गुरुवार, जून ०३, २०१०

स्टे हंग्री स्टे फूलिश्...


 

पुस्तक :Stay Hungry Stay Foolish 

लेखक:Rashmi Bansal 

किंमत:  125.00 

प्रकाशक: CIIE

 


 "Stay Hungry Stay foolish" ह्या ओळी पहिल्यांदा ऐकल्या त्या अ‍ॅपलचे प्रमुख स्टिव जॉब्स ह्यांनी स्टॅनफॉर्ड युनिव्हर्सिटीत केलेल्या भाषणात. ह्याचा अर्थ सांगायचा माझा प्रयत्न नाहिए पण याच नावाचे एक पुस्तक मध्यंतरी वाचले त्याबद्दल आज ईथे सांगणार आहे. हे पुस्तक रश्मी बन्सल ह्यांनी लिहिलेले आहे. रश्मी ह्या स्वतः आय. आय. एम, अहमदाबादच्या माझी विद्यार्थिनी आहेत तसेच त्या JAM ह्या मासिकाच्या संपादिका आहेत. ह्या पुस्तकाच्या आतापर्यंत एक लाख प्रती विकल्या गेल्या आहेत. तर ह्या पुस्तकात काय आहे खरे??
आय आय एम अहमदाबद मधुन एम. बी. ए. चे शिक्षण घेउन ज्यांनी उद्योजकतेचा मार्ग निवडला अशा २५ उद्योजकांची कहाणी आहे हे पुस्तक. ह्या पुस्तकातील लेखन प्रकार हा संभाषण स्वरुपाचा आहे. ह्यात आधी लेखिकेने प्रत्येक उद्योजका बद्दल थोडी माहिती नंतर त्या उद्योजकासोबत झालेला संवाद आणि त्यानंतर ह्या उद्योजकांकडुन इतरांना काही सल्ला. हे पुस्तक तीन विभागात विभागले गेले आहे:

१) The Believer:- या भागात अशा काही व्यक्तींचा समावेश करण्यात आलेला आहे ज्यांनी आय आय एम मधुन बाहेर पडताच उद्योगाचा क्षेत्रात उडी घेतली. यात संजीव भिकचंदानी (नोकरी.कॉम), शंतनु प्रकाश (एड्युकॉम्प),अशंक देसाई (मास्टेक)ईत्यादी लोकांचा समावेश केलेला आहे.
२)The Opportunists: या भागात आयुष्यात आलेल्या संधीचे सोने केलेल्या काही व्यक्तींचा समावेश करण्यात आलेला आहे. यात दिप कालरा (मेक माय ट्रिप्.कॉम), रशेश शहा (Edelweiss Capital), निर्मल जैन (इंडिया ईन्फोलाईन) येतात.
३) People having alternate vision: या भागात अशा काही व्यक्तींचा समावेश केला आहे ज्यांनी उद्योजकतेच्या आधारे समाजात काही बदल करायचा प्रयत्न केला, ज्यांनी पैशापेक्षा समाजाला जास्त महत्व दिले. यातली काही नावे म्हणजे वर्दन काबरा (फाउन्टन्हेड स्कुल) आणि वेंकट क्रिश्नन (गिव्ह इंडिया).

या पुस्तकातल्या काही लोकांबद्दल सांगायचे झाले तर सगळ्यात आधी मला ही कहाणी आठवते. ही कथा आहे एका उद्योजकाची, ज्याने एम.एन.सी. मधे नोकरी स्वीकारण्या ऐवजी आपल्या गावी साखर कारखाना उभा केला. हे करण्याआधी त्यांची असलेली बायोपेस्टीसाईडची कंपनी बंद केली, त्याचे कारण त्या कंपनीचा असलेला फक्त ५ करोड हा टर्न ओव्हर. त्यानंतर त्यांनी सुरु केलेली नवी कंपनी म्हणजेच श्री रेणुका शुगर्स. आज या कंपनीचा टर्नओव्हर काही शे करोड मधे नक्कीच आहे.

अजुन एक कथा आहे ती आर. सुब्रमनियन यांची. आय.आय.टी. मद्रास मधुन इंजिनियरिंग पुर्ण केल्यानंतर त्यांनी आय आय एम अहमदाबाद मधे प्रवेश घेतला. तिथुन बाहेर पडत असतानाच त्यांना सिटीबँन्क मधे नोकरी मिळालेली असते. पण त्यांच्यामधली चांगले काही करायची इच्छा त्यांना शांत बसु देत नाही. आणि त्याच चांगले काही करण्याचा इच्छेमुळे पुढे "सुभिक्षा" या रिटेल चेन ची सुरवात झाली. अर्थात या पुस्तकाच्या पुढच्या आवृत्तीत त्यांचे नाव येईल का नाही ते पण पहावे लागेलच.

या पुस्तकात या उद्योजकांनी भावी उद्योजकांना दिलेले सल्ले सुद्धा चांगले आहे. एकुणच ज्यांचा मनात स्वत:चे काही करायचे स्वप्न आहे अशा लोकांनी हे पुस्तक नक्कीच वाचावे. या पुस्तकात मला मुख्यत्वे दोन बाबी खटकल्या: सर्व प्रथम लेखिकेची भाषेची निवड. प्रत्येक दोन चार वाक्यामागे एक हिंदी वाक्य टाकण्यात आलेले आहे. त्यामुळे वाचणार्‍याचा विरस नक्कीच होतो. अजुन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे या पुस्तकातले सगळेच उद्योजक हे आय.आय.एम. अहमदाबद या खुप मोठ्या दुव्याने बांधलेले आहेत. या लोकांकडे आधीच आय.आय.एम. सारखा ब्रॅण्ड होता. त्यांचा ओळखी होत्या. त्यामुळे त्यांना अडचणीमधे मदत मिळवणे जास्त सोपे होते असे वाटते. उलटपक्षी जर एखादा सामान्य माणुस साधारण शिक्षण असलेला जेव्हा यशस्वी होतो त्याची कथा वाचणे जास्त स्फूर्तीदायक असते असे माझे मत आहे. असे असले तरी स्टे हंगरी स्टे फुलिश मला वाचायला आवडले..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा