचवायला दुधवाले यायचे. यातल्या दुधवाल्यांकडुन आई खवा विकत घ्यायची. मग व्हायचा तो गुलाबजामुन बनवायचा एक राजेशाही कार्यक्रम. गुलाबजामुन मी कितीही आणि केव्हाही खाऊ शकतो. एक मात्र खरं, आईच्या हातच्या गुलाबजामुनची चव कधी बाजारातल्या गुलाबजामुनला कधीच नाही येणार. आमच्या घराखालच्या हॉटेलाची आणखी एक खासियत म्हणजे बालुशाही. अप्रतिम अशी बालुशाही इथे मिळायची. माझ्या मुंजीच्या वेळेससुद्धा इथल्याच आचार्‍याकडुन बालुशाही बनवुन घेतलेली.

जालन्यातली अजुन एक आठवण म्हणजे आजीच्या हातच्या पाकातल्या पुर्‍या. आहाहा!!! आतापण त्या पुर्‍यांची चव जीभेवर रेंगाळतेय. आजी अनारसे पण मस्त करायची. एकदा आमच्या ओळखीच्या जोशी काकूंकडे गेलो होतो. त्या खाली जमिनीवर बसून स्टोव्ह समोर ठेऊन अनारसे करत होत्या. त्याचा दुसर्‍याच दिवशी आईच्या मागे लागुन अनारसे बनवायला लावले. माझ्या हट्टापायी आईने अनारसे बनवले. पण मी ते खायला तयार नव्हतो. कारण काय तर आईने जोशीकाकूंसारखे खाली बसून अनारसे नव्हते बनवले. :D तसं जालन्याला मला बाहेरचे गोड खाल्याचं आठवत नाही.

बाबांच्या होणार्‍या सततच्या बदलीमुळे अमरावती-नागपुर्-अमरावती असा प्रवास घडलाच. त्यामुळे जिथे जिथे राहिलो, तिथं कुठे काय छान गोड मिळतं, याची एक जंत्रीच आहे म्हणा ना माझ्याकडे. जसं अमरावतीच्या रघुवीर मिठाईयाँ मधली काजुकतली तर अप्रतिमच होती. नागपुर मधे खाल्लेली हल्दीरामच्या सोनकेकची चव अजून आठवते. त्यावेळेस हल्दीराम अमेरिकेत पोहचले नव्हते. चिखलदर्‍या जवळ मेळघाट मधे सेमाडोह येथे जी रबडी खाल्ली तशी रबडी आजगायत नाही खाल्ली हो!! त्यानंतर औरंगाबाद मधे मिलन मिठाई मधली बर्फी किंवा अप्पा हालवाईचा पेढा जबरदस्त होता. उत्तममधल्या सारखी इमरती तर कुठेच मिळत नाही. आजही औरंगाबाद ला गेल्यावर बरेच वेळा उत्तममध्ये जाऊन इमरती घेऊन येतो.

पेढ्यावरुन आठवतो तर कुंथलगिरीचा प्रसिद्ध पेढा. हो हो.. तोच तो. अनासपुर्‍यांच्या मक्याने प्रसिद्ध केलेला.. (च्यायला, याच्या नावांत पण पुर्‍या याव्यात का?) कुंथलगिरी बीड जिल्ह्यातले एक छोटेसे गाव. पण तिथला कलमी पेढा म्हणजे काय विचारुच नका. ह्या गावावरुन कुठेतरी एकदा गेल्याचे आठवते. हायवेच्या दोन्ही बाजुला फक्त खव्याची व चक्क्याचीच दुकानं. हे कुथंलगिरीचे प्रसिद्ध पेढे खुलताबादच्या भद्रा मारूती मंदिरातसुद्धा जाऊन पोचलेत. भद्राला गेलो आणि पेढे आणले नाहीत असे कधीच झाले नाही. पेढ्याची आणखी एक आठवण म्हणजे आंबाजोगाईतील योगेश्वरी देवीच्या मंदिराबाहेरील कलमी पेढे. घरात पेढे आणलेले असले तर आईच्या हातात यायचा तो रिकामा डब्बाच.

गोड म्हटले की काय बोलू नि काय नको असे होऊन जाते बघा..हेच पहा ना, सगळं लिहिलं, पण माझ्या सगळ्यात आवडत्या पदार्थांबद्दल कुठे काय बोललो? तर, सगळ्यात महत्त्वाचे दोन गोड पदार्थ म्हणजे पुरणपोळी आणि श्रीखंड. आमच्या घरात सगळेच पुरणपोळीचे शौकिन. घरी पुरणपोळी वर्षातुन कितीही वेळा बनवली तरी नेहमी आईला त्रास द्यायला मी म्हणणार, "पुरणपोळी खाऊन खुप वर्ष झाली ग आई". नि मग तिने पटकन पोळ्या बनवायला घ्याव्यात हे पण आलेच. :) होळी, श्रावणातला शुक्रवार, नवरात्रात नवमीला, पुरणपोळी बनतेच बनते पण सर्वात वेगळ्या चवीची बनते ती फक्त महालक्ष्मीच्या (गौरीच्या) नैवेद्याची!!! आमच्याकडे नेहमी स्पर्धा लागते कोण सगळ्यात जास्त पुरणपोळी खाते याचीची. जिंकतो अर्थात मीच. पण ती तव्यावरुन गरम सरळ पानात वाढलेली त्यावर मस्त तुपाची धार सोडलेली पुरणपोळी मी कोणत्याही वेळेस खाऊ शकतो. तशीच शिळी झालेली पुरण पोळी पण मी कितीही पोट भरलेले असेल तरी खाऊ शकतो.

श्रीखंड मला आवडते ते चक्क्यापासुन घरी बनवलेले. काही ठराविक दिवशी श्रीखंड बनलेच पाहिजे असा अलिखित नियमच आहे म्हणा ना!!! मग माझ्याकडे यातली दोन कामं येतात. एक म्हणजे औरंगाबाद्ला भावे आणि कं कडुन चक्का घेउन येणे आणि दुसरे म्हणजे चक्का पुरण यंत्रातुन काढुन देणे. साखरभात हाही माझ्या आवडत्या पदार्थापैकी एक आहे.

काही विचित्र पदार्थ सुद्धा मी गोड खायची इछा झाल्यावर खातो. दाण्याचं कुट-साखर ही त्यातलीच एक. कधी गोड खायची इच्छा झाली व काहीच सापडत नसेल तर सरळ वाटीत शेंगदाण्याचं कुट घ्यायचं, त्यात थोडी पिठी साखर टाकायची किंवा साधी साखर टाकायची झाली, की आमची स्वीट डिश तयार. याच प्रकारचा शेंगदाण्याचा लाडु, साबुदाण्याचे लाडु असं काहीही कधीही मला चालतं. एक गडगिळ नावाचा पदार्थ आहे, त्याची पाककॄती मला माहित नाही, पण गुळ आणि कणिक ह्या पासुन बनवतात असे वाटते. आजीच्या हातचा खाल्लेला तो पदार्थ आजही आठवतो. तसं म्हणायचे तर फक्त खीर हा प्रकार मला फारसा काही आवडला नाही. आता बंगाली मिठाई वगैरे खातो पण ती सुद्धा फारशी आवडत नाही.

अरे ह्या सगळ्यात आईच्या हातचा कलाकंद राहिलाच. दुध नासले की मी नाचायचो आता कलाकंद मिळणार म्हणुन. तसेच फक्की हा प्रकार म्हणजे तर विचारु नका. शाळेत असताना डब्ब्यात फक्की कितीदा नेली असेल सांगता येत नाही.
पाहिलंत, नुसतं गोड गोड म्हणेपर्यंत इतके विचार डोक्यात आले.. अजून लिहायला बसलो तर आणखी खूप होईल. पण मग तोवर समोर चितळ्यांची आंबा बर्फी बिचारी टुकूटुकू माझी वाट पाहातेय त्याचे काय?? आलोच जरा तिचा 'समाचार' घेऊन!!!

सोमवार, जून ०७, २०१०

(बिलंदरी)

कधीतरी केलेले हे विडंबन ब्लॉगावर टाकायचे राहुनच गेले होते. तेच आज ईथे टाकत आहे.

खर तर हा आमचा विडंबनाचा पहिलाच प्रयत्न. गप्पाटप्पा सदरात घालण्याचे कारण म्हणजे एक विरंगुळा म्हणुन ह्याकडे पहावे एवढाच उद्देश.

हे विडंबन एका बिलंदरीची माफी मागुन...

प्रेरणा

जालाच्या ह्या विणीवरची
ती बिलंदरी नवखी होती
ती तशी विस्मरणीय
"ईद का चाँद" होती

तीच्या ओठांवरती
बडबड पोकळ होती
अपशब्दांची तर ती
सरस्वातीच होती

न शिजलेला भात
पोळी चिवट होती
तिच्या स्वयंपाकाची ती
तर्‍हा न्यारीच होती.

शनिवार, जून ०५, २०१०

बुलेवार्ड ऑफ ब्रोकन ड्रिम्स....

ट्रिगरः अर्थातच.. मकीने लिहिलेलं चाँद तनहा!!!

रोज ऑफीसमध्ये होणारा तोच तो उशीर. सकाळी ९ ते रात्री ११ पर्यंत मरमर करायची.. त्यानंतर माजिवाड्याला उतरून पुन्हा घरी जायचं अगदी जीवावर येतं.. एकदा का घराकडच्या रस्त्यावर वळलं की रहदारी तशी तुरळकच. कधी कधी तर साथ द्यायला कुत्रंही नसते.. रस्ता मस्त शांत असतो.. मधूनच गार हवेची झुळूक शरीराला गारवा देऊन जाते.. खरेतर हा रस्ता चालण्याचा खूप कंटाळा आलेला असतो.. दिवसभराचा शीण तर असतोच, त्यात कुणाला फोन करावा अशी वेळ पण नसते. अशा वेळेला कंटाळलेल्या जीवाला सोबत एकच.... आवडती गाणी!!!


[चित्र जालावरून साभार!!]

तसे गाण्यातले मला कळतेच असे काही नाहीए, पण काही गाणी मनात घर करुन जातात. त्याला भाषा, संगीताचा प्रकार यांचे काही बंधन नसते. आणि हो, त्यासाठी गाणे "यमनातलेच" पाहिजे असाही काही नियम नाही. त्याच रात्रीच्या एकटेपणात काही गाणी पुन्हापुन्हा ऐकावीशी वाटतात. त्यातलेच हे एक: "बुलेवार्ड ऑफ ब्रोकन ड्रिम्स"!!! पहिल्यांदाच हे गाणं कधी ऐकलं ते आठवत नाही.. पण जेव्हा ऐकलं, तेव्हापासून माझ्या मोबाईलमध्ये नेहमीच राह्यलंय. काही खास वेळेला सर्व मित्र एकत्र बसून रात्र जागवताना या गाण्याचा कमीतकमी दोन-चार वेळेला तरी उल्लेख झालाच पाहिजे असा अलिखित नियमच झालाय.


My shadow's the only one that walks beside me
My shallow heart's the only thing that's beating
Sometimes I wish someone out there will find me
'Til then I walk alone

हे गाणं एकटेपणावर तर आहेच आणि एकटेपणाच्या भीतीबद्दलही आहे. आपली स्पदनं हीच एकमेव जिवंतपणाची खूण आणि तिला फक्त सावलीचीच सोबत असणं यापरतं एकटेपण ते काय असेल? पण सुदैवाने तो निराशावादी नाही.. त्याला असेच कुढत, कण्हत जगायचं नाहीय.. आणि म्हणूनच तो त्याच्यासाठी "चलते चलते.. यूँही कोई" भेटण्याची वाट पाहात आहे...


[धोक्याचा इशारा: प्रस्तुत गाणे रॉक या प्रकारात मोडते. तेव्हा ते स्वत:च्या जबाबदारीवर ऐकावे व पाहावे.. नंतर हा का केकाटत होता अशा प्रतिसादांना विवक्षित ठिकाणी मारले जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी. ;) ]





"Boulevard Of Broken Dreams"

I walk a lonely road
The only one that I have ever known
Don't know where it goes
But it's home to me and I walk alone

I walk this empty street
On the Boulevard of Broken Dreams
Where the city sleeps
and I'm the only one and I walk alone

I walk alone
I walk alone

I walk alone
I walk a...

My shadow's the only one that walks beside me
My shallow heart's the only thing that's beating
Sometimes I wish someone out there will find me
'Til then I walk alone

Ah-ah, Ah-ah, Ah-ah, Aaah-ah,
Ah-ah, Ah-ah, Ah-ah

I'm walking down the line
That divides me somewhere in my mind
On the border line
Of the edge and where I walk alone

Read between the lines
What's f**ked up and everything's alright
Check my vital signs
To know I'm still alive and I walk alone

I walk alone
I walk alone

I walk alone
I walk a...

My shadow's the only one that walks beside me
My shallow heart's the only thing that's beating
Sometimes I wish someone out there will find me
'Til then I walk alone

Ah-ah, Ah-ah, Ah-ah, Aaah-ah
Ah-ah, Ah-ah

I walk alone
I walk a...

I walk this empty street
On the Boulevard of Broken Dreams
Where the city sleeps
And I'm the only one and I walk a...

My shadow's the only one that walks beside me
My shallow heart's the only thing that's beating
Sometimes I wish someone out there will find me
'Til then I walk alone...

गाणं जितक्या वेळा ऐकावं, तितक्या वेळा ते नव्यानेच भेटतं.. एक नवीन अर्थ सांगून जाते.. नि प्रत्येक नवा अर्थ पटतोच पटतो.. पहिल्यांदा ऐकलं, तेव्हा ते एका मनातून खचलेल्या व्यक्तीचं वाटलं.. पुन्हा ऐकलं, तर ते "मी आहे असाच एकटा एकटाच राहणारा.. सर्वांत असूनही नसल्यासारखाच असणारा" अशा विचारांच्या मनस्वी माणसाचं वाटतं!! कधी ते प्रेमभंग झालेल्या माणसाचं वाटतं तर कधी वाटतं, त्याला त्याचं ध्येय कुठं आहे ते गवसलंय.. आणि त्याला आयुष्याच्या वाटेवर त्या ध्येयापर्यंत चालायचंय.. आणि वाटेवरती कुणाची तरी विश्वासाची, प्रेमाची सोबत मिळावी हे तर आहेच!!!!

अधिक काय बोलू??? ऐका.... आणि एंजॉय करा!!!

शुक्रवार, जून ०४, २०१०

झाडाझडती


पुस्तक: झाडाझडती

लेखक:पाटील विश्वास

किंमत: 275.00

प्रकाशक: राजहंस प्रकाशन प्रा.लि.

पृष्ठसंख्या: 480



आज वर विश्वास पाटलांची महानायक, संभाजी अशी पुस्तक वाचली होती. झाडाझडती वाचायचे खुप दिवसांपासुन मनात होते. शेवटी गेल्या आठवड्यात वाचुन पुर्ण झाले. पुस्तक येउन इतके दिवस झालेत, तसेच इतके पुरस्कार मिळवलेत, तर अशा पुस्तकाचा परिचय आपण काय लिहायचा? हा प्रश्न मनात आलाच. तरीही जे सुचेल ते येथे देत आहे. झाडाझडती ही कथा आहे महाराष्ट्रातल्या धरणाची. धरणामुळे भरडल्या गेलेल्या ग्रामीण भागातील समाजाचे सुन्न करणारे वर्णन या कादंबरीत आहे.

या कादंबरीच्या मलपृष्ठावर दिलेले पुढचे वाक्य पुस्तकाबद्दल बरेच काही सांगुन जाते. तुमच्या बागा फुलाव्यात, ऊसमळे झुलावेत, साखर कारखाने निघावेत, यंत्रं चालावीत, तुमच्या घराघरात वीज खेळावी, म्हणून आम्ही आमची गावं आणि आमचं भवितव्य धरणाच्या घशात कोंबलं. विकासाचा नारळ फोडण्यासाठी दगड म्हणून आमची डोकी वापरलीत. खोबरं तुम्हाला मिळालं आणि आम्ही पाण्यासाठी, साध्या स्मशानासाठी भीका मागायच्या. जिवंतपणी आणि मेल्यावरही झडती चालूच.

पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या मधे असणारा आंबेगाव जिल्हा. तिथल्या वाघाठाणे तालुक्याची भौगोलीक परिस्थीती तशी विचित्रच. तालुकाच्या पश्चिमेला सह्याद्रिच्या डोंगररांगा. तिथे धो धो पाउस कोसळणार तर पुर्वेचा भाग दुष्काळी. तर अशा तालुक्यातली जांभळी धरणामुळे विस्थापित होणार्‍या धरणग्रस्तांची ही कथा. पण याला फक्त याच धरणग्रस्तांची कथा म्हणता येणार नाही, कमी अधिक प्रमाणात सगळीकडे हीच परिस्थीती आहे. असे असतानाही लेखकाला जिल्ह्याचे नाव काल्पनिक का घ्यावे लागते??? परदेशात डॅन ब्राउन सारख्या लेखकांचे वास्तव आणि कल्पकता यांची यशस्वी सरमिसळ करण्याचे उदाहरण आपल्या समोर आहेच. मग आपल्याकडे काल्पनिक जिल्हा का??? या साठी कोण जबाबदार?? आपल्याकडील शासन व्यवस्था?? राजकारणी का आपण वाचक लोक???

कथेमधे अनेक पात्रे आहेत... त्याचा आवाका सुद्धा खुप मोठा आहे. पण कथेतले पात्रे ही मुख्यत्वे जांभळी व आजुबाजुच्या गावात राहणारी. धरण होणार म्हणजेच जांभळई गाव बुडणार. हे गावातल्या सर्वांना माहीत असतेच. पुस्तकाला ठराविक काळ असा नाहीए पण धरणग्रस्तांच्या आयुष्याची व्यथा मांडलेली आहे. कथेची सुरवातच मुळी आंबेगावच्या आमदारांचे उपोषण आणि धरणाला विरोध करणार्‍या जांभळीच्या ग्रामस्थांना अटकेपासुन होते. कथेतले खैरमोडे गुरुजी, हैबती, त्याची आई आवडाबाई, गुणवंता, कुशाराजा असे अनेक पात्र मनात घर करुन जातात. या प्रत्येकाच्या आयुष्यात मुख्य प्रश्न धरणामुळे विस्थापन असले तरी प्रत्येकाला सोसाव्या लागणार्‍या गोष्टी नक्कीच वेगळ्या आहेत.

हैबती धरणग्रस्त म्हणुन याला नोकरी द्यायचे खासदार जाहीर करतात. त्यानुसार तो शिपाई म्हणुन त्याला नोकरी मिळतेसुद्धा. पण आपल्या भ्रष्ट व्यवस्थेतील लोक त्याचे नोकरीचे १८१ दिवस पुर्ण न होता त्याला ब्रेक देतात. जांभळी गावाचे पुर्नवसन ठरल्यानंतर याचे आणि याच्या कुटुंबाचे होणारे हाल... बायकोचे दिवस भरत आलेले असतात. गावठाणसाठी मिळालेल्या जमीनी वर झोपडे बांधुन राहणे पावसामुळे शक्य नसतेच. खैरापुर-ज्या गावात पुर्नवसन होणार असते तिथल्या लोकांचे वागणे आपल्याला नक्कीच सुन्न करुन जाते. हैबतीला मिळालेले बाभळीचे रान... त्यातुन त्याने फुलवलेला सुंदर मळा... त्यावर परत मुळ जमीनीच्या मालकाची पोटदुखी... त्याच्यामागचे दुष्टचक्र काही केल्या संपू देत नाहीच. अशा सगळ्या प्रवासात गावकर्‍यांना आधार असतो तो खैरमोडे मास्तरांचा!!!!

खैरमोडे मास्तर जांभळी गावातल्या शाळेतले शिक्षक आणि शिक्षकाच्या सोबतच जांभळी धरणग्रस्तांचा मुख्य आधार. धरणग्रस्तांचा नेता म्हणजे आजच्या काळातल्या राजकीय नेत्यांसारखा नक्कीच नाही तर गरज पडल्यास स्वतःच्या खिशाला खार लावुन गावकर्‍यांसाठी झटणारा. धरणग्रस्तांना योग्य तो मोबदला मिळावा, त्यांचे योग्य ठिकाणी पुर्नवसन व्हावे या साठी सरकार दरबारी खेट्या मारणारे मास्तरच. धरणग्रस्तांसाठी आपली नोकरी पणाला लावणारे मास्तर. नवीन जांभळी गावात स्मशानाला जागा मिळावी म्हणुन झटणारे मास्तर. हे पात्र अगदी डोक्यात फिट्ट बसते.

या सगळ्यात आपल्या इथल्या भ्रष्ट व्य्वस्थेचा फायदा घेणारे आणि आपल्याच इतर गावकर्‍यांचा पोटावर पाय देउन उभे राहणारे पात्र म्हणजेच दत्तु सरपंच, जांभळीचा सरपंचच मुळी हा मास्तरांचा आधाराने होतो पण पुढे पलटतो. आपल्या गावकर्‍यांचा विचार न करता जास्तीत जास्त स्वत:चा फायदा करुन घेत जातो. त्याच सोबत खासदार, त्यांचा मुलगा काही भ्रष्ट अधिकारी अशी एकापेक्षा एक पात्रांची रांगच आहे. जे वेळोवेळी केवळ स्वत:च्या स्वार्थापायी धरणग्रस्तांचे हाल वाढवत जातात. आजही आपली व्यवस्था भ्रष्ट नोकरदार, राजकारणी आणि त्यांना साथ देणारे नागरीक ह्यांनी अशीच पोखरुन काढलेली आहेच. पण अशा परिस्थितीला अपवाद असतातच. तसाच या ही कथेत चांगल्या जिल्हाधिकार्‍यांचे उदाहरण आहेच. यांचा काळातच धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागतील अशी आशा वाटतच असते. एखाद्या जिल्हाधिकार्‍याने राजकारण्यांना अडचणीची होणारे कामे असणारी मोहीम हाती घेतल्यानंतर सग़ळे राजकीय पक्ष संगनमताने त्याची उचलबांगडी करतात तेच ईथे सुद्धा होते..

या कादंबरी मधले काही प्रसंग मनाला फारच चटका लाऊन जातात. त्यातलाच एक म्हणजे सोपान मामाच्या मृत्यूनंतरचा प्रसंग. सोपानमामाच्या इच्छेनुसार त्याच्या शेवटच्या क्रिया झांजवाडीत व्हावयाच्या असतात. झांजवाडी हे धरणाच्या मधे येणारे गाव. त्यात गावापर्यंत जायचा एकच सोपा मार्ग म्हणजे धरणावर लाँच घेउन जाणे. नाहीतर मग धरणाच्या बाजुबाजूने १० कोस अतंर चालत जाणे. सोपान मामाचा मृतदेह तिथे पर्यंत नेताना होणारा त्रास... तरीही एकमेकांच्या मदतीला उभे राहणारे धरणग्रस्त... हे पाहून अंगावर खरेच काटा येतो.

या पुस्तकात कथानक घडते ते पुर्णतः ग्रामीण भागातच. त्यामुळे तसे संपुर्ण पुस्तकात ग्रामीण भाषाच वापरलेली आहे. मुळात लेखक हे स्वतः चांदोली धरण भागातले. त्यामुळे त्यांनी ग्रामीण भाषेचा बाज योग्यरीत्या सांभाळणे यात फारसे आश्चर्य नाहीच. यात त्यांना स्वतःला आलेले अनुभव सुद्धा त्यांनी मांडले असतीलच. खरेतर त्यांना तुम्हाला हे पात्रे कुठे भेटलीत का? असे विचारावे वाटते. त्याशिवाय विश्वास पाटील स्वतः प्रशासकीय सेवेत आहेत. त्यादरम्यानच्या काही अनुभवांचे येथे चित्रण झाल्याचे जाणवते. त्यांनी स्वतः जिल्हाधिकारी म्हणुन काम केलेले आहे. असे असतानाही त्यांनी आपल्या व्यवस्थेत असलेला भ्रष्टाचार लपवलेला नाही किंवा नोकरदारांच्या वागण्याचे कुठे समर्थन केलेले नाही. त्याचसोबत काही चांगले अधिकारी परिस्थिती कशी बदलु शकतात याचे उदाहरणही ते आपल्याला दाखवतातच. धरणग्रस्तांचे होणारे हाल वाचकाला पुस्तकाशी बांधुन ठेवतात त्याच वेळेस त्याच्या समोर अनेक प्रश्न सुद्धा निर्माण करुन जातात. हा धरणग्रस्तांना एवढे सोसण्याची ताकद कुठुन मिळत असेल?? एकीकडे आपण वर्ल्ड ईज फ्लॅट असे ओरडत आहोत त्याच वेळेस ही परिस्थिती अजुनही बदललेली नाहीए. ३०-४० वर्षापुर्वी झालेल्या धरणांच्यासाठी जमीनी दिलेली लोकांचे प्रश्न आजही सुटलेले नाहीत. समाजात खैरमोडेगुरुजी सारखे किती लोक असतात?? ह्या सगळ्यात आपण कुठे आहोत?? एकुणच इतकी वास्तवाचे दर्शन देणारी कादंबरी प्रत्येकाने एकदा वाचावेच असे वाटते.

गुरुवार, जून ०३, २०१०

स्टे हंग्री स्टे फूलिश्...


 

पुस्तक :Stay Hungry Stay Foolish 

लेखक:Rashmi Bansal 

किंमत:  125.00 

प्रकाशक: CIIE

 


 "Stay Hungry Stay foolish" ह्या ओळी पहिल्यांदा ऐकल्या त्या अ‍ॅपलचे प्रमुख स्टिव जॉब्स ह्यांनी स्टॅनफॉर्ड युनिव्हर्सिटीत केलेल्या भाषणात. ह्याचा अर्थ सांगायचा माझा प्रयत्न नाहिए पण याच नावाचे एक पुस्तक मध्यंतरी वाचले त्याबद्दल आज ईथे सांगणार आहे. हे पुस्तक रश्मी बन्सल ह्यांनी लिहिलेले आहे. रश्मी ह्या स्वतः आय. आय. एम, अहमदाबादच्या माझी विद्यार्थिनी आहेत तसेच त्या JAM ह्या मासिकाच्या संपादिका आहेत. ह्या पुस्तकाच्या आतापर्यंत एक लाख प्रती विकल्या गेल्या आहेत. तर ह्या पुस्तकात काय आहे खरे??
आय आय एम अहमदाबद मधुन एम. बी. ए. चे शिक्षण घेउन ज्यांनी उद्योजकतेचा मार्ग निवडला अशा २५ उद्योजकांची कहाणी आहे हे पुस्तक. ह्या पुस्तकातील लेखन प्रकार हा संभाषण स्वरुपाचा आहे. ह्यात आधी लेखिकेने प्रत्येक उद्योजका बद्दल थोडी माहिती नंतर त्या उद्योजकासोबत झालेला संवाद आणि त्यानंतर ह्या उद्योजकांकडुन इतरांना काही सल्ला. हे पुस्तक तीन विभागात विभागले गेले आहे:

१) The Believer:- या भागात अशा काही व्यक्तींचा समावेश करण्यात आलेला आहे ज्यांनी आय आय एम मधुन बाहेर पडताच उद्योगाचा क्षेत्रात उडी घेतली. यात संजीव भिकचंदानी (नोकरी.कॉम), शंतनु प्रकाश (एड्युकॉम्प),अशंक देसाई (मास्टेक)ईत्यादी लोकांचा समावेश केलेला आहे.
२)The Opportunists: या भागात आयुष्यात आलेल्या संधीचे सोने केलेल्या काही व्यक्तींचा समावेश करण्यात आलेला आहे. यात दिप कालरा (मेक माय ट्रिप्.कॉम), रशेश शहा (Edelweiss Capital), निर्मल जैन (इंडिया ईन्फोलाईन) येतात.
३) People having alternate vision: या भागात अशा काही व्यक्तींचा समावेश केला आहे ज्यांनी उद्योजकतेच्या आधारे समाजात काही बदल करायचा प्रयत्न केला, ज्यांनी पैशापेक्षा समाजाला जास्त महत्व दिले. यातली काही नावे म्हणजे वर्दन काबरा (फाउन्टन्हेड स्कुल) आणि वेंकट क्रिश्नन (गिव्ह इंडिया).

या पुस्तकातल्या काही लोकांबद्दल सांगायचे झाले तर सगळ्यात आधी मला ही कहाणी आठवते. ही कथा आहे एका उद्योजकाची, ज्याने एम.एन.सी. मधे नोकरी स्वीकारण्या ऐवजी आपल्या गावी साखर कारखाना उभा केला. हे करण्याआधी त्यांची असलेली बायोपेस्टीसाईडची कंपनी बंद केली, त्याचे कारण त्या कंपनीचा असलेला फक्त ५ करोड हा टर्न ओव्हर. त्यानंतर त्यांनी सुरु केलेली नवी कंपनी म्हणजेच श्री रेणुका शुगर्स. आज या कंपनीचा टर्नओव्हर काही शे करोड मधे नक्कीच आहे.

अजुन एक कथा आहे ती आर. सुब्रमनियन यांची. आय.आय.टी. मद्रास मधुन इंजिनियरिंग पुर्ण केल्यानंतर त्यांनी आय आय एम अहमदाबाद मधे प्रवेश घेतला. तिथुन बाहेर पडत असतानाच त्यांना सिटीबँन्क मधे नोकरी मिळालेली असते. पण त्यांच्यामधली चांगले काही करायची इच्छा त्यांना शांत बसु देत नाही. आणि त्याच चांगले काही करण्याचा इच्छेमुळे पुढे "सुभिक्षा" या रिटेल चेन ची सुरवात झाली. अर्थात या पुस्तकाच्या पुढच्या आवृत्तीत त्यांचे नाव येईल का नाही ते पण पहावे लागेलच.

या पुस्तकात या उद्योजकांनी भावी उद्योजकांना दिलेले सल्ले सुद्धा चांगले आहे. एकुणच ज्यांचा मनात स्वत:चे काही करायचे स्वप्न आहे अशा लोकांनी हे पुस्तक नक्कीच वाचावे. या पुस्तकात मला मुख्यत्वे दोन बाबी खटकल्या: सर्व प्रथम लेखिकेची भाषेची निवड. प्रत्येक दोन चार वाक्यामागे एक हिंदी वाक्य टाकण्यात आलेले आहे. त्यामुळे वाचणार्‍याचा विरस नक्कीच होतो. अजुन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे या पुस्तकातले सगळेच उद्योजक हे आय.आय.एम. अहमदाबद या खुप मोठ्या दुव्याने बांधलेले आहेत. या लोकांकडे आधीच आय.आय.एम. सारखा ब्रॅण्ड होता. त्यांचा ओळखी होत्या. त्यामुळे त्यांना अडचणीमधे मदत मिळवणे जास्त सोपे होते असे वाटते. उलटपक्षी जर एखादा सामान्य माणुस साधारण शिक्षण असलेला जेव्हा यशस्वी होतो त्याची कथा वाचणे जास्त स्फूर्तीदायक असते असे माझे मत आहे. असे असले तरी स्टे हंगरी स्टे फुलिश मला वाचायला आवडले..