सोमवार, फेब्रुवारी १५, २०१०

हे बंध रेशमाचे..२

असाच एका विकेंडला आपला चिल्का सरोवर बघायला जायचा प्लॅन होता.... सकाळी मला लवकर उठवायचे कठिण काम तूच फोन करुन केले होतेस. बस तुमच्या बिल्डिंग जवळून सुटणार होती. मी सगळे आवरुन धावत पळतच पोहचलो होतो... बस मधे चढलो तर नेहमी प्रमाणे तु तुझ्या बाजुच्या खुर्चीवरची बॅग उचलून घेतलीस.. नेहमी पेक्षा आज तू वेगळीच वाटत होतीस... बस सुरु झाली आणि एक एक करुन गाणे बजावणे सुरु झाले... बस मधे काय दंगा घातला होता आपण..!!! त्यात सगळ्यात पुढे आपणच दोघेजण होतो हा भाग वेगळा..... मी माझ्या भसाड्या आवजात "प्रथम तुज पाहता" गायला लागताच तुझे ते हसणे आणि नंतर ते लाजणे आजही मला चांगलेच आठवते.... ह्या गाण्याचा वेळेसच मी ठरवले आजच तुला विचारायचे... आपण चिल्काला पोहचलो तिथे मोठ्या बोटीत बसुन डॉल्फिन बघुन आलो.. आणि नंतर कुणीतरी पायडल बोटिंगला जायचे असे ओरडले आणि मग सगळेच तिकडे निघालो... आपण तिथे पोहचेपर्यंत तिथल्या चार माणसांच्या पॅडल बोटस् सगळ्यांनी ढापल्या.. नि आपल्यासाठी दोन लोकांचीच बोट शिल्लक राहिली... न ठरवताच बर्‍याच गोष्टी मला हव्या तशा घडत होत्या!!! नेहमी प्रेमाणच तू तिथे खुललेली होतीस... आपण किनार्‍यापासून बरेच लांब आल्या नंतर अचानक मी बोट थांबवली... तुझ्याकडे बघुन हसलो... अभावितपणे तू पण हसलीस.. मग हळूच मी तुला म्हणालो.. मला तुला काही सांगायचे आहे.... तु अचानक शांत झालीस.. "मी तुझ्यावर प्रेम करतो"!!! तू आधी एक मंद स्मित केलेस आणि म्हणालीस,"चल रे जाउयात" तू उत्तर द्यायचे टाळलेस.. मी परत विचारले तरी उत्तर दिले नाहीस.. आपण तिथून परत निघुन बस मधे परतलो तरी तू शांतच होतीस... परतीच्या प्रवासात आपण एकदाही एकमेकांशी बोललो नाही.. दुसर्‍या दिवशी सकाळी ऑफिसला जाताना बस मधे चढलो पण तुझ्या बाजुला माझ्यासाठी जागा नव्हती... आपण ग्रुप मधे सोबत असायचो पण तू माझ्याशी बोलायचे टाळायचीस... आपल्या ट्रेनिंगच्या शेवटच्या दिवशी मात्र तू माझ्याशी बोलायला आलीस.. "माझे प्रेम म्हणजेच सगळे काही आहे असे समजु नकोस.. मला प्रेमात पडणे शक्यच नाही... मला माझ्या घरच्यांच्या मनाप्रमाणेच लग्न करायचे आहे" एवढे सांगून तू निघून गेलीस.
ट्रेनिंग नंतर आपण सगळेच मुंबईत आलो... पहिल्याच दिवशी आपल्याला वेगवेगळे प्रोजेक्ट्स मिळाले... त्यामुळे आपला कॉन्टॅक्ट कमी झाला.. आधी तू माझ्या आसपास तर असायचीस पण आता आपले भेटणे केवळ एखाद्या विकेंडला जेव्हा सगळा ग्रुप जमायचा तेव्हाच.. त्यातही तुझा मला टाळण्याच प्रयत्न असायचा... कधीच तू मला बोलायची संधी दिली नाहीस.. तसे मला तुझ्या बद्दल इतरांकडून कळायचे.. पण अजुनही तुझ्या कडुन मला समाधानकारक उत्तर मिळालेच नाही. असेच दिवस जात होते आपल्या भेटी कमी होत होत्या... त्यातच आला तुझा वाढदिवस... खरे तर तुला भेटायची खुप इच्छा होती पण शक्य होईल असे मला वाटतच नव्ह्ते.. पण अजुन एक प्रयत्न म्हणुन मी तुला पुष्पगुच्छ पाठवायचे ठरवले... पुजाशी बोलुन मी एक बुके तुझ्या रुमवर पाठवला... तो पुजानेच रिसिव्ह केला.. तु घरी नव्हतीसच... संध्याकाळी घरी आल्या आल्या तुझा मला फोन!!! जाम चिडली होतीस... मी का बुके पाठवला??... तुला विसरुन जा वगेरे अनेक वेळा सांगितले... ह्या पुढे तुझ्याशी कोणताही संपर्क ठेवू नको असे पण सांगीतले... फार खचलो होतो गं मी...!!!

पुढे एक वर्ष आपला कोणताही कॉन्टॅक्ट नव्हता... खरे तर ठेवू नये अशी तुझीच इच्छा होती... तुझ्या पुढच्या वाढदिवसापर्यंत मी तुझ्याशी काहीच संपर्क ठेवला नव्हता... तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी पुजाचा मला फोन आला... "काय प्रेमवीर, आज पाठवणार का बुके???" असा खोचक प्रश्न विचारला.. खरे तर मला आता फारशी आशा उरलीच नव्हती.. पण पुजाच्या सांगण्यावरुन मी तुला बुके पाठवला... ह्यावेळेस दिवसभर फोन वर असल्यामुळे मी तुझा फोन नाही घेऊ शकलो... तु खुप चिडली असणार.. त्यांना कसे फेस करायचे हे मला कळत नव्हते.. शेवटी हिंमत करुन तुला फोन लावला... ह्या वेळेस तू खुप शांत असल्याचे तुझ्या पहिल्याच वाक्यात जाणवले... "मी का तुझ्यावर प्रेम करावे??? मी तर तुला नीट ओळखतही नाही... मग तुझ्याशी लग्न करायचा निर्णय कसा घेणार??? " असे काहीसे तुझे प्रश्न होते... माझ्या उत्तराने तुझे समाधान होत होते का हे मला कळत नव्हते... पण शेवटी आपण एकमेकांना जाणून घ्यायचे आणि त्यानंतरच तू माझ्यावर प्रेम करू शकतेस का नाही हे तू मला सांगणार असे आपले ठरले!!!
आज तुझा वाढदिवस होऊनही आता तीन महिने झाले आहेत... त्यादिवसा पासून आपण रोजच भेटत आहोत...रोज रात्री किती तास फोन वर बोलणे होतंय याचा हिशेबच नाही.. तुझ्या सोबत घालवलेला क्षणन् क्षण मला आठवतोय.. कुठे कुठे नाही फिरलो आपण मुंबई मधे... पुजाच्या मते आता तू परत पहिल्यासारखी खुलली आहेस... या तीन महिन्यात आपण एकमेकांना खुपच ओळखायला लागलो आहोत... आता एक क्षणही मला तुझ्या शिवाय घालवणे शक्य नाहीय... आणि आपण पुढचे आयुष्य एकमेकांसोबत छान व्यतित करू शकतो हा विश्वास आता मला नक्कीच आहे. म्हणूनच आज ह्या प्रेमदिनी मी तुला परत एकदा विचारतोय...
"माझ्याशी लग्न करशील??? तु माझी होशील का???"
तुझाच वेडा!!!

एवढे लिहुन झाले, लवकर पाठवायला हवे आता....
अरे,आता अशा अवेळी कुणी बेल वाजवली असेल???? बारा वाजायला पाचच मिनिटे बाकी आहेत ... मला बाराच्या ठोक्याला पाठवायचे होते!!!
थोड्याशा अनिच्छेनेच दार उघडले तर माझ्यासाठी एक धक्का होता... मिड-नाईट बुके डिलेव्हरी... आणि त्या सोबत एक नोट...

"माझ्याशी लग्न करशील????"
तुझीच वेडी!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा