सोमवार, फेब्रुवारी १५, २०१०

वाघोबा

काल रात्री टीव्ही वर "सेव्ह अवर टायगर" अशी काहीशी अ‍ॅड पाहिली तेव्हा पासून डोक्यात वाघोबाच होता... त्या जाहिरातीत नुसार फक्त १४११ वाघ उरलेत तुम्ही त्यांना वाचवू शकता असे काहीसे आवाहन होते. त्यात पुढे तो एअरसेल ह्या कंपनीने सुरू केलेले हे कँपेन आहे असे पण सांगितले... जाहिरातीत दाखवलेले वाघाचे पिलू मला आवडले.. तसे व्याघ्रदर्शन हा दुर्मिळच योग मानला जातो. म्हणजे पिंजऱ्यातले वाघ बघणे सोपे आहे हो. पण ह्या जंगलाच्या राजाला पाहायचे तर त्याच्याच जंगलात. पिंजऱ्यातले वाघाचे दर्शन अनेक वेळा अनेक प्राणी संग्रहालयातून घडत आलेले आहेच... त्यात आमच्या औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयातल्या पांढऱ्या वाघा पासून ते ओरिसा मधल्या नंदन कानन मधल्या खोट्या जंगल सफारी पर्यंत. नंदनकानन मध्ये एका मोठ्या भागाला तारांचे कुंपण घालून आत मध्ये वाघांना बंदिस्त केलेले आहे.. आणि ह्या भागाची बस मध्ये बसून सफर करून लुटुपुटुची जंगल सफारी अनुभवता येते. आता ह्याला लुटुपुटुची म्हणता येईल कारण पाच ते सहा वेगवेगळ्या वेळेस वाघ ह्या प्राण्याला जवळून पाहता आले आहे. अर्थात सगळे अनुभव बरेच जुने आहेत पण त्यातले काही आजही डोळ्या समोर आहेत.

अमरावतीला राहात असताना चिखलदऱ्याला जाणे वारंवार व्हायचे. चिखलदार हे परतवाड्या जवळचे हिलस्टेशन आणि मेळघाट टायगर प्रोजेक्टच्या जवळ आहेच. चिखलदऱ्याला जायला अमरावतीहून सकाळी निघायचे सुरवात भिमकुंड पासून करून शेवट सनसेट पाँईटला करायचा हा आमचा नेहमीचा कार्यक्रम. जर मुक्काम असेल तर मजा असायची. आमच्या ओळखीचा तिथला एक लोकल ड्रायव्हर होता त्याची खास ट्रॅक्स घेऊन तो आम्हाला जंगलात घेऊन जायचा. म्हणजे अगदी टायगर रिझर्व मध्ये नाही पण आजूबाजूला. आश्चर्य म्हणजे ह्या ड्रायव्हरला ऐकू कमी यायचे पण चिखलदरा घाटात गावात त्याचा गाडी चालवण्यात कुणीच हात धरू शकत नसे. असेच कधी तरी एकदिवसीय सहलीला अमरावतीला गेलो होतो. सोबत दर वेळेस गावाहून येणारे नवीन पाहुणे असत. तर असेच एकदा कमांडर किंवा ट्रॅक्स ज्याला फक्त साइडने ताडपत्री असायचे दार नाही अशी गाडी घेऊन प्रवास चालू होता... लहान असताना नेहमीचा हट्ट करून ड्रायव्हर शेजारची समोरची जागा मी पटकावली होतीच. परतीचा प्रवास चालू होता, गाडीत गाणी अंताक्षरी वैगेरे चालू होते... ड्रायव्हर ने जोरात ब्रेक दाबला... "साहेब वाघ" हे त्याचे उच्चार कानावर पडायच्या आधीच वाघ उजव्या बाजूला असलेल्या डोंगरावरून रस्ता ओलांडत होता. त्या लाइटच्या उजेडात पहिल्यांदाच बघितलेल्या मुक्त वाघाचे रूप म्हणजे काय वर्णावे.. आणि गाडी आणि माणसाची चाहूल लागूनही तो तसाच रस्त्याचा कडेला उभा होता. एकक्षण असाच गेला सगळे शांत त्याने आमच्या कडे वळून पाहिले आणि तो तसाच पुढे दरीत उतरून निघून गेला. हेच वाघाचे पहिले झालेले दर्शन.

ह्या चिखलदऱ्या पासून साधारण १५-२० किमी अंतरावर थोडे जंगलात उतरून गेल्यावर सेमाडोह नावचे गाव लागते. ह्या गावापासूनच मेळघाट व्याघ्रप्रकल्पात बस द्वारे जंगल सफारी करवून आणण्यात येते, साधारण दहा वर्षापूर्वी पर्यंत येथून चार वाजता एक आणि पाच वाजता एक अश्या दोन बसेस जंगल सफारी साठी सोडण्यात येते, इथे माझ्या आठवणी नुसार जंगलात सरकारी रिसॉर्ट सारखे काही तरी आहे. त्या रिसॉर्टच्या आवारातूनच बसेस सुटतात. तसे हे रिसोर्ट सुद्धा एका नदीच्या किनारी आहे असे काहीसे आठवते. ही बसची जंगल सफारी मी आठ ते दहा वेळा केली असेल पण त्या सफरीत मला एकदाही वाघाचे दर्शन झालेले नाही. पण असेच एकदा आम्ही दुपारी साधारण तीन वाजता इथे पोहचलो तिथल्या फॉरेस्ट ऑफिसरने माहिती दिल्या प्रमाणे चारची बस आधी पासूनच फुल्ल होती मग काय करायचे. त्यादिवशी जादा बस सोडणे शक्य नव्हते कारण एका गावकऱ्यावर वाघाने हल्ला चढवला होता व त्या गावकऱ्यास हॉस्पिटलात घेऊन जाण्यासाठी एक बस वापरण्यात आलेली होती. आता पाच च्या बस चे बुकिंग करून पुढे काय करायचे तर कोलकास रेस्टहाऊसला कडे जायचे ठरवले. तसे ह्या कोलकास गेस्टहाउन हे सेमाडोह पासून जवळच पण जंगलात एका शांत जागी सिपना नदीच्या किनारी आहे. इथून नदीचा व्हयू खूपच छान आहे, आणि नदीत पाणी प्यायला येणारे वाघ ह्या जागेहून बघता येतात. ह्या गेस्टहाउस मध्ये इंदिरा गांधी सुद्धा थांबल्या होत्या हि माहिती इथल्याचं गार्डने दिलेली आहे. हा तर आम्हाला सेमाडोह इथून जंगल सफारी मध्ये जागा न मिळाल्यामुळे कोलकास कडे जाताना रस्त्यात एका डोंगरावर गव्याचा कळप लागला... आम्ही गाडी थांबवून साधारणता त्या कळपापासून सेफ अंतरावर राहून पाहत होतोच. जिथे गवा असतात त्याचा आसपास नेहमी वाघ असू शकतो अशी माहिती स्थानिकांनी आम्हाला दिलेली होती. नेहमी प्रमाणे वाघाचे दर्शन न झाल्यामुळे पुढे जाण्यासाठी आम्ही निघालो दोन वळणे पुढे गेलो तोच काहीतरी रस्त्यावर असल्याची जाणीव झाली. परत एकदा रस्त्यावर दर्शन देणारा तो एक वाघ होता. साधारण पाने रो वाघ तरून असावा... गाडीची चाहूल लागताच वाघाने पटकन दरी कडे धाव घेतली. हे सगळे घडले असेल साधारण अर्धा मिनिटभरता. पण ते दर्शनही सुखावणारे होते. सेमाडोह ला परत आल्या आल्या आम्ही त्या फॉरेस्ट ऑफिसरचे आभार मानले.

आज पर्यंत व्याघ्रदर्शनाचा सगळ्यात चांगला आलेला अनुभव हा कान्हा नॅशनल पार्क (मध्य प्रदेश) मधला. आम्ही ज्यावेळेस गेलो होतो तेव्हाच ह्या टायगर प्रोजेक्ट मधल्या वाघांची संख्या १००+ होती. इथे जाऊन व्याघ्र दर्शन न घेता परत येणे म्हणजे दुर्दैवच. ह्या जंगलात तिथेच कुठे तरी एक म्युझियम आहे. सफारीला जाण्याआधी ह्या म्युझियम ला भेट दिली होती. त्यात एक आवाजासहित वाघाच्या शिकारीचे मॉडेल होते. अतिशय व्यवस्थित रित्या वाघाच्या शिकारीच्या वेळेस कसे बदल घडतात हे दाखवून दिलेले होते. तर ह्या जंगलात आमची सफर झाली ते एका ओपन रुफ जिप्सी मधून. जाळी नाही काही नाही तसेच तुम्ही जंगलाचा आनंद घेऊ शकता. जंगलातून जाणारी फक्त एक जीपवाट. आमच्या सफारीत आम्हाला बिबट्याचे पिले आधी दिसले होते पण बिबट्या किंवा वाघाचे दर्शन नव्हतेच. त्यातच समोरून येणाऱ्या जीपच्या ड्रायव्हरने आमच्या ड्रायव्हरला ह्या भागात वाघ दिसल्याची बातमी सांगितली. खरे तर त्या जीपच्या मागे मागे वाघ पाच दहा मिनिटे जीप वाटेवरून चालला असे काहीसे त्या जीप मधल्या लोकांनी सांगितले. आमची तर सफारी संपत आलेली पण आमच्या जीप ड्रायव्हरने आम्हाला वाघ दाखवायचे ठरवलेलेच होते. तडक जिप्सी वाघ दिसलेल्या भागा कडे वळवली. साधारणता एका जागी आल्यानंतर त्याने सगळ्यांना शांत राहिला सांगितले आणि उभे राहून तो इकडे तिकडे पाहू लागला. उजव्या बाजूला एक काळविटाचा कळप दिसत होता. त्यामुळे वाघ तिकडेच असण्याची शक्यता होती. सगळी कडे एक वेगळ्याच प्रकारची शांतता होती. अगदी त्या मॉडेल मध्ये दाखवल्या प्रमाणे माकडे झाडावर चढून एक वेगळाच आवाज काढून इतर प्राण्यांना सावध करत होती. आणि त्या काळविटाच्या कळपा मध्ये तर हलकल्लोळ माजला होता... कोण कुठे पळतंय कळत नव्हते. हे सगळे घडत होते ते आमच्या पासून १०० फुटावर. अगदी कातरवेळ का काय तसे वातावरण.. त्यातच गवतामागून काही तरी हालचाल जाणवली.. काळविटाचा कळप आधीच पांगायला लागला होता.. आणि अचानक त्याने मागे राहिलेल्या काळविटावर झडप मारली. आजही तो सीन डोळ्यापुढे घडला असेच वाटते. काही क्षणाचा रोमांच पण वाघाची शिकार अनुभवायला मिळाली. त्यानंतर बराच वेळ आम्ही तिथेच थांबलो गवतातून तो बाहेर पडेल म्हणून. अगदी काळविटाचा कळप परत त्या जागी आला जणू पंचनामा करण्यासाठीच. पण तो काही दिसला नाही. शेवटी वाघाच्या शिकारीचा अनुभव घेऊन आम्ही परतलो.

जाता जाता वाघाला वाचवणे गरजेचे आहे हे पटते पण त्यासाठी कोणता मार्ग योग्य ते कळत नाही. सुरवातीला लिहिलेल्या प्रोजेक्ट बद्दल अधिक माहिती इथे मिळेल. पण ह्यात वाघांची भारतातील संख्या १४११ सांगण्यात आलेली आहे. पण त्यासाठी जो माहितीचा स्रोत म्हणून देण्यात आला आहे.


ह्यानुसार भारतात २००० साली वाघांची संख्या ३६४२ होती. जर १० वर्ष ती अर्ध्यावर आली असेल तर व्याघ्र प्रकल्पांचा उपयोग काय??? ह्यावर त्या प्रोजेक्ट वाल्यांकडून अधिक माहिती मागवली आहे. पण ह्या प्राण्याला माझ्या पुढच्या पिंढ्यांनाही।यांनाही जंगलात पाहता यावे ही इच्छा आहेच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा