सोमवार, फेब्रुवारी १५, २०१०

वावटळ

आज नेहमी प्रमाणे एक प्रश्न माझ्या मनात रेंगाळत आहेच... कुठे जायचे.... खरे तर ह्या प्रश्नाचे उत्तर मला माहीत नाहिये कारण निरर्थक भटकायचे म्हणूनच मी घरातून निघालेए??? आता मला खरंच कळत नाहिए का घराबाहेर पडले आहे???.... असे काय घडले आहे आज??? "आज"... आताश्या तर हे रोजचेच झाले आहे, कंटाळा आला आहे ह्या जगाचा... वाटते सगळे संपवावे!!! पण त्यातून काय हशील होणार??? का मी हे जीवन संपवावे??? त्यातून मला काय मिळणार??? त्रासातून सुटका होईल... बरे ज्यांचा कडून त्रास दिला जातोय ते कोण आहेत तर माझे सगेसोयरे... का हे लोक मला समजावून घेऊ शकत नाहीत...

लग्नाचे वय ओलांडले तरी माझे लग्न जमत नाही ह्यात माझा खरे तर काय दोष???? पण हे कोणीही समजावून घेत नाही... समाजात लग्न न करिता राहणे हे स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या मुलीला एवढे अवघड आहे का??? आज मी नवऱ्या नावाच्या प्राण्याशिवाय जगू शकते हा विश्वास नक्कीच माझ्या मध्ये आहे. पण घरचे.. त्यांनी हे समजावून घ्यायला नको का??? आईने कष्ट करत सौंसाराचा डोलारा सांभाळला... तीच्या कष्टामुळेच आज मी शिकून मोठी झाले आहे... जे काही आहे ते फक्त आणि फक्त तीच्याच मुळे.... पण आजकाल तीही विचित्र वागायला लागलेली आहे.... दिवसातून ४ वेळा फोन करून विचारते त्या मंत्राचा जप केलास का??? मंत्र कोणी दिला तिला हा??? आणि का सांगितले की ह्या मंत्राच्या पठणाने माझे लग्न जमणार आहे???? सगळे सांगतात लग्न जमण्यासाठी पोरीच्या जातीने थोडे तरी ऍडजस्ट करायला पाहिजे!!!! आहो पण किती??? आणि काय काय म्हणून??? माझ्या पेक्षा वयाने मोठा असलेला मुलगा जेव्हा तोंड वर करून मला विचारतो माझे लग्न का झाले नाही अजून??? अरे तो तर माझ्या पेक्षा वयाने पाच दहा वर्ष मोठा आहे??? त्याचे का नाही जमले लग्न??? त्याचा का कोणी असे हात धुऊन मागत नाही???? कॉंम्प्रमाईज करायचे पण किती आपल्या पेक्षा अर्ध्या पगाराच्या माणसाशी मी का म्हणून लग्न करायचे??? हे असेच ह्या समोरून येणाऱ्या रहदारी मध्ये चालत जावे आणि सगळे संपवावे....

खरेच इतके कठीण आहे का मला समजावून घेणे... माझ्या अपेक्षा फार माफक होत्या... सुरवातीला ह्या सगळ्या प्रकाराला मी पण न कंटाळता पुढे जात होतेच... एक नवरा नावाचा हक्काचा खांदा मिळावा हे माझे पण स्वप्न होतेच ना... इतर मुलींसारखे मी पण ती कांदेपोह्यांची प्लेट थरथरत्या हाताने पाहुण्यांना दिलेली आहे.... पण जसे जसे आयुष्य पुढे सरकत गेले तसे माझे मन ह्या गोष्टीतून उठत गेले.... कशासाठी दरवेळेस एका नवीन मुलासमोर नटून थटून उभे राहावे???? बरे ते करायची तयारी ठेवली तरी समाज शांत बसू देतो का??? घरचे तर चिंते पोटी बोलतात..... पण ज्यांचा काही संमंध नाही असे लोक पण लग्न का होत नाही ह्याचा जाब मला विचारतात... ऑफिसात.. मैत्रिणीचा घरी... गल्लीत... नातेवाईकांमधे नेहमी एकच प्रश्न लग्न कधी करणार???? एकदाचे मोकळे व्हावे ह्यातून... कुणीच नाहिए का ह्या जगात माझे जे मला समजावून घेईल??? माझ्या मैत्रिणी सुद्धा मला ह्यांवरून छेडतात... काहींना खरी चिंता तर काहींचा ढोंगी पणा.... शेवटी आता चालताना लक्षात येत आहे ती एकच गोष्ट

"My shadow is the only thing that wals beside me
my shallo hearts is the only thing thats beating"

कुठवर चालत आलेली आहे मी..... किती वेळ झाला असेल??? का चालत आहोत आपण??? जीव देण्याची हिंमत आहे का आपल्यात??? खरे तर जीव देणे हे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही हे मान्य पण ह्या संधिप्रकाशातून मी अंधकाराकडे जात आहे पण... हे काय होतंय... माझ्या आजूबाजूला एवढी गाड्यांची गर्दी का आहे??? अरे बापरे!!! मी रस्त्याच्या मधून चालतेय!!!! आणि हे लाइट्स कसले??? ती बस माझ्या कडे का झेपावत आहे... आईssss!!!!... हे काय होत आहे??? कोण मला खेचते आहे??? कोण हा मुलगा?? माझ्या डोळ्या पुढे अंधारी का येत आहे??? ....

(एकविसाव्या शतकात सुद्धा परिस्थिती फारशी बदललेली नाहिए.... अश्या घटना बरेच वेळा घडतात. )कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा