शुक्रवार, जून ०४, २०१०

झाडाझडती


पुस्तक: झाडाझडती

लेखक:पाटील विश्वास

किंमत: 275.00

प्रकाशक: राजहंस प्रकाशन प्रा.लि.

पृष्ठसंख्या: 480आज वर विश्वास पाटलांची महानायक, संभाजी अशी पुस्तक वाचली होती. झाडाझडती वाचायचे खुप दिवसांपासुन मनात होते. शेवटी गेल्या आठवड्यात वाचुन पुर्ण झाले. पुस्तक येउन इतके दिवस झालेत, तसेच इतके पुरस्कार मिळवलेत, तर अशा पुस्तकाचा परिचय आपण काय लिहायचा? हा प्रश्न मनात आलाच. तरीही जे सुचेल ते येथे देत आहे. झाडाझडती ही कथा आहे महाराष्ट्रातल्या धरणाची. धरणामुळे भरडल्या गेलेल्या ग्रामीण भागातील समाजाचे सुन्न करणारे वर्णन या कादंबरीत आहे.

या कादंबरीच्या मलपृष्ठावर दिलेले पुढचे वाक्य पुस्तकाबद्दल बरेच काही सांगुन जाते. तुमच्या बागा फुलाव्यात, ऊसमळे झुलावेत, साखर कारखाने निघावेत, यंत्रं चालावीत, तुमच्या घराघरात वीज खेळावी, म्हणून आम्ही आमची गावं आणि आमचं भवितव्य धरणाच्या घशात कोंबलं. विकासाचा नारळ फोडण्यासाठी दगड म्हणून आमची डोकी वापरलीत. खोबरं तुम्हाला मिळालं आणि आम्ही पाण्यासाठी, साध्या स्मशानासाठी भीका मागायच्या. जिवंतपणी आणि मेल्यावरही झडती चालूच.

पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या मधे असणारा आंबेगाव जिल्हा. तिथल्या वाघाठाणे तालुक्याची भौगोलीक परिस्थीती तशी विचित्रच. तालुकाच्या पश्चिमेला सह्याद्रिच्या डोंगररांगा. तिथे धो धो पाउस कोसळणार तर पुर्वेचा भाग दुष्काळी. तर अशा तालुक्यातली जांभळी धरणामुळे विस्थापित होणार्‍या धरणग्रस्तांची ही कथा. पण याला फक्त याच धरणग्रस्तांची कथा म्हणता येणार नाही, कमी अधिक प्रमाणात सगळीकडे हीच परिस्थीती आहे. असे असतानाही लेखकाला जिल्ह्याचे नाव काल्पनिक का घ्यावे लागते??? परदेशात डॅन ब्राउन सारख्या लेखकांचे वास्तव आणि कल्पकता यांची यशस्वी सरमिसळ करण्याचे उदाहरण आपल्या समोर आहेच. मग आपल्याकडे काल्पनिक जिल्हा का??? या साठी कोण जबाबदार?? आपल्याकडील शासन व्यवस्था?? राजकारणी का आपण वाचक लोक???

कथेमधे अनेक पात्रे आहेत... त्याचा आवाका सुद्धा खुप मोठा आहे. पण कथेतले पात्रे ही मुख्यत्वे जांभळी व आजुबाजुच्या गावात राहणारी. धरण होणार म्हणजेच जांभळई गाव बुडणार. हे गावातल्या सर्वांना माहीत असतेच. पुस्तकाला ठराविक काळ असा नाहीए पण धरणग्रस्तांच्या आयुष्याची व्यथा मांडलेली आहे. कथेची सुरवातच मुळी आंबेगावच्या आमदारांचे उपोषण आणि धरणाला विरोध करणार्‍या जांभळीच्या ग्रामस्थांना अटकेपासुन होते. कथेतले खैरमोडे गुरुजी, हैबती, त्याची आई आवडाबाई, गुणवंता, कुशाराजा असे अनेक पात्र मनात घर करुन जातात. या प्रत्येकाच्या आयुष्यात मुख्य प्रश्न धरणामुळे विस्थापन असले तरी प्रत्येकाला सोसाव्या लागणार्‍या गोष्टी नक्कीच वेगळ्या आहेत.

हैबती धरणग्रस्त म्हणुन याला नोकरी द्यायचे खासदार जाहीर करतात. त्यानुसार तो शिपाई म्हणुन त्याला नोकरी मिळतेसुद्धा. पण आपल्या भ्रष्ट व्यवस्थेतील लोक त्याचे नोकरीचे १८१ दिवस पुर्ण न होता त्याला ब्रेक देतात. जांभळी गावाचे पुर्नवसन ठरल्यानंतर याचे आणि याच्या कुटुंबाचे होणारे हाल... बायकोचे दिवस भरत आलेले असतात. गावठाणसाठी मिळालेल्या जमीनी वर झोपडे बांधुन राहणे पावसामुळे शक्य नसतेच. खैरापुर-ज्या गावात पुर्नवसन होणार असते तिथल्या लोकांचे वागणे आपल्याला नक्कीच सुन्न करुन जाते. हैबतीला मिळालेले बाभळीचे रान... त्यातुन त्याने फुलवलेला सुंदर मळा... त्यावर परत मुळ जमीनीच्या मालकाची पोटदुखी... त्याच्यामागचे दुष्टचक्र काही केल्या संपू देत नाहीच. अशा सगळ्या प्रवासात गावकर्‍यांना आधार असतो तो खैरमोडे मास्तरांचा!!!!

खैरमोडे मास्तर जांभळी गावातल्या शाळेतले शिक्षक आणि शिक्षकाच्या सोबतच जांभळी धरणग्रस्तांचा मुख्य आधार. धरणग्रस्तांचा नेता म्हणजे आजच्या काळातल्या राजकीय नेत्यांसारखा नक्कीच नाही तर गरज पडल्यास स्वतःच्या खिशाला खार लावुन गावकर्‍यांसाठी झटणारा. धरणग्रस्तांना योग्य तो मोबदला मिळावा, त्यांचे योग्य ठिकाणी पुर्नवसन व्हावे या साठी सरकार दरबारी खेट्या मारणारे मास्तरच. धरणग्रस्तांसाठी आपली नोकरी पणाला लावणारे मास्तर. नवीन जांभळी गावात स्मशानाला जागा मिळावी म्हणुन झटणारे मास्तर. हे पात्र अगदी डोक्यात फिट्ट बसते.

या सगळ्यात आपल्या इथल्या भ्रष्ट व्य्वस्थेचा फायदा घेणारे आणि आपल्याच इतर गावकर्‍यांचा पोटावर पाय देउन उभे राहणारे पात्र म्हणजेच दत्तु सरपंच, जांभळीचा सरपंचच मुळी हा मास्तरांचा आधाराने होतो पण पुढे पलटतो. आपल्या गावकर्‍यांचा विचार न करता जास्तीत जास्त स्वत:चा फायदा करुन घेत जातो. त्याच सोबत खासदार, त्यांचा मुलगा काही भ्रष्ट अधिकारी अशी एकापेक्षा एक पात्रांची रांगच आहे. जे वेळोवेळी केवळ स्वत:च्या स्वार्थापायी धरणग्रस्तांचे हाल वाढवत जातात. आजही आपली व्यवस्था भ्रष्ट नोकरदार, राजकारणी आणि त्यांना साथ देणारे नागरीक ह्यांनी अशीच पोखरुन काढलेली आहेच. पण अशा परिस्थितीला अपवाद असतातच. तसाच या ही कथेत चांगल्या जिल्हाधिकार्‍यांचे उदाहरण आहेच. यांचा काळातच धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागतील अशी आशा वाटतच असते. एखाद्या जिल्हाधिकार्‍याने राजकारण्यांना अडचणीची होणारे कामे असणारी मोहीम हाती घेतल्यानंतर सग़ळे राजकीय पक्ष संगनमताने त्याची उचलबांगडी करतात तेच ईथे सुद्धा होते..

या कादंबरी मधले काही प्रसंग मनाला फारच चटका लाऊन जातात. त्यातलाच एक म्हणजे सोपान मामाच्या मृत्यूनंतरचा प्रसंग. सोपानमामाच्या इच्छेनुसार त्याच्या शेवटच्या क्रिया झांजवाडीत व्हावयाच्या असतात. झांजवाडी हे धरणाच्या मधे येणारे गाव. त्यात गावापर्यंत जायचा एकच सोपा मार्ग म्हणजे धरणावर लाँच घेउन जाणे. नाहीतर मग धरणाच्या बाजुबाजूने १० कोस अतंर चालत जाणे. सोपान मामाचा मृतदेह तिथे पर्यंत नेताना होणारा त्रास... तरीही एकमेकांच्या मदतीला उभे राहणारे धरणग्रस्त... हे पाहून अंगावर खरेच काटा येतो.

या पुस्तकात कथानक घडते ते पुर्णतः ग्रामीण भागातच. त्यामुळे तसे संपुर्ण पुस्तकात ग्रामीण भाषाच वापरलेली आहे. मुळात लेखक हे स्वतः चांदोली धरण भागातले. त्यामुळे त्यांनी ग्रामीण भाषेचा बाज योग्यरीत्या सांभाळणे यात फारसे आश्चर्य नाहीच. यात त्यांना स्वतःला आलेले अनुभव सुद्धा त्यांनी मांडले असतीलच. खरेतर त्यांना तुम्हाला हे पात्रे कुठे भेटलीत का? असे विचारावे वाटते. त्याशिवाय विश्वास पाटील स्वतः प्रशासकीय सेवेत आहेत. त्यादरम्यानच्या काही अनुभवांचे येथे चित्रण झाल्याचे जाणवते. त्यांनी स्वतः जिल्हाधिकारी म्हणुन काम केलेले आहे. असे असतानाही त्यांनी आपल्या व्यवस्थेत असलेला भ्रष्टाचार लपवलेला नाही किंवा नोकरदारांच्या वागण्याचे कुठे समर्थन केलेले नाही. त्याचसोबत काही चांगले अधिकारी परिस्थिती कशी बदलु शकतात याचे उदाहरणही ते आपल्याला दाखवतातच. धरणग्रस्तांचे होणारे हाल वाचकाला पुस्तकाशी बांधुन ठेवतात त्याच वेळेस त्याच्या समोर अनेक प्रश्न सुद्धा निर्माण करुन जातात. हा धरणग्रस्तांना एवढे सोसण्याची ताकद कुठुन मिळत असेल?? एकीकडे आपण वर्ल्ड ईज फ्लॅट असे ओरडत आहोत त्याच वेळेस ही परिस्थिती अजुनही बदललेली नाहीए. ३०-४० वर्षापुर्वी झालेल्या धरणांच्यासाठी जमीनी दिलेली लोकांचे प्रश्न आजही सुटलेले नाहीत. समाजात खैरमोडेगुरुजी सारखे किती लोक असतात?? ह्या सगळ्यात आपण कुठे आहोत?? एकुणच इतकी वास्तवाचे दर्शन देणारी कादंबरी प्रत्येकाने एकदा वाचावेच असे वाटते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा