शनिवार, मे १५, २०१०

कॉलनी

पुस्तक : कॉलनी

पारधे सिद्धार्थ 

किंमत:150.00 

प्रकाशक: लक्ष्मण भागाजी पारधे चॅरिटेबल ट्रस्ट 

पृष्ठसंख्या: 192

 
मागे एकदा टी व्ही वर सिद्धार्थ पारधे ह्यांची मुलाखत पाहिली होती तेव्हा पासून कॉलनी वाचायचे मनात होतेच. मागच्या पुस्तक खरेदीच्या वेळेस हे पुस्तक समोर दिसले... सहज चाळून पाहत होतो तेव्हा मलपृष्ठावर विंदाच्या हस्ताक्षरात लिहिलेले पत्र दिसले. तिथेच त्याच वेळेस हे पुस्तक विकत घ्यायचे ठरवले आणि लगेचच वाचूनही संपवले. ह्या पुस्तकाबद्दल उत्सुकता असण्याचे सगळ्यात महत्त्वाची दोनच कारणे: एक तर मराठीतल्या नावाजलेल्या साहित्यिकांच्या संबंधी असलेले हे पुस्तक आणि त्याच सोबत सचिन तेंडुलकर बद्दल असलेलं एक खास वेगळे प्रकरण. तर ही कथा आहे कॉलनीतल्या वॉचमनच्या आणि कॉलनीत भांडे घासणार्‍या स्त्रीच्या मुलाची. पण ही कोणती कॉलनी??? ह्या पुस्तकातली कॉलनी म्हणजेच मुंबईतले वांद्रे येथील प्रसिद्ध साहित्य सहवास!!!
या पुस्तकाची कथा सुरू होते ती औरंगाबाद/ जालना जिल्हातल्या रस्त्याचा बांधकामावरून... लेखकाचे आई वडील हे तिथे दगड फोडायचे काम करत असतात. चांगल्या रोजगारीच्या संधी शोधत हे कुटुंब मुंबईत येते.. इथे काही दिवस नातेवाईकांकडे काढले जातात.. मोठे कुटुंब आणि झोपडपट्टी मधले जीवन ह्यामुळे त्यांच्या घरच्यांचे आणि नातेवाईकांमध्ये काहीतरी कुरबुरी होवून त्यांना बाहेर पडावे लागते. त्याचवेळेस लेखकांच्या वडलांना कोणीतरी बांद्रा येथे एका वसाहतीचे काम चालू आहे तिथे काम मिळू शकते असे सुचवते. तिथे काम मिळवण्यासाठी लेखकाचे वडील एकाच दगडावर दिवस भर बसून राहतात तेव्हा कुठे त्यांना साहित्य सहवासच्या बांधकामावर बिगारी म्हणून काम मिळते. अश्याप्रकारे सिद्धार्थ पारधे ह्यांचे कुटुंब साहित्य सहवास मध्ये राहायला येते. इथूनच खरी सुरूवात होते त्यांचा प्रवासाला. एका वॉचमन चा मुलगा ते आज एल आय सी मधले उच्चपदस्थ अधिकारी असा त्यांचा प्रवास नक्कीच वाचनीय आहे.
लेखकाच्या ह्या प्रवास सांगताना त्यांनी केवळ स्वतःकडे मोठे पणा घेतलेला नाहीच तर त्या सोबत त्यांचे आई वडील आणि साहित्य सहवास मध्ये राहणारे कुटुंब ह्यांचा बद्दल ठिकठिकाणी कृतज्ञता व्यक्त केलेली दिसते. असे करत असताना लेखक अनेक दाखले देतोच. कॉलेज मध्ये असताना कुटुंब मोठे राहायला जागा झोपडपट्टीत अश्या वेळेस लेखक साहित्य सहवास मधल्या अभंग बिल्डिंगच्या गच्चीवर राहत असतो, तिथेच अभ्यास करतो खरे तर ही बाब अभंग च्या रहिवाशांना नक्कीच माहीत असते पण त्याबद्दल त्यांना कोणी कधीही विरोध केला नाही उलट वेळोवेळी शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आलेलेच लेखकाने नमूद केलेले आहे.
ह्याही पुढे जाऊन लेखक आपण जेवायच्या/नाष्टाच्या वेळेस मुद्दाम साहित्य सहवास मधल्या मित्रांच्या घरी जाऊन बसत होतो ही प्रांजळ कबुली देतो. सचिन तेंडुलकर बद्दल ह्या पुस्तकात एक वेगळे प्रकरणच आहे. सचिन, तेंडुलकर कुटुंबीय, त्याच्या क्रिकेटच्या मॅचेस, मंतरल्यासारख्या नि झपाटल्यासारख्या रात्री जागून ऐकलेला मॅचेस आणि असं बरंच काही. पारधेंच्या बाबांच्या मृत्यूनंतर तो सहकुटुंब सांत्वनासाठी आला होता हाही त्याच्या मनाच्या मोठेपणाचा दाखलाच. त्यांच्या त्या पडत्या काळात त्यांना गिरीजा कीर, विद्या बाळ, राजाध्यक्ष बाई, समवयस्क मित्र असे सगळ्यांचेच साहाय्य लाभले नि म्हणूनच त्याचा सध्याचा आयुष्याबद्दल लेखक म्हणतात की आज त्यांचा कडे आहे त्यात त्यांना साहित्यिकांच्या पक्षी कॉलनीतल्या चांगल्या सहवासामुळे आणि आधारामुळे आज ते ह्या पदावर पोहचू शकलेले आहेत.
लेखनाच्या ओघात काही ठिकाणी पुर्नरोक्ती सापडते पण ह्या बद्दल लेखकाने आधीच माफी मागितली आहे. एकुणंच कॉलनी वाचनीय आहे असे म्हणावेस वाटते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा