गुरुवार, जून १०, २०१०

साखरेचं खाणार!!!

"साखरेचं खाणार त्याला देव देणार", हे अस्मादिकांच्या बाबतीत एकदम खरं ठरतं.किंवा इंग्रजीत शुगरटूथ की का काय म्हणतात तोच घेऊन जन्माला आलो म्हणा ना!!! गोड पदार्थ म्हणजे आपला एकदम जीव की प्राण. अगदी लहानपणी मला आजी, आई सगळेजण गोडघाशा म्हणूनच हाक म्हणायचे. म्हणजे माझे गोडाचे वेड इतके होते की कधी कधी आई झोपल्यावर हळूच डबा काढून चोरुन साखर खायचो. बरेच वेळा पकडलाही जायचो.(अजूनही खातोच.. पण आता पकडला जात नाही. ;)) त्या साठी अगदी आईच्या हातचे धपाटे पण अनेक वेळा खाल्लेत. आता जर मला कोणी विचारले "तुझा आवडता गोड पदार्थ कुठला?" तर उडुप्याच्या हॉटेलातल्या पोर्‍यासारखी लांबलचक यादी म्हणून दाखवेन!!!!!

आमच्या गोड खाद्ययात्रेची सुरवात झाली जालन्यापासुन. आमचे घर अगदी भर चौकातच होते. घराचा खालीच एक हॉटेल होते. तिकडे रोज सकाळी खवा पोहचवायला दुधवाले यायचे. यातल्या दुधवाल्यांकडुन आई खवा विकत घ्यायची. मग व्हायचा तो गुलाबजामुन बनवायचा एक राजेशाही कार्यक्रम. गुलाबजामुन मी कितीही आणि केव्हाही खाऊ शकतो. एक मात्र खरं, आईच्या हातच्या गुलाबजामुनची चव कधी बाजारातल्या गुलाबजामुनला कधीच नाही येणार. आमच्या घराखालच्या हॉटेलाची आणखी एक खासियत म्हणजे बालुशाही. अप्रतिम अशी बालुशाही इथे मिळायची. माझ्या मुंजीच्या वेळेससुद्धा इथल्याच आचार्‍याकडुन बालुशाही बनवुन घेतलेली.

जालन्यातली अजुन एक आठवण म्हणजे आजीच्या हातच्या पाकातल्या पुर्‍या. आहाहा!!! आतापण त्या पुर्‍यांची चव जीभेवर रेंगाळतेय. आजी अनारसे पण मस्त करायची. एकदा आमच्या ओळखीच्या जोशी काकूंकडे गेलो होतो. त्या खाली जमिनीवर बसून स्टोव्ह समोर ठेऊन अनारसे करत होत्या. त्याचा दुसर्‍याच दिवशी आईच्या मागे लागुन अनारसे बनवायला लावले. माझ्या हट्टापायी आईने अनारसे बनवले. पण मी ते खायला तयार नव्हतो. कारण काय तर आईने जोशीकाकूंसारखे खाली बसून अनारसे नव्हते बनवले. :D तसं जालन्याला मला बाहेरचे गोड खाल्याचं आठवत नाही.

बाबांच्या होणार्‍या सततच्या बदलीमुळे अमरावती-नागपुर्-अमरावती असा प्रवास घडलाच. त्यामुळे जिथे जिथे राहिलो, तिथं कुठे काय छान गोड मिळतं, याची एक जंत्रीच आहे म्हणा ना माझ्याकडे. जसं अमरावतीच्या रघुवीर मिठाईयाँ मधली काजुकतली तर अप्रतिमच होती. नागपुर मधे खाल्लेली हल्दीरामच्या सोनकेकची चव अजून आठवते. त्यावेळेस हल्दीराम अमेरिकेत पोहचले नव्हते. चिखलदर्‍या जवळ मेळघाट मधे सेमाडोह येथे जी रबडी खाल्ली तशी रबडी आजगायत नाही खाल्ली हो!! त्यानंतर औरंगाबाद मधे मिलन मिठाई मधली बर्फी किंवा अप्पा हालवाईचा पेढा जबरदस्त होता. उत्तममधल्या सारखी इमरती तर कुठेच मिळत नाही. आजही औरंगाबाद ला गेल्यावर बरेच वेळा उत्तममध्ये जाऊन इमरती घेऊन येतो.

पेढ्यावरुन आठवतो तर कुंथलगिरीचा प्रसिद्ध पेढा. हो हो.. तोच तो. अनासपुर्‍यांच्या मक्याने प्रसिद्ध केलेला.. (च्यायला, याच्या नावांत पण पुर्‍या याव्यात का?) कुंथलगिरी बीड जिल्ह्यातले एक छोटेसे गाव. पण तिथला कलमी पेढा म्हणजे काय विचारुच नका. ह्या गावावरुन कुठेतरी एकदा गेल्याचे आठवते. हायवेच्या दोन्ही बाजुला फक्त खव्याची व चक्क्याचीच दुकानं. हे कुथंलगिरीचे प्रसिद्ध पेढे खुलताबादच्या भद्रा मारूती मंदिरातसुद्धा जाऊन पोचलेत. भद्राला गेलो आणि पेढे आणले नाहीत असे कधीच झाले नाही. पेढ्याची आणखी एक आठवण म्हणजे आंबाजोगाईतील योगेश्वरी देवीच्या मंदिराबाहेरील कलमी पेढे. घरात पेढे आणलेले असले तर आईच्या हातात यायचा तो रिकामा डब्बाच.

गोड म्हटले की काय बोलू नि काय नको असे होऊन जाते बघा..हेच पहा ना, सगळं लिहिलं, पण माझ्या सगळ्यात आवडत्या पदार्थांबद्दल कुठे काय बोललो? तर, सगळ्यात महत्त्वाचे दोन गोड पदार्थ म्हणजे पुरणपोळी आणि श्रीखंड. आमच्या घरात सगळेच पुरणपोळीचे शौकिन. घरी पुरणपोळी वर्षातुन कितीही वेळा बनवली तरी नेहमी आईला त्रास द्यायला मी म्हणणार, "पुरणपोळी खाऊन खुप वर्ष झाली ग आई". नि मग तिने पटकन पोळ्या बनवायला घ्याव्यात हे पण आलेच. :) होळी, श्रावणातला शुक्रवार, नवरात्रात नवमीला, पुरणपोळी बनतेच बनते पण सर्वात वेगळ्या चवीची बनते ती फक्त महालक्ष्मीच्या (गौरीच्या) नैवेद्याची!!! आमच्याकडे नेहमी स्पर्धा लागते कोण सगळ्यात जास्त पुरणपोळी खाते याचीची. जिंकतो अर्थात मीच. पण ती तव्यावरुन गरम सरळ पानात वाढलेली त्यावर मस्त तुपाची धार सोडलेली पुरणपोळी मी कोणत्याही वेळेस खाऊ शकतो. तशीच शिळी झालेली पुरण पोळी पण मी कितीही पोट भरलेले असेल तरी खाऊ शकतो.

श्रीखंड मला आवडते ते चक्क्यापासुन घरी बनवलेले. काही ठराविक दिवशी श्रीखंड बनलेच पाहिजे असा अलिखित नियमच आहे म्हणा ना!!! मग माझ्याकडे यातली दोन कामं येतात. एक म्हणजे औरंगाबाद्ला भावे आणि कं कडुन चक्का घेउन येणे आणि दुसरे म्हणजे चक्का पुरण यंत्रातुन काढुन देणे. साखरभात हाही माझ्या आवडत्या पदार्थापैकी एक आहे.

काही विचित्र पदार्थ सुद्धा मी गोड खायची इछा झाल्यावर खातो. दाण्याचं कुट-साखर ही त्यातलीच एक. कधी गोड खायची इच्छा झाली व काहीच सापडत नसेल तर सरळ वाटीत शेंगदाण्याचं कुट घ्यायचं, त्यात थोडी पिठी साखर टाकायची किंवा साधी साखर टाकायची झाली, की आमची स्वीट डिश तयार. याच प्रकारचा शेंगदाण्याचा लाडु, साबुदाण्याचे लाडु असं काहीही कधीही मला चालतं. एक गडगिळ नावाचा पदार्थ आहे, त्याची पाककॄती मला माहित नाही, पण गुळ आणि कणिक ह्या पासुन बनवतात असे वाटते. आजीच्या हातचा खाल्लेला तो पदार्थ आजही आठवतो. तसं म्हणायचे तर फक्त खीर हा प्रकार मला फारसा काही आवडला नाही. आता बंगाली मिठाई वगैरे खातो पण ती सुद्धा फारशी आवडत नाही.

अरे ह्या सगळ्यात आईच्या हातचा कलाकंद राहिलाच. दुध नासले की मी नाचायचो आता कलाकंद मिळणार म्हणुन. तसेच फक्की हा प्रकार म्हणजे तर विचारु नका. शाळेत असताना डब्ब्यात फक्की कितीदा नेली असेल सांगता येत नाही.
पाहिलंत, नुसतं गोड गोड म्हणेपर्यंत इतके विचार डोक्यात आले.. अजून लिहायला बसलो तर आणखी खूप होईल. पण मग तोवर समोर चितळ्यांची आंबा बर्फी बिचारी टुकूटुकू माझी वाट पाहातेय त्याचे काय?? आलोच जरा तिचा 'समाचार' घेऊन!!!

७ टिप्पण्या:

 1. निखिल
  रघुविरची कचोरी, आणि सांबारवडी, गौदुग्ध सागरच्या मागच्या गड्ड्यातले गुलाबजाम, जवाहर गेट जवळ एक दुकान आहे तिथली जिलबी+ मुगाची भजी, भोलाचा पेढा ( अंबागेट जवळचा) अमरावतीच्या तर खूप आठवणी आहेत. अजूनही अमरावतीला गेलो की सरळ रघुविरकडे जाउन कचोरी खाल्याशिवाय परत येत नाही. रघुविर शाम टॉकिज जवळचं..
  दुखती रग छेडलीत तुम्ही..

  उत्तर द्याहटवा
 2. आणि रबडी साठी, नागपुरच्या पुढे तिस किलोमिटरवर असलेले ते मौदा.. तिथली एकदम खल्लास!!! मस्त असते एकदम.

  उत्तर द्याहटवा
 3. धन्यवाद महेंद्रजी

  रघुविरची कचोरी, आणि सांबारवडी
  अरे काय आठवण काढली तुम्ही.. खरे तर लिहितानाच सांबारवडी आठवली होती पण लेख गोडाबद्दल होता म्हणुन लिहिणे राहुन गेले. गड्डा हॉटेलचे गुलाबजाम सुद्धा तसेच :(
  छे अमरावती सोडुन ईतके वर्ष झाले एकदाही परत गेलो नाहीए.

  उत्तर द्याहटवा
 4. गडगिळं
  साहित्य : कणीक, मीठ चवीपुरते, मोहन म्हणून तेल, गूळ, तूप.
  कृती : कणकेत चवीपुरते मीठ व तेलाचे मोहन घालावे. कणीक तिंबून दहा ते पंधरा मिनिटे ठेवावी. नंतर त्याचे गुलाबजामसारखे गोळे करावेत. पातेल्यात तूप घालून त्यात हे गोळे लालसर परतून घ्यावेत. परतलेले गोळे पातेल्यात काढून घ्यावेत. त्यानंतर पातेल्यात मंद आचेवर तूप व गूळ यांचा पाक करून घ्यावा. त्यामध्ये परतून घेतलेले कणकेचे गोळे टाकावेत. सर्व गोळे पाकात भिजतील, याची काळजी घ्यावी.
  गडगिळं हे नाव जरा वेगळे वाटेल. मराठवाड्यातील माणसासाठी हे नाव चांगलेच ओळखीचे आहे. गडगीळं गुलाबजामसारखे दिसतात. त्यामुळे या पदार्थाला गरिबांचे गुलाबजामही म्हणतात. यासाठी फार वेगळ्या साहित्याची आवश्‍यकता नसते. गडगिळं हा कमी वेळेत तयार होणारा पदार्थ आहे. कणकेतून कॅलरीज व गुळातून लोह मिळते. पीठ तिंबताना तेल टाकले जाते. त्यामुळे तुपात परतलेले कणकेचे गोळे खुसखुशीत होतात.

  http://72.78.249.126/esakal/20100526/images/5273362185864806890/4739087208835428331_Org.jpg

  copied from eSakal

  उत्तर द्याहटवा
 5. कुठ फेडशील हे पाप? :P
  रात्रीच्या अडीच वाजता हॉस्टलवर ही पोस्ट वाचतोय....
  गडगिळ = गटकण गिळल... माझा आवडता पदार्थ...
  काहीही जास्त लिहीत नाही आता....
  पण आईची खूप आठवण येणार आज रात्री..... :(

  उत्तर द्याहटवा
 6. च्यायला .. वाचता वाचताच लाळ गळायला लागलीय!
  आता पुण्याला रेल-वे नी यायला शीका .. म्हणजे चिक्की काय चीज असते ते पण कळेल ..
  कसें?? :-)

  उत्तर द्याहटवा