बुधवार, मार्च २४, २०१०

"बाळ्या म्हणे!!!" BPL

आज काही तरी अघटित घडणार असे सकाळपासून वाटत होतेच. सारखी मनात शंकेची पाल चुकचुकत होती. घरातून निघालो चार मजले खाली उतरून आल्यावर कळले आपण आय कार्ड विसरलो... झाssssले!!! परत चार मजले चढून आय कार्ड घेतले आणि खाली आलो. मग काय, आजचा दिवस काही तरी अघटित घडवणार असे वाटतच होते... ऑटो मिळायला वेळ लागला.. मिळालेली ऑटो रस्त्यात दोन वेळा बंद पडली. आज सकाळी कुणाचे तोंड पाहिले असा विचार मनात आला... पण मग तो लगेच काढून टाकावा लागला.. कारण काय विचारता??? अहो, सकाळी सकाळी ब्रश करताना स्वत:चेच तर तोंड पाहिले होते आरशात!!! तसाच ऑफिसला पोहचलो. डेस्क वर सेटल होत होतोच तितक्यात माझा फोन व्हायब्रेट झाला. फोन उचलतच होतो तोच अचानक वीज चमकली(?). मी घाबरलो पण नंतर लक्षात आले की मी बंद ऑफिसात बसलो आहे आणि दिवे चालू बंद झाले होते. असो. फोन हातात घेतला पाहतो तर काय,
"बाळ्या कॉलिंग"...
(बाळ्या कॉलिंग बाळ्या नाहिए हा), तेव्हाच मला कळले, ह्या शुभ(???) शकुनांचे कारण!!!
तर, हा बाळ्या आमच्या कॉलेजातला एक खास दोस्त... कॉलेजात कमी आणि "इंडियन" वर जास्त पडीक.. कोण म्हणतंय रे इंडियन बार आह? अरे इंडियन हे चहा चे फ़ेमस दुकान आहे.... कॉलेजातली सगळी बीडगँग तिकडे पडीक असायची. तर हा बाळ्या भलताच सुपीक डोक्याचा.. त्याच्या म्हणण्यानुसार आमच्या मॅकेनिकलच्या वर्गात अर्ध्यापेक्षा जास्त दगड आहेत... त्याने "दगड गँग" ची पण स्थापना केली होती. आता दगड गँग मध्ये मेंबर बनण्यासाठी नियम होता की एकदा तरी एक्स झाले पाहिजे... ह्या नियमामुळे जेव्हा आमच्या सारख्यांची गोची व्हायला लागली तेव्हा त्याने आम्हाला मानद सदस्यत्व बहाल केले होते. याची अजून एक सवय म्हणजे मुद्दाम बीडात नसणार्‍या लोकांसमोर बीडा च्या भाषेत बोलायचे... तसे त्याला जमत नाही पण उगाचच... तर असा हा आमचा बाळ्या..(याच्यावर आमचा फार जीव नाहीये!!!!) आता जास्त काही बोलत नाही, फकस्त फोन वरचे बोलणे खाली लिहितोय..

मी:- हॅलो
बाळ्या(माझे वाक्य पूर्णं व्ह्यायच्या आत) :- निख्या, काय करायलास??? बाळ्या बोलतोय बीडातून!!!
मी:- बोल रे बाळ्या, बीडात काय करायलास?, तू तर पुण्यात होतास ना? कोणत्या तरी परीक्षा देत...
बाळ्या:- अरे सध्या इथंच आहे बीडात, करंसी ट्रेडिंग करायलोय राव...
मी:- बाळ्या करंसी ट्रेडिंग?? ते म्हणजे आणखी रे काय???
बाळ्या:- तुझ्या सारख्या निरक्षर लोकांना नाही कळत ते!!! जाऊ दे राव, बरं ऐक. बीडात BPL यायंलय!!!
मी :- काय?? BPL वाले बीड मध्ये प्लँट टाकतायत??
बाळ्या: - अरे ते BPL नाही रे...... आता बीडाला Below poverty Line म्हणू नकोस नाही तर मार खाशील!!!
मी :- मग? हे BPL काय प्रकरण आहे???
बाळ्या:- आरं आता परवा तुझ्या औरंगाबादेत बाबूजींनी भरवली होती ना??? APL(Auranagabad Premier Leauge).... तशीच आमचीबी BPL (Beed Premier Leauge).
मी:- काहीही काय सांगतोस???
बाळ्या:- अरे गेल्या आठवड्यात MPL पण संपली...
मी:- MPL? म्हणजे काय Marathawada Premier Leauge का Maharashtra Premier Leauge???
बाळ्या:- नाही, मांजरसुंबा प्रिमियर लीग!!!
मी:- काय??? काहीही काय सांगत आहेस??? मांजरसुंबा घाटात मॅचेस खेळवल्या काय त्यांनी.
बाळ्या:- ते सोड, मला गेल्या आठवड्यात मोदीचा फोन आलता.
(आता बाळ्याला दुनियेत कुणाचेही फोन येऊ शकतात... अगदी ओबामा पासून ते काकां पर्यंत)
मी:- कोण मोदी.. नरेंद्र??? आता त्याने GPL काढले का कायं???
बाळ्या:- आता तुला GPL देइन, क्रिकेटचे बोलणे चाललंय मग कोण्चा मोदी फोन करणार??? तोच ललित?? आय पी एल वाला..
मी :- ह्म्म (मी मुद्दाम शेरेबाजी करायचे टाळले)
बाळ्या:- अरे तो काय म्हणणार??.. मीच त्याला म्हणालो बाबारे तुझ्या आयपिएल मध्ये जाहिराती साठी टीव्ही वाल्यांना टाइम भेटला नाही म्हणून तुम्ही आणला स्ट्रॅटिजिक ब्रेक पण तो पाच मिनिटे लै जास्त होतो ना....
मी :- तू त्याला असे म्हणालास??
बाळ्या:- अरे हो ना भौ.. त्याला सांगितले की त्या ५ मिनिटाला २ भागात डिवाईड कर आणि मग एक ९ ओव्हर च्या आसपास आणि एक १६ व्या ओव्हरच्या आसपास कंपल्सरी करुन टाक ना.. तेवढा वेळ नाचव तिथे पोरी आणि टीव्हीला दाखव जाहिराती.
मी :- गाढवा, म्हणजे त्यादिवशी ९ विकेट पडल्या नंतर फुकट तुझ्या मुळे जाहिराती पाहाव्या लागल्या ना!!!
बाळ्या:- अरं गप्प, दुसरी आयडिया तर लै भारी व्हती गड्या... त्याच काय आहे... दोन बॉल च्या मध्ये तुम्ही ते स्कीन छोटे करून वैगेरे जाहिराती दाखविता त्या सोबत मध्येच ग्राउंड मधल्या स्क्रीन चा फोटो घ्यायचा अन चिपकावय्ची जाहिरात...
मी:- अरे @#$@$, तो दोन बॉल च्या मध्ये येऊन हसणारा अक्षय कुमार पण तुझंच डोकं तर...
बाळ्या :- हौ न भौ!!!
मी :- बरे तुझे बी पी एल चे काय प्लॅन्स? टीम कुठल्या आहेत..??
बाळ्या:- मांजरसुंबा प्रिमियर लिग च्या चँपियन्स ला बोल्विलय... आणि झालंस तर केज, आंबेजोगाई, परळी, माजलगावं तालुक्याचा टिमी बनवल्यात...
मी:- अरे पण त्याचे मालक, जाहिरातदार??
बाळ्या:- अरं मालक, स्पॉन्सरर सगळ्या पक्षाचे पुढारी... अर्रर्र बीड जिल्ह्याला काय तू कमी समजायलास का??? केज साठी "विमलताईच्या" घरी बोलतोय... आंबेजोगाईला "पापा" परळी ला "काका नाही तर पुतण्या" आणि कप चे नाव "केसरकाकू" स्मृती... अन स्पॉनसरर तर खूप आहेत रे... साखर कारखाने दुधसंघ कश्यापाई काढलेतं... अन मक्याशी पण बोललोय...
मी:- कोण मक्या???
बाळ्या:- अर!! तोच मक्या अनासपुरे तुमच्या पुण्या-मुंबईच्या लोकांचा केशव कुथंलगीरीकर... कुंथल्गीरीवरुन आठवलं बघ.. काल गेलतो कुथंलगीरीला. खवा, कलम आणलीया राव... पाठवु का औरंगाबादला घरी...
मी:- कलम तर पाठवच, पण हे मक्या काय करणार...
बाळ्या:- अरं बीडाचा शाहरुख तो... त्यान भी एक टीम घेतली ना राव...
मी :- खेळाडूंचे काय???
बाळ्या:- अर प्ल्येयर तयार आहेतच राव, साईना बिईना झाल्यात... ६ टिमी आहेत १०० खेळाडूंशी सह्या झाल्यातं.. बाकी उद्या बाजार हाय त्यांचं..!!!
मी :- अरे बापरे म्हणजे ऑक्शन!!! कुठे करताय रं हे सगळे???
बाळ्या:- अरे आपलं मैदान आहे ना... ढोरबाजाराचं. तिथ एक मंडप टाकलाय... स्टेज बन्विलयं.. अन लावलाय ह्या ढोरांचा बाजार...
मी:- बरंय लेका...
बाळ्या:- अरं हो... सगळ्या मराठवाड्यात केबल वर लाईव्ह दाखवणार ना आपणं.... तुमच्या त्या टुबा वर पण टाकायचं भौ..
मी:- वा!!!! मजा आहे... बाळ्या मोदी लगे रहो!!!! बरं ते सगळे सोड मला कसं काय फोन केलास इतक्या गडबडीत...
बाळ्या:- अरं ते नाचायच्या पोरिंचे तसा सेटिंग झालंय पण फकस्त त्यांना जिपाडात बसवायचं.... त्यासाठी माणूस मिळनं...
मी:- कुठून बसवायचंय..
बा़ळ्या:- अरे स्पेशल चिअरगर्ल्स आहेत त्या... त्यांना "व्हाईट हाउस" वरून बोलविलंय... तुला फक्त पनवेल ला जाउन त्यांना जीपात बसवायचयं..
मी:- बाळ्या हलकटा, ठेव फोन...मला असले कामं सांगतोस व्हयं...?
बाळ्या:- अरे एक तर....
(बाळ्या बोलत असताना मी फोन कट केला....)
{ह्या लेखातले सगळे पात्र काल्पनिक आहेत त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्ती शी संदर्भ आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा}

३ टिप्पण्या: