बुधवार, जानेवारी ०६, २०१०

रिक्षातली गाणी

आज सकाळी ऑफिसला यायचा मुड नव्हताच.. पण घरी बसून काय करायचे हा पण तेवढाच महत्त्वाचा प्रश्न होता??? मग काय कसे बसे उठलो पेपर हातात घेऊन रमत गमत कसे बसे तयार होत होतो तेवढ्यात झेंडा चित्रपटातल्या गाण्यांची सिडी हातात आली. मराठीत हार्ड रॉक का काय तरी आणायचे असे अवधूत गुप्ते म्हणत होता ते एकूण उगाचच झेंडाची सिडी घेतली पण फार वेळेस काही ऐकणे झालेच नव्हते. गाणे ऐकत ऐकतंच घाई घाईत आवरले पाहतो तर घडाळ्यात ९ चा आकडा दिसला. पळत पळतच चार मजले उतरलो सोसायटीच्या बाहेर आलो.. उशीर झाल्यावर जे होते तेच ऑटो स्टॅण्ड वर एक पण ऑटो नाही. चार ऑटोंना मुलुंड चेक नाका विचारले एक पण यायला तयार नाहीच. खरे पाहता ठाण्याचा शेवटच्या टोकापर्यंत जायचंय तरीही हे रिक्षावाले का तयार होत नाहीत हे कळतच नाही. शेवटी कसा बसा ऑटोत बसलो.. कानात झेंडा चित्रपटातले ज्ञानेश्वर मेश्राम ह्याने गायलेले "झेंडा" हे गाणे अजूनही घोळत होतेच.

आपलीच माणसे आपलीच माती
तरी मेंढराला कळपाची भीती
विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती

खरच कोणता झेंडा घेऊन चालायचे हे एक कोडच आहे... ह्याच विचारात पोहचलो मुलुंड चेक नाक्याला.. हा चेक नाका म्हणजे मुंबई आणि ठाण्यातली हद्द. काही दिवसांनी इथे सामाना सोबत पासपोर्टही मागतील का काय... एक रिक्षा सोडून मुंबईच्या बाजूची रिक्षा पकडण्यासाठी चालत पुढे रिक्षा स्टॅण्ड पर्यंत आलो. इथेही रांग होतीच पाच मिनिटात रिक्षा मिळालीच साधारण अर्ध्या तासाचा रस्ता. रिक्षा सुरू होवून पहिला सिग्नल जेमतेम ओलांडला लगेच रिक्षावाल्याने टेप सुरू केला. रिक्षा मधल्या म्युझिक सिस्टम मध्ये एक जादू असते. काही गाणे केवळ रिक्शात वाजवण्यासाठी तयार केलेले आहेत की काय असे वाटावे असेच असतात. टेप सुरू झाला म्युझिक ऐकून गाणे ओळखायचा प्रयत्न केला आणि गाणे एकदम डोळ्या समोरच आले. काय सांगावे ह्या गाण्याबद्दल.. छायागीत आणि चित्रहार मध्ये हे गाणे तर वाजायचेच नेहमी. "जान तेरे नाम" चित्रपटातले "फर्स्ट टाइम देखा तुझे" ह्याचे गायक तर आठवत नाहीत पण रिक्शांत एकदम काहीतरी वेगळाच आनंद देऊन जात होते.

फर्स्ट टाइम देखा तुझे हम खो गया
सेंकड टाइम मे लव हो गया
ये अख्खा इंडिया जानता है हम तुम पै मरता है
दिल क्या चीज हे जानम जान तेरे नाम करता हे

ह्या गाण्याचा लुफ्त लुटल्यानंतर पुढचे गाणे कोणते असेल विचार करत होतोच.. त्यात अचानक ओळखीचे स्वर आले आणि सुरू झाले हसन जहांगिराचे हवा हवा. अरे काय जादू होती ह्या गाण्यात एका जमण्याला वेड लावले होते ह्या गाण्याने.. अर्थात रिक्शात ऐकायची मौज काही औरच.. कॅसेट नेहमी प्रमाणे घासलेलीच पण जर कॅसेट घासलेली नसेल तर रिक्शांत गाणे ऐकण्यात काय मजा??? पण हवा हवा जोरातच होते. खरे तर हा पाकिस्तानी कलाकार पण ह्यालाच भारतात पॉप गायकी पॉप्युलर करणारा मानला पाहिजे.

हवा हवा ए हवा खुशबू लुटा दे
कहा खुली हा खुली, जुल्फ बता दे
अब उसका पता दे, जरा मुझको बता दे
मै उससे मिलुंगा, एक बार मिला दे
यार मिला दे, दिलदार मिलादे

गाण्याचा शेवटी शेवटी कॅसेट अडकत होतीच.. रिक्षावाल्याने काहीतरी केले आणि पुढचे गाणे सुरू झाले. हे पण एक रिक्षा स्पेशल गाणे... मोहरा चित्रपटातले " ना कजरे की धार"... साधना सरगम आणि पंकज उदास ह्यांनी गायलेले हे गाणे ऍनादार रिक्षावाला'स फेवरीट...

ना कजरे की धार, ना मोतियोंका हार
ना कोई किया सिंगार, फिर भी कितनी सुंदर हो
मन मै प्यार भरा, और तन मैन प्यार भरा
जीवन मै प्यार भरा, तुम तो मेरे प्रियवर हो

जेम तेम हे गाणे सुरू होते आणि पुढच्या चौकातला पोलिस हवालदार पाहून रिक्षावाल्याने गाणे बंद केले. तो चौक गेल्या नंतर साधारण पाच एक मिनिटाने मीच त्याला गाणे सुरू कर म्हणून सांगितले. पुढचे गाणे असेच एक गाणे दिलवाले चित्रपटातले गाणे "इक ऐसी लाडकी थी" कुमार सानू ह्यांनी गायलेले गाणे नेहमीच रिक्शांत ऐकायला मिळते.

जिता था जिसके लिये, जिसके लिये मरता था
एक ऐसी लाडकी थी जिसे मै प्यार करता था.

हे गाणे संपायच्या आतच आमची कॅसेट अडकली... ती बाहेर काढण्याचा नादात रिक्षावाल्याकडून तुटली पण... ऑफिस जवळ आले होते. पण अशी कॅसेट खराब होवून हा प्रवास संपणे काही केल्या मनाला पटत नव्हते.. आज रिक्शात बसल्या बसल्या ही गाणी मला एका वेगळ्याच आठवणीत घेऊन गेली..निदान माझा कंटाळा तरी घालवला. तर सांगा मंडळी तुमची रिक्शातल्या स्पेशल मुजिक सिस्टम वर ऐकायची आवडती गाणी कोणती.

समान नागरी कायदा



भारताच्या राज्यघटनेचा कलम ४४ नुसार भारतात समान नागरी कायदा लागू करणे सरकारसाठी बंधनकारक आहे पण अजूनही ते प्रत्यक्षात आलेले नाही. भारताच्या घटने नुसार "The State shall endeavour to secure for the citizens a uniform civil code throughout the territory of India. " खरे तर भारतात समान नागरी कायद्याची गरज का व कशी आहे ह्या बद्दल थोडक्यात बघूयात. भारतात स्वातंत्रपुर्व काळात वेगवेगळ्या संस्थानात वेगवेगळे कायदे लागू होते. हे कायदे थोड्याफार प्रमाणात सगळ्याच धर्मासाठी समान होते. (अर्थात ह्याला अपवाद आहेच. ) पुढे ब्रिटिशांच्या राज्यात प्रत्येक धर्मासाठी वेगवेगळे कायदे लागू करण्यात आले ह्याची सुरवात १८६९ साली " इंडियन क्रिश्चन डाय्व्होर्स ऍक्ट" ह्या नावाचा एक नवीन कायदा लागू करण्यात आला. ह्याचा पुढचाच भाग म्हणजे १९३७ साली शरियत वर आधारित मुस्लिम पर्सनल लो लागू करण्यात आला. ह्या कायद्या मधील निकाह आणि तलाक संदर्भात तरतुदींमुळे मुस्लिम स्त्रीचे आयुष्य खिळखिळे केले. ह्या कायद्यानुसार मुस्लिम पुरुषास चार बायका नांदवायची परवानगी मिळाली. म्हणजेच मुस्लिम पुरुष एखाद्या रात्री तलाक तलाक तलाक असे म्हणून सरळ आपल्या चारही बायकांना तलाक देऊन नवीन चार लग्न करायला मोकळा झाला. ह्याबाबत १९८५ सालच शहाबानो प्रकरण हे एक बोलके उदाहरण आहे. तसेच अशातच झालेले एक उदाहरण म्हणजे शरियत नुसार १४ वर्षाच्या मुलीला लग्न करण्याचा अधिकार देण्यात यावा ही एक मागणी. ह्या मागणीनुसार जर बघितले तर एखादी १४ वर्षाची मुस्लिमेतर मुलीलाही धर्मांतर करून लग्नाची बळजबरी केली जाऊ शकते.




ह्या कायद्यावर १९४९ साली लोकसभेत चर्चा बरीच चर्चा झाली. त्यावेळेस मुस्लिम सदस्यांनी ह्या कायद्याला विरोध केला त्यांचा मता नुसार समान नागरी कायदा म्हणजे मुस्लिम पर्सनल लॉ संपवायचा कट आहे. ह्या कायद्याचा चर्चेच्या वेळेस आंबेडकरांनी उत्तर देताना म्हणाले होते "मुस्लिमांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे, मुस्लिम पर्सनल लॉ लागू होवून केवळ १२ वर्ष झाले आहेत. त्यापूर्वी देशात जे परंपरागत कायदे लागू होते त्यांचेच पालन मुस्लिम समाज करत होता. आणि मुस्लिम समाजाचे अस्तित्व अजूनही टिकून आहेच. तर सर्व समाजाच्या कायद्यातील चांगल्या तेवढ्या गोष्टी घेऊन तयार केलेला समान नागरी कायदा मुस्लिमांच्या अस्तित्वाला धोकादायक कसे ठरेल? " ह्याच चर्चेच्या वेळेस सरदार पटेल म्हणतात " इतिहासाचा प्रवाह बदलण्याचा कामात मला सर्व अल्पसंख्याकाच्या सहकार्याची मला अपेक्षा आहे. द्विराष्ट्रवादाच्या सिद्धान्तावर विश्वास ठेवणाऱ्यांना माझी एवढीच विनंती आहे की, त्यांनी तिकडेच जाऊन आपले नव्याने मिळालेले स्वातंत्र्य उपभोगावे आणि आम्हाला इथे शांतपणे राहू द्यावे. "



डॉ. आंबेडकर आणि सरदार पटेल हे समाजवादाला मानणारे नेते आहेत असे म्हणता येईल. यापुढेही डॉ. राम मनोहर लोहियांनी सुद्धा समाजवादाचे मुखपात्र असलेल्या चौखंबा मध्ये १९५४ साली एक मोठा लेख लिहून भारतात समान नागरी कायद्याची गरज कशी आहे ते स्पष्ट केले आहे. नरहर कुरंदकरांचे भाषण त्यांचा शिवरात्र ह्या पुस्तकात त्यांचे भाषण संग्रहित केले आहे. त्यात कुरुंदकर म्हणतात " मुसलमान शरियतचा गुन्हाच्या कायदा आम्हाला लागू करा किंवा आमच्या प्रेतावरून चालण्यास तयार व्हा असे सांगणार आहेत का??? हिंदू चोर असेल तर त्याला सहा महिन्याची शिक्षा आणि मुस्लिम चोर असेल तर हात तोडणे अशी मागणी मुसलमान करणार आहेत का?? " ह्यावर हमीद दलवाई ची भूमिका त्यांनी १९६८ साली साधना मासिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात " आता ह्या पुढे चर्चा हिंदू-मुस्लिम प्रश्नावर नको तर समान नागरी कायद्यावर व्हावी त्यासाठी आंदोलने करण्यात यावीत. गोषा पद्धती बंद करावी, कुटुंब नियोजन सगळ्यांना सक्तीचे करण्यात यावे, ज्या मुसलमानांना असे करायचे नसेल त्यांना दुय्यम नागरिकत्व देण्यात यावे. त्यांचा मतदानाचा अधिकार काढून टाकण्यात यावा. ज्यांना शरियत कायदा हवा आहे त्यांना संपूर्ण शरियत लागू करण्यात यावा. म्हणजे चोरी केल्यास हात तोडावे. व खोटे बोलल्यास फटके मारावे.



ह्याबाबतीत आजचे समजवादी भूमिका म्हणजे त्यांचा समान नागरी कायद्याला त्यांचा विरोधच आहे. कारण त्यातून त्यांना मुस्लिमांना नाराज करायचे नाही. खरे तर आजचे राजकारण्यातले समाजवादी म्हणजेच मुलायम-लालू- अमरसिंगाला समाजवादी म्हणायचे काय हा एक मोठा प्रश्नच आहे. कारण एकीकडे स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवत हे लोक बऱ्याच वेळा मुस्लिम तुष्टीकरण करत असतात. थोडक्यात बहुसंख्यांकाचे हिताचे सोडून मुस्लिम समाजाचे तुष्टीकरण हेच आजच्या समाजवाद्यांचे लक्षण मानावे लागते.



संघाच्या कार्यक्रम पत्रिकेवर सातत्याने असलेल्या मुद्द्या पैकीच एक म्हणजे समान नागरी कायदा. बहुसंख्यांकाची प्राथमिकता लक्षात घेता खरे तर समान नागरी कायदा ह्याला सगळ्यात जास्त महत्त्वाचा असायला पाहिजे. ह्या प्रश्नावर संघाची भूमिका पक्की असली तरी या मागणीच्या पाठपुराव्यात संघाने कधीही सातत्य ठेवले नाही, योग्य जनजागरण केले नाही, आणि भाजपाची सत्ता असताना ह्या मुद्द्या ला हात घातला नाहिए. भाजपाकडे संपूर्ण बहुमत नसल्यामुळे त्यांना हा प्रश्न मार्गी लावता आला नाही असे म्हणणे म्हणजे भाजपाच्या नाकर्ते पणा वर पांघरून घालण्यासारखेच आहे. संघाचा भाजपावरचा कंट्रोल बघता जर त्यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा केला असता तर भाजपाला नक्कीच काही ना काही करावे लागले असते. कदाचित ह्या मुद्द्यावर लोकसभेत चर्चा तरी झाली असती.



समान नागरी कायदा लागू करणे म्हणजे सगळ्यांना हिंदू कायदा लागू करणे असा एक समज बऱ्याच लोकांमध्ये आढळतो. समान नागरी कायदा लागू करण्यासाठी हिंदू वारसा कायद्यात सुद्धा अनेक बदल करणे आवश्यक आहेच. तसेच काही बदल ख्रिस्चन कायद्यात करावे लागणार आहेत. ह्याचे एक उदाहरण द्यायचे तर साधारणता २००३ साली एका खटल्यात सरकारने समान नागरी कायदा लागू करण्यासाठी संसदेचे आपल्या ह्या कर्तव्याकडे लक्ष वेधले आहे. ह्या खटल्यानुसार वडिलोपार्जित मिळकतीतील काही हिस्सा इतर धर्मांच्या धर्मदाय संस्थांना दान करण्याचा अधिकार ख्रिश्चनानं नव्हता. ह्या घटनेच्या आधीही सर्वाच्य न्यायालयाने वेळोवेळी सरकारला ह्या आपल्या कर्तव्याची आठवण करून दिलेली आहेच. खरे तर समान नागरी कायदा ह्याचा समावेश घटनेच्या मार्गदर्शक तत्त्वात समाविष्ट केलेली आहे. त्यामुळे ह्याची अंमलबजावणी नाही झाली तर ह्या विरुद्ध कोणाला कोर्टात तक्रार करिता येणार नाही असे न्या. नरेंद्र चपळगावकर ह्यांनी आपल्या एका लेखात स्पष्ट केले आहे.



आजच्या काळात ह्या कायद्याची गरज तर दिवसेंदिवस वाढतच आहे पण केवळ बहुसंख्यांक असणे किंवा हिंदुत्ववादी असणे म्हणजे प्रतिगामी असणे असा अर्थ आज काल रूढ होत असताना ह्या कायद्याची पुर्तता होणे सध्या तरी शक्य दिसत नाहिए. कारण आज कालचे राजकारण्यात असलेली ह्या विषयाची उदासीनात. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे असो वा स्वतःला समाजवादी म्हणणारे असो ह्या कायद्याबाबत आपल्या फायद्यासाठी उदासीनताच बाळगून आहेत.



(ह्या लेखातले बरेचसे मुद्दे हे किस्त्रीम च्या दिवाळी अंकातील डॉ. विश्वंभर चौधरी ह्यांचा "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि समाजवाद ह्या लेखातून व न्या. नरेंद्र चपळगावकर ह्यांचा " समान नागरी कायदा - विस्मरणावर सर्वोच्च उपाय" ह्या लेखातून घेतले आहेत. हे इथे देण्याचा उद्देश हा इथे ह्या मुद्द्यावर चर्चा व्हावी हाच आहे. तसेच हिंदु आणि क्रिश्चन कायद्या मधे काय काय बदल अपेक्षीत आहे?? त्या समाजाचा ह्या कायद्याकडे बघण्याचा काय दृष्टिकोन आहे??)




नव्या जगाची ही वाट

(उगाच र ला ट जोडायचा आमचा एक यत्न)




भेटला आपणास आज हा एकांत

विसरूया जग, नाही कशाची भ्रांत II१II



का आहोत आपण दोन ध्रुवांवर?

जवळी ये, धर हा माझा कर II२II



मोहरलो आहे स्पर्शाने तुझीया आज

नेत्रांत तुझ्या का ओथंबली लाज II३II



नको सोडूस कधी माझा हात

असू दे जन्मोजन्मीची साथ II४II



सरली अंधारी रात, बघ रम्य ही पहाट,

चल चालूया नव्या जगाची ही वाट II५II

तो, हा आणि मी

आज काल मला त्याचे दर्शन दुर्मिळच झाले आहे...... गेल्या काही दिवसात तर तो दिसलाच नाही...




कुठे गेला असेल तो??? आज काल का मला भेटत नाही???



आधी नेहमी माझ्या बाजूला उभा असायचा.... कधीही साथ न सोडणारा तो असा अचानक कुठे गेलाय????



दंगा घालतानाही त्याची साथ असायची, ऑफिसात काम करताना पण त्याची साथ असायची....



सर्व मित्रांसोबत असतानाही त्याचीच साथ असायची.... तो असताना कधीच कुठले काम करणे जिवावर आले नाही.



सुखातही तो माझ्या सोबतीला व दुखा:तही तो माझा साथी!!!! काय झाले असेल त्याची माझी साथ सुटण्यासारखे...????



कदाचित हा दुसरा जो सध्या माझ्या साथीला असतो त्यामुळे असेल का??



कोण 'हा'??? ह्याची माझी ओळख कधी झाली???



केव्हापासुन हा माझ्या आयुष्याचा भाग झाला???



पण एक मात्र आहे... हा आल्याच्या दिवसापासूनच मला आवडू लागला होता..



ह्याची साथ देण्यासाठी मी ऑफिसातली कामे इतरांवर ढकलू लागलो...



ह्याचा साठी मी माझ्या मित्रांपासून दुरावलो...मित्रांना भेटण्यापेक्षा मी ह्यालाच धरुन राहिला लागतो..



हे सगळे चालू असताना कधे मधे तो मला भेटायचा... माझ्या सहवासात असायचा तो....



तो चा सहवास खरे तर हवाहवा असायचा..



पण हा... ह्याने माझ्या वर एक धुंदी चढवलेली आहे.



कोणती ही धुंदी??? का मी ह्याला झटकून टाकू शकत नाही????



का मी ह्याचा मधे गुरफटत चाललो आहे???



आज मला तो ची नितांत गरज जाणवते आहे...



येईल का तो परत माझ्या कडे???



मला हा व तो दोन्हींना सोबत घेउन जगता येईल का???



(ह्या लेखात समाज प्रबोधन व विचारप्रवर्तक असे काहीच लिहिलेले नाहिए.)



काय मंडळी विचारात पडला ना??? एक पुरुष आपल्या आयुष्यातील दोन पुरुषांबद्दल बोलत आहे का?? खरे तर नाही!!!!! पण असे समजायचेच असेल तर समजू शकता.. असो पण काहीही ठरवण्यापुर्वी ह्या दोघांचे नाव तर ऐका...



तो:- उत्साह



हा:- कंटाळा/आळस



कधी कधी आपण कंटाळा आला असे म्हणत दिवस ढकलतो.. हेच रडगाणे गात गात आपल्यामधला उत्साहच हरवत जातो.. अशाच एका कंटाळवाण्या दिवशी लिहिलेले कंटाळवाणे विचार....

कातरवेळ

शनिवारी सकाळी लवकर ११-१२ वाजे पर्यंत उठायचा प्लॅन होता. पण कुठले काय??? सकाळी ७ वाजता फोन वाजला... पहातो तर सिंगापुरातुन फोन..!!! नाही हो सिंगापुरच्या काकांचा नव्हता... एक जुना कलिग सकाळी सकाळी एक इश्श्यू मधे अडकला होता. त्याचा प्रॉब्लेम सोडवता सोडवता झोप चांगलीच उडाली.... आता इतक्या भल्या पहाटे(!) उठून काय करावे ते कळतच नव्हते. पेपर वाचून झाला... त्यात काही तरी सचिन च्या कार्यक्रमाच्या आयोजकांनी मराठी वृत्तपत्रांना बोलवले नव्हते तरी दुसर्‍या दिवशीचा अंक सचिन स्पेशल काढण्यात येणार असे लिहिले होते. चालू द्या!!!! म्हणून मी पुढच्या कार्यक्रमाकडे वळायचे ठरवले. सगळ्यात आधी सुचलेले काम म्हणजे माझे आवडीचे..... खायचे काम.


आवरुन सरळ आण्णाच्या हॉटेलात पोहचलो. एक इडली सांबारात बुडवून असे काहीसे बोलल्यावर वेटर माझ्या कडे विचित्र नजरेने बघत होता. त्याचा पुढचा प्रश्न

"साहब, ईडली सांबार मे डुबाके लाऊं क्या?"

आपलीच चूक म्हणायचे झालं आणि परत एकदा चालू द्यायचं....

" हाँ मैने पहले भी आपको वही बताया था
"



इडलीचा 'समाचार' घेता घेता मनात पुढे काय करायचे ह्याचे विचार चालूच होते,तेव्हाच असे जाणवले की आपले केस कानावर खूप आलेले आहेत.... थोडक्यात वाढले आहेत, आणि कापवायची गरज आहे... अण्णाच्या हॉटेलाच्या बाजूलाच एक केशकर्तनालय आहे खरे!!! पण मागच्या चार वर्षात फक्त दोनच वेळा मुंबईत केस कापवले आहेत. ह्याबाबतीत आमचे स्पष्ट मत आहे की मुंबईतल्या केस कापणार्‍यांना मुळीच केस कापता येत नाहीत..... त्यांना फक्त एकच स्टाईल येते.... स्पेशल भैया कट!!!!!

(विचारवंतांनो आम्हाला कबूल आहे, हा पण आमचा एक पुर्वग्रह!!!! ) असो, तरीही कसे बसे ठरवले काहीतरी लै भारी नाव असलेल्या सलून मधे जाऊन केस कापवायचे.



सलूनचे नाव तर जबरदस्त आहे बरे का मंडळी!!!! "सिझर्स ट्रिक". आमच्या त्या संकुलात हे दुकान जरासं आतल्या बाजूला आहे. तिकडे पोहचलो तर एक माणुस आधीच वाट बघत बसला होता. त्यामुळे मलाही वाट पहाणे क्रमप्राप्त होते... बाहेरच्या बाकड्यावर बसलो...टाइमपास म्हणून दुकानात इकडे तिकडे नजर टाकताना लक्षात आले, केशकर्तनालयाच्या काचेच्या तावदानावर वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातम्यांची कात्रणे होती... जरा जवळ जाउन पाहिले तर कात्रणे मराठी वृत्तपत्रातली होती. उगाचच बरे वाटले. वाचायला सुरूवात केली आणि आत मधे काही तरी त्रास व्हायला लागला. पहिले कात्रण "मनसेच्या चार आमदारांचे निलंबन" आणि दुसरे कात्रण "मराठी लोकांना मराठीत न बोलण्यासाठी मराठीतून गांधीगिरीच्या मार्गाने शिकवणार" आणि बाकीची मग अशीच काही तरी. बरे या दोन बातम्यांच्या छायांकित प्रती संपुर्ण दुकानभर लावलेल्या होत्या.

माझी पहिली प्रतिक्रिया दगड उचलुन ते दुकान फोडण्याचीच होती, पण मिपा वरचे विचारवंताचे लेख वाचुन जरा संयमाने वागावे असे उगाचच वाटले. त्यात अजून एक विचारवंती किडा डोक्यात आला " त्या माणसाची ह्या मागची भुमिका तरी समजावुन घ्यावी".

मग सहजच त्या दुकानाच्या मालकाकडे गेलो. त्याला जमेल तेवढ्या शुद्ध हिंदित विचारले....

"ह्या बातम्या ईकडे लावण्याचे प्रयोजन काय?"

त्यावर साहेबांचे उत्तर: " आप मराठी लोग, हिंदीमें बात करने को शरमाते क्यों हो??? हिंदी तो आपकी राष्ट्रभाषा है
आप बंबई मै हिंदी मे बात न करके देश को तोड रहे हो
"

कसा बसा राग आवरत त्याला उत्तर द्यायला सुरवात केली " पहिली बात हिंदी यह राष्ट्रभाषा नहीं है वह अपने संघ की दो में से इक राजभाषा है
अगर पढाई लिखाई जानते हो तो अपने संविधान के अनुच्छेद ३४३ पढ लेना
उसके आगे अगर आप मानते हो की मुंबई महाराष्ट्रमें है
तो संविधान के अनुच्छेद ३४५ कै तहत महाराष्ट्र की राजभाषा मराठी है
"



ह्यावर त्याचे उत्तर "आप संविधान हमे ना सिखाये, हम सातवी कक्षा तक पढा हूँ
और हमारे स्कुलमें हिंदी राष्ट्रभाषा है यह सिखाया है
और रही बात बंबई महाराष्ट्र की है या नही"

माझ्या समोर त्या दिवशीचा पेपर टाकत " 'आपके' सचिन तेंडुलकरने ही आज कहा है मुंबई सबकी है
आप लोगो को मराठी बोलना छोडना चाहिये
"



तेवढ्या वेळात त्या माणसाचे चार कर्मचारी माझ्या बाजूला गोळा झाले. चार खुर्च्यांवर बसलेले जे गिर्‍हाईक होते त्या पैकी दोन लोक फोन वर बोलत होते. आणि ते चक्क मराठीत फोन वर बोलत होते. सगळ्यांनी मला घेरले. कोणीही माझ्या बाजुने बोलायला तयार नव्हते. बाकी दुकानातले सगळे कर्मचारी लोक तर मला मारायच्या तयारीत होतेच. पण राडा करायचा नाही ही शिकवण अशातच मिपावर शिकलो होतो ना!!! त्याला उत्तर द्यायला सुरवात केली

"मुझे एक बात बताओ आप लोग यहापर धंदा करने आये हो आपको मराठी सिखनी चाहिये ना, और रही बात सचिन की ,मुंबई सबकी है ऐसा भी समझ लो पर भारत वर्ष मै सब लोग क्या हिंदी जानते है?? मुझे लगता है आप लोगो को यहा धंदा करनाही नही है
मै अपने बाल आपके यहा कभी नही कटवाउंगा" और सबसे पहिले यह सब यहा से निकाल डालो
"

असे म्हणुन मी ते लावलेले कात्रण फाडुन टाकले. तिथे बसलेले बघे माझ्या कडे काय मुर्ख राडेबाज आहे याच्या मुळे मला घरी जायला उशीर होतोय अशा नजरेने माझ्या कडे बघत होते. दुकानातुन बाहेर पडलो इच्छा झाली मनसेच्या एखाद्या कार्यकर्त्याला सांगावे ह्या लोकांना सरळ करायला. पण परत तोच प्रश्न!!!! राडेबाजी योग्य आहे का??? आजच सचिनला राजकारणावर बोलायची गरज आहे का?? आमच्या देवानेच असे करावे का??? रोज येणारे असे छोटे मोठे अनुभव असेच सहन करत जगायचे काय??? मराठीचा वापर खरेच पूर्ण बंद होईल का??? आमचे विचारवंत म्हणतात भाषा टिकवण्यासाठी सामाजिक चळवळ करावी पण कोणी सांगेल का मला कशी करायची चळवळ??? छे उगाचच विचारवंत झालो आज शरमेने मान तर खाली घालावी लागली नसती..... त्या चार पाच जणांना फोडून आलो असतो तर माझ्या मनाला तरी समाधान मिळाले असते. पण आत मधे बसलेल्या त्या दोघा मराठींचे काय??? त्यांना ह्याबद्दल काही बोलावसे वाटत नाही का??? त्या मूढांना घरी जायला उशीर नको म्हणुन मी तिकडे राडा केला नाही पण सनदशीर मार्गाने बोलायला पण कोणी माझ्या बाजुने उभे राहिले नाही. आपल्यातच ही दुही का??? लोक सरळ मुंबईत हिंदी बोला सांगतात आणि मी काहीच करायचे नाही कारण माझ्या बाकी मराठीत बांधंवांना त्रास होईल. पण ते बांधव खरच हा मुद्दा समजावुन घ्यायला तयार आहेत का??? शेवटी ह्याच ओळी आठवतात हो

" पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी आपुल्या घरात हाल सोसते मराठी".

खरे तर आज त्या दुकाना मधले कर्मचारी आणि ते दोन माझे लाडके मराठी बांधव हे सगळे बरोबर आहेत चुकलो ते मीच. आता आम्ही हिंदी शिकायचे मनावर घेतले आहे तुम्ही ही शिका.



टीप१: हा मला आलेला पहिला अनुभव नाही.... ह्या आधी आणि नंतरही आहेतच. आणि हा अनुभव सत्य आहे.



टीप२:- यातून आम्ही एका घटनेचा दुसर्या घटनेची बादारायण संबध लावला आहे. असो!!!! विचारवंतच ना आम्ही. पण आम्हाला तुम्ही तसे म्हणू शकत नाहीत. कारण काय आम्ही विचारवंत आम्ही परदेशातल्या कुठल्याशा स्मारकाचा आणि इतिहासाचा संबध लावल्यास तो एक उत्कृष्ट लेख ठरतो. एक तरी विचारवंत यावर तोडगा सांगू शकतो का??? मग आमचा दुकान फोडायचा मार्ग चुकीचा एवढेच सांगताय काय??? चैतन्याने भरलेली तरुणाई वाहवत जाउ नये वाटते तर त्यांना काय करावे ह्याचे मार्गदर्शन करा. रोजचे असे अनुभव घेऊन जगण्याचा कंटाळा येतोय आणि मग चुकीच्या का मार्गाने होईना पण कोणी तरी आमुचा (मॅक्स विचारवंत सध्या परदेशस्थीत आहेत, उगाचच निवासि अनिवासि वाद नका घालु) हा प्रश्न सोडवत असेल तर त्याचा मागे का उभे नाही राहायचे????



टीप३:- सर्व विचारवंतांची माफी मागून. धनंजय आणि विकास यांची स्पेशल माफी मागतो. कारण तुमचे विचार पटायला सुरवात झाली होती पण त्याने माझ्या रोजच्या जीवना मधला प्रश्न सुटणार नाहीत. परत एकदा मी या एकाच अनुभवाच्या जोरावर बोलत नाहीए. मुक्तसुनीत ह्यांनी सामाजिक चळवळीने हा प्रश्न कसा सोडवता येईल हे सांगितले होते त्याबद्दल जास्तीत जास्त मार्गदर्शन करावे. आता माझ्यासमोर दगड उचलण्याशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही... चुकीचे असेलही पण सध्यातरी तोच मार्ग दिसत आहे.... इतर काही मर्ग असल्यास सुचवावे.... योग्य मार्गांसाठी तुमच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे... इथं कोण चूक नि कोण बरोबर ही चर्चा अपेक्षित नाही.. तर कोणत्या मार्गानी हे प्रश्न सोडवता येतील यावर विचार व्हावा असे वाटते.. अर्थात त्यासाठी हा प्रश्न आहे हेच पटणं आधी आवश्यक आहे.. नाहीतर आम्हांला हिंदी शिकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही!!!! इतर मुंबईतील विचारवंतांनो तुम्हाला असा अनुभव येत नाही का??? परत एकदा विचारवंत हा शब्द वापरल्याबद्दल माफी. जरा जास्तच भावुक होऊन लेख लिहिला...



शेवटानंतर :-अजून आमचे केस कापवून घ्यायचे बाकीच आहे. चला हजार रुपये खर्च करुन घरी जाऊनच कापवेन.

एक प्रवास.... भाग १

काल झालेल्या मतमोजणीत नव्याने स्थापन झालेल्या जनशक्ती पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांपैकी १९० जागा जनशक्ती पक्षाला मिळाल्या आहेत. साधारण तीन वर्षापुर्वी हा पक्ष अस्तित्वातच नव्हता पण गेल्या वर्षी झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत ह्या पक्षाने चांगलाच जोर दाखवला होता. पक्षाच्या नेत्याची निवड लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सदस्य करतील असे प्रतिपादन पक्षाध्यक्ष राजेश पवार ह्यांनी केले. महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण हे उद्या संध्याकाळ पर्यंत स्पष्ट होईल. पक्षाध्यक्ष राजेश पवार यांनी स्वतः मुख्यमंत्री होणार नसल्याचेही इथे आज स्पष्ट केले.




नव्या सरकारच्या शपथविधी साठी राजभवन सजले होते. शपथविधीचा मोठा सोहळा न करता एक साधासाच कार्यक्रम व्हावा अशी नवीन मुख्यमंत्र्यांची इच्छा होती. तरीही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहापुढे त्यांना थोडी माघार घ्यावी लागली होती. नव्या मुख्यमंत्र्यांशी बोलण्यासाठी मिडिया वाट बघत होता. काल जनशक्ती पक्षाच्या निवडून आलेल्या आमदारांनी नेत्याची निवड केल्या पासून मिडिया त्यांच्याशी बोलायला वाट बघत होता. पण त्यांनी पहिली पत्रकारपरिषद शपथविधी नंतरच असे ठरवले होते. आज सकाळपासुनच ते वेगवेगळ्या बैठकीत गुंतलेले होते. मुख्यमंत्री म्हणुन निवड झालेली असली तरीही इतर मंत्री मंडळ ठरवण्यात बराच वेळ जात होता. जनशक्ती पक्षाचे १९० पैकी १७५ आमदार पहिल्यांदा आमदारकीची शपथ घेणार होते. नेता म्हणुन त्यांचे नाव जवळजवळ एकमुखाने सर्वांनी ठरवले होते. त्याला पक्षाध्यक्षांचाही विरोध नव्हताच कारण जनशक्ती पक्षाला महाराष्ट्रभर पसरविण्यात त्याच्या टीमचा फार मोठा वाटा होता. आज आता तो दिवस आला होता आणि त्यांचे सरकार स्थापनेचे स्वप्न पुर्ण होणार होते.



" मी निरंजन प्रमोद जोशी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणुन......." ही शपथ घ्यायला जेव्हा निरंजन उभा राहिला तेव्हा एक वेगळीच लहर सभागृहातुन उमटली...अनेक भुवया उंचावल्या गेल्या. एक २७-२८ वर्षाचा मुलगा, निळ्या रंगाची मळकी जीन्स, काळ्या रंगाचा कॉलर वाला टि-शर्ट खाली फ्लोटर्स असा त्याचा गेट अप पाहुन तर अनेक राजकीय समीक्षक तोंडात बोट घालायचेच बाकी होते. काल पर्यंत नेहमीच्याच खादीच्या वेषातल्या सत्ताधार्‍यांना बघणार्यांसाठी हा नविनच अनुभव होता. निरंजन पाठोपाठ १४ मत्र्यांनी शपथ घेतली. मंत्रीमंडळ छोट्यात छोटे ठेवण्याकडेच त्यांचा कल होता. शपथविधी नंतर लगेचच पत्रकारपरिषदेला सुरवात झाली. सगळ्या भाषेतल्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाने बरीच गर्दी केली होती. एक एक करुन पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारायला सुरवात केली.



पः- "कैसा महसुस कर रहे हो आप सी. एम. की कुर्सी मिलने के बाद?"



नि:- कैसा महसुस करना चाहिए??? अच्छा तो लगताही है
पर जनता की उम्मीदों पे खरे उतरने की चुनौती सामने है




पः- Mr. Joshi you are speaking of challenges... in the near feature what challenges you see infron of the goverment??



नि:- Challenges are many more... but we see corruption,drought, suicides by farmers, lack of infrastructure are some of the challenges we need to address on a short term as well as on a long term basis.



अशा प्रकारे एक एक प्रश्न त्याच्या समोर येत राहिले तो उत्तर मोकळेपणे देत राहिला, शेवटी जाता जाता एका प्रश्न मात्र त्याला विचारात पाडून गेला.....



पः आपण राजकारणा कडे का वळलात??? कसे वळलात हे थोडक्यात सांगता येईल का???



नि:- राजकारणा कडे वळण्याचे मुख्य उद्दिष्ट होते समाजासाठी काही तरी करणे. माझ्या आजूबाजूला असंख्य प्रॉब्लेम्स असताना मी फक्त सिस्टमलाच दोष देत राहियचो... ही सिस्टम आम्ही तरुण लोक बदलणार नाहीत तर कोण बदलणार??? ह्याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याकरीता राजकारणात आलो आहे. बघूयात किती यशस्वी होतो ते!!!! बाकी राजकारणा कडे कसे वळलो हे सांगणे जरा अवघडच आहे. अहो राजकारणातुन ५५ वर्षी निवृत्ती स्विकारल्यानंतर मला एखादे पुस्तक लिहिण्यासाठी काही तरी राहू द्या हो!!!



असे म्हणताच सभागृहात थोडासा हशा पिकलाच... पण तो प्रश्न निरंजनला आठवणीत घेउन गेला खरा!!! तसाच तो त्याच्या खोलीवर परत आला... अजून तो सरकारी बंगल्यात रहायला गेला नव्हता. आणि आठवले त्याला ते दिवस सहा सात वर्षां पुर्वीचे............



======================================================



निरंजन जोशी... औरंगाबादचा.... इतर अनेक तरुणांप्रमाणे आपल्या आईवडीलांबरोबर रहात होता. सर्वसाधारण मध्यमवर्गीय घरात जसे वातावरण असते तसेच त्याच्याही घरात होते. वडील सरकारी नोकरीत, आई गृहिणी, मोठी बहीण डॉक्टर झालेली आणि हा नुकताच इंजिनिअरिंगची परीक्षा पास झालेला!!! त्यात घरच्यांची चिंता मिटवणारी बाब म्हणजे आधीच एका मोठ्या आय टी कंपनी मधे याची निवड झालेली. ज्या दिवशी निरंजनची ह्या कंपनीत निवड झाली त्यावेळेस बाबांना स्वर्ग दोन बोटच उरला होता. आपण आयुष्य भर सरळमार्गी राहिलो तरी मुलांना मोठे करु शकलो.. त्यात कमी पडलो नाही.. असा मध्यमवर्गीय विचार त्यांना सुखावत होताच!!! तर तशातच एक दिवस निरंजनला मुंबईला त्याच्या कंपनी मधे जॉइन होण्याचे पत्र आले!!!



======================================================



निरंजन आठवू लागला तो दिवस... बाबा किती टेन्शन मधे होते ना मी मुंबईला जाणार म्हणून... घरातून पहिल्यांदाच बाहेर रहाणार होतो मी..... त्यामुळेच जास्त चिंता होती!!! तसेच निघालो मुंबईला जायला... काहि नविन मित्र मिळणार... भरपूर काम करायचे... पैसा कमवायचा... हे सामान्य स्वप्न घेऊन घरातून निघालो...!!! तसे मेडिकल टेस्ट च्या वेळेस भेटलेले मित्र तिथे पण सोबत येणारच होते. सि एस टी स्टेशनावर साधारण तासा भराच्या अंतराने त्यांच्या पण गाड्या येणार होत्याच. तसे म्हणाल तर, आत्ता पर्यंत मित्र म्हणण्यासारखी आमची ओळख सुद्धा नव्हती. आमची भेट ती काय फक्त मेडिकल टेस्टच्या वेळेस झाली होती. त्यातला अभ्या म्हणजेच संग्रामसिंह कदम लातूरचा पण औरंगाबादहूनच इंजिनिअरिंग केले असल्यामुळे माझ्या आधी पासून ओळखीचा...



सि एस टि स्टेशनावर सकाळी सकाळी उतरलो... तसे जॉइनिंग दुसर्‍या दिवशी होते... रविवारचा दिवस असल्यामुळे गर्दी तशी कमीच होती. पण नेहमी प्रमाणे बाहेरगावच्या गाड्यांकडुन लोकलकडे पळणार्‍यांची गर्दी होतीच. स्टेशनवरच्या अनाउंसमेंट चालूच होत्या... मी उतरुन सामान साईडला घेऊन कुठे यांची वाट बघायाची याचा विचार करतच होतो.... तोच दोन पोलिस माझ्या दोन्ही बाजूला आले... आणि सरबत्ती सुरु केली....



"क्योंबे??? कहाँ से आये हो??"



" काय झाले साहेब??? हे काय ह्या समोरच्या देवगीरी एक्स्प्रेस मधून उतरलो आत्ता.. औरंगाबादहून आलोय."



" मुंबईत कशाला आला आहेस??"



"साहेब या या कंपनीत नोकरी लागली आहे."



"मग ह्या बॅग मधे काय बॉम्ब आहेत काय???"



" नाही हो साहेब, ह्यात माझे कपडे आहेत फक्त"



" चल बॅग उघड, आम्हाला तपासायचे आहे, तसेही हे औरंगाबाद म्हणजे अतिरेक्यांचे केंद्रच आहे"



" हे बघा साहेब, ह्या बॅगेत कपड्यांशिवाय काहीच नाहीए हो... "



त्या दोघांनी माझे सगळे कपडे उलथेपालथे करुन टाकले...



" तुला नोकरी लागली आहे ना, मग कंपनीचे आयकार्ड आहे का तुझ्या कडे???"



मला कळतच नव्हते काय चाललं होतं ते!!!!



"साहेब मी काही केलेले नाही हो"



" गप्प बैस! जेवढे विचारले तेवढे सांग!!!"



" साहेब आय कार्ड तर नाही पण कंपनीने दिलेले पत्र आहे"



ते पत्र त्याने वाचले निदान वाचण्याचे नाटक केलं.....



"चल ५० रु काढ नाही तर तुला आत टाकून देईन"



" पण साहेब माझे चुकले काय??"



"जास्त आवाज नको करु"



मी विचार केला प्रकरण वाढवण्यात काहीच पॉईन्ट नाही तेव्हा यांना ५० रुपये देऊन टाकू....



"हे घ्या साहेब " असे म्हणुन ५० रुपये देताच दोघेही खुश होऊन निघुन गेले पण माझ्या समोर उभा राहिला एक प्रश्न!!!!!

" पुढे काय???"

" मुंबईने स्वागत तर चांगलेच केले आपले आता बघूयात पुढे काय काय वाढुन ठेवले आहे??"



(क्रमशः)

चोर कुणाला म्हणावे



काल रात्री ऑफिस संपवुन घरी जायला निघालो. एक मित्र सोबत होता नेहमी प्रमाणे जेव्हा दोन एकाच टिम चे लोक सोबत भेटतात तेव्हा जश्या गप्पा चलु असतात त्याच चालु होत्या. थोडासा पाउस पडत होता. ऑफिस मधुन बाहेर पडताना मी मित्राला म्हणालो "कंटाळा आला यार उद्या शनिवार असुन पण ऑफिल यायचे". मित्राने त्या नंतर मस्त पैकि एक पाच दहा मिनिटे सगळ्यांना शिव्या घातल्या. ऑफिसच्या गेटच्या बाहेरच पोलिसांची नाकाबंदी होती. मी म्हणालो " हे लोक रोज नाकाबंदी करतात, कश्यासाठी दोन चार दुचाकीस्वारांना अडवुन त्यांचा कडुन पैसे काढण्यासाठी??? ह्यावर तो म्हणाला " यार याच मुंबई पोलिसांनीच अश्याच एका नाकाबंदीत कसाबला सुद्धा पकडले आहे हे विसरुन चालणार नाही". असेच चालत चालत कांजुरमार्ग स्टेशनावर आलो. आसनगाव लोकल इंडीकेटर वर दाखवत होती. "ह्या नंतर दोन ठाणे आहेत ह्यातच चढु" मित्राला डोंबिवली पर्यंत जायचे होते म्हणुन तो म्हणाला.


लोकल स्टेशनात आली, नेहमी प्रमाणेच गर्दीने भरलेली. कसे बसे आम्हीही चढलो. मधे उभे रहायची जागा मिळाली.बाहेर पाउस पडत असला तरी लोकल मधले वातावरण नेहमी प्रमाणे कोंदलेलेच होते. भांडुप आणि नाहुर च्या मधे कोणीतरी ओरडले मोबाईल गेला. माझा आणि मित्राचा हात लगेचच मोबाईल आहे का नाही तपासण्यासाठी खिश्याकडे गेला. माझा मोबाईल खिश्यात होता म्हणुन हुश्श्य करत प्रश्नार्थक नजरेने मित्राकडे पाहिले त्याच्या कडे पाहाताच लक्षात आले. त्याचा मोबाईल गेलेलाच होता. असेच ईकडे तिकडे पाहिले तर डब्याचा दाराजवळ अजुन दोन जणांचे फोन गेले होते. माझा मित्र व मी लोकांना सरकवत कसे बसे दरवाज्याजवळ पोहचलो. एकुण चार लोक होते ज्यांचे मोबाईल चोरीला गेले होते. त्यातल्या एकाने सांगितले , त्याचा मोबाईल चोरणारा त्याने पाहिला आहे. गुलाबी शर्ट घातलेला आहे आताच नाहुर ला उतरुन मागच्या दरवाज्यात चढला आहे. डब्यात तो पर्यंत सगळी कडे मोबाईल चोराचीच चर्चा होती. एकटा माणुस चार मोबाईल चोरुच शकणार नाही नक्की टोळी असेल. असे एक ना अनेक तर्क मांडणे चालु होते. त्यात आता मुख्य प्रश्न होता ते त्याला पकडायचे कसे?? कारण मुलुंडला तो उतरुन पळुन जाउ शकला असता. ज्याने मोबाईल चोराला बघितले होते तो म्हणाला गाडी प्लॅट्फॉर्म ला लागली की उडी मारुन मागच्या दरवाज्याकडे पळणार.

गाडी मुलुंड स्टेशनात शिरत होती दरवाजाच्या समोरच्या बाजुला आम्हाला चार पाच जणांना जागा लोकांनी स्वता:हुन करुन दिली होती. गाडी चा वेग थोडा मंदावताच मी आणि मित्रा ने गाडीतुन उड्या मारल्या पाठोपाठ मागच्या दोघा तिघांनेही उड्या मारल्या. सावरुन ट्रेन कडे बघुस तर डब्बा थोडासा पुढे गेला होता. त्यामुळे आम्ही तसेच पळायला लागलो. बाकीच्या दारातल्या लोकांना आणि प्लॅट्फोर्म वरच्या लोकांना काही तरी लफडा आहे लक्षात आले. त्यामुळे लोक कधी नव्हे तर पळणार्‍या लोकांना जागा करुन देत होते. अजुन ट्रेण पुर्ण थांबायची होती तेव्हाच माझा मित्र आणि त्या चोराला ओळखणारा ईसम (त्याला आपाण आता य म्हणुया ) डब्य्यात चढले. मी जेव्हा दाराजवळ पोहचलो तर पाह मित्राने एका माणसाला कॉलरने धरले होते आणि पब्लिक ने त्याला मारायला सुरवात केली होती. मित्र जेव्हा बाहेर त्याला घेउन आला तेव्हा बरीच गर्दी जमली होती. चोराला बघितल्यावर खरे तर वाटते नव्हते तो चोर असेल. आता आजुबाजुची गर्दी चोरावर हात चालवायच्या तयारीत होती. मित्राने त्याला धरुन ठेवले होते व समोर मी, "य" आणि मोबाईल चोरीला गेलेले दोन लोक होते.

"य" ने त्याला विचारले "माझा मोबाईल कुठेय??"
चोर म्हणाल " माझ्या कडे नाहिये माझ्या साथीदारा कडे आहे"

"य" ने एक जोरदार अशी त्याचा कानाखाली काढली. बघ्यांची गर्दी वाढतच चालली होती. तितक्यात य चा मोबाईल चोराच्या पायाजवळ सापडला. मोबाईल उचलताच य ने व ईतर दोन लोकांनी त्याला मारायला सुरवात केली. मित्राने त्याला कसे तरी धरुन ठेवले होते. माझ्या आजवरच्या गेलेल्या मोबाईल्ची आठवण काढुन मी पण एक दोन त्याला ठेवुन दिल्या. पण अचानक गर्दी ईतकी वाढली जो उठेल तो त्याला मारायला लागला. त्याला वाचवणे सुद्धा आमच्या हाताबाहेर होवु लागले. काही लोक तर ट्रेन पकडायही सोडुन ह्या सगळ्या प्रकाराकडे पाहात होते. काही लोक मारतही होते. नेहमी मुंबईच्या लोकांचे वर्णन करताना ट्रेन मधुन उतरतान कोणी पडला तर त्याचावर पाय ठेवुन जायला कमी करणार नाहीत असे केले जाते. इकडे तर वेगळाच अनुभव येत होता. लोक ट्रेन सोडुन चोराला मारत होते. ह्या सगळ्या गोंधळात आमच्या मित्राने व "य" ने मिळुन त्याला पोलिसात द्यायचे ठरवले. पोलिसांकडे घेउन जायचे म्हणाले की अर्ध्या गर्दीचा उत्साह ओसरला आणि गर्दी पांगायला सुरवात झाली.

आमचा मोर्चा (म्हणजे मी, मित्र, य, दोन जण ज्यांचे मोबाईल चोरी गेले होते आणि चोर) ह्यांचा मोर्चा निघाला पोलिस स्टेशना कडे. सर्व प्रथम कोणाएका वाटाड्याने आम्हाला एका चौकी कडे नेले. तिथे एक हवालदार साहेब खुर्चीत आरामात बसले होते. त्यांना आमची कहाणी थोडक्यात सांगताच ते जागेवरुन उठले व सगळ्यात आधी त्यांनी चोरच्या कानाखाली एक ठेवुन दिली. मस्त पाच एक मिनिट आरामात त्याचावर हात साफ करुन घेतल्यावर आम्हाला म्हणाले "पुढे जी आर पि एफ" ची चौकी आहे तिकडे घेउन जा ह्याला". आमचा मोर्चा आता त्या नव्या चौकी कडे निघाला. तेवढ्या वेळात चोराने कबुली दिली होतिच की त्याची एक टोळी होती आणि त्याचा साथीदारांनी चोरी केली आहे. जि आर पि अफ च्या चौकित आम्हि पोहचलो तर तिकडे एक फौजदार बाई आमच्या समोर आल्या. परत एकदा त्यांना पुर्ण कहानी सांगण्यात आली. मग त्यांनी एका शिपायाला बोलावुन चोराची झडती घ्यायला सांगितले. तो हवालदार चोराला एका कोपर्‍यात घेउन गेला आणि बेदम मारायला सुअरवात केली. थोडावेळाने शिपाई एका हातात काही सामान आणि दुसर्‍या हातात चोर अश्या अवस्थेत बाहेर आला. चोराच्या चेहर्‍यावर मार खाल्ल्याचा चांगल्याच खुणा दिसत होत्या. चोराला बाई समोर उभे करण्यात आले. त्यापुढील नाट्य काही देत आहे.

बाई:- " काय रे तु हिंदु आहेस की मुसलमान?"
(४४० वोल्ट्स चा झटका मला ह्या वाक्याचा वेळेस बसला)
चोरः "हिंदु"
बाई: " चोरी तु केलिस का??"
चोर: "नाही माझ्या सोबतच्या लोकांनी."
बाई: " शिपाई, काय काय निघाले ह्याचा कडे"
शिपाई: " एक मोबाईल, काही कागदे व ३०२ रुपये"
बाई: "आण ते ईकडे"
शिपायाने ते सामान बाईंसमोर ठेवले. बाईंनी त्यातले ३०२ रुपये उचलुन आपल्या खिश्यात टाकले.

बाई (चोराला): " काय रे हा मोबाईल कुठे चोरलास??"
चोरः "नाही हा माझाच आहे"
बाई : "नंबर काय मग तुझा?"

चोर आपला नं सांगतो. बाई त्यांचा टेबलावरील फोन वरुन तो नं फिरवतात तो नंबर लागत नाही.

बाई: " हा पण चोरिचाच असेल, नंबर लागत नाहिये"
चोर: " नाही हो हा माझाच आहे"
बाई: "चुप बैस जास्त आवाज नको करु"
बाई (आमच्या कडे पाहुन) : " तुमच्या पैकी कोणा कोणाचे मोबाईल गेले आहेत?? कोण कोण तक्रार करणार आहेत??"
यः "आमचे चार जणांचे मोबाईल चोरीला गेले आहेत त्यातला माझा ह्याचा कडे सापडला."
बाई: " ठीक आहे तक्रारी सोबत पुरावा म्हणुन तुमचा मोबाईल जमा करावा लागेल.

आमच्या नशिबाने य त्याचा मोबाईल जमा करायला तयार झाला. पुढचा गोळा आमच्यावर फेकला गेला तो तुम्हाला तक्रार नोंदवायला कुर्ल्याला जावे लागेल. त्यासाठी कुर्ल्याचे दोन हवालदार ईकडे येतिल त्यांचा सोबत आम्ही चोराला पाठवु. कुर्ल्याचे हवालदार ईतर काही कामासाठी इकडे यायला निघाले आहेतच त्यांचाच बरोबर ह्याला पाठवु.मग सुरु झाल्या ते पोलिस खात्याचा बढाया. त्याचा एक एक शौर्यकथा आम्ही ऐकतच होतो. त्या चोराला परत मधल्या खोलित नेण्यात आले. त्याला तिकडे नेतानाच नागडा करायची तयारी सुरु होती. बाई इकडे आम्हाला त्यांचा शौर्यकथा सांगत होत्या आणि आत मधुन चोराचे प्रत्येक फटक्या गणित चोराच्या व्हिवळण्याचे आवाज येत होते. त्यातच एका शिपायाला अजुनच जोर आला. कुठुन तरी तो एक मोठ पट्टा घेउन आला. पट्ट्याची जाडी पिठाच्या गिरणीच्या पट्ट्याचा जादी पेक्षा जास्त होती. आता पुढे एक हवालदार चोराच्या गुढघ्यावर उभा होता आणि दुसर्या ने त्याचा पायावर जोर जोरात फटके मारायला सुरवात केली. तिसर्‍या फटक्या नंतर चोर रडायलाच लागला. तो रडत रडत ओरडला मारु नका साहेब मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो. बाईने ईकडुन ओरडुन शिपायाला चोराला बाहेर घेउन यायला सांगितले. तितक्यात कुर्ल्याचे दोन हवालदार तिकडे पोहचलेच.

त्याच वेळेस चोराने एक एक कबुली जवाब द्यायला सुरवात केली. त्याच्या सोबत चार लोक होते चारही लोक मुंब्र्याला रहाणारे होते त्यातल्या एकाचे नाव अफजल होते. ह्या अफजल चे नाव घेताच सगळ्या पोलिसांच्या चेहर्‍यावर आनंदाची एक लकेर उमटली. कुर्ल्याचा पहिल्या हवालदाराने अफजल बद्दल माहिती द्यायला सुरु केली. अफजल कुठे राहतो, त्याचे आई वडिल काय करतात??? त्याचे मामा मामी काय करतात??? हे सगळे आम्हाला पुढच्या पाच दहा मिनिटे ऐकवले. दुसर्‍या हवालदाराने बाईच्या परवाणगिने मुब्र्याला कोणाला तरी फोन लावला. अफजल समोरच फिरत आहे आताच आला आहे हे पलिकडच्या माणसाने सांगितले. ह्यानंतर त्या चोराला कुर्ल्याला न्यायचे ठरले त्यावेळेस हवालदार क्रमांक एक ने बाईंना विचारले चोरा जवळ काय काय मिळाले??? बाईंनी त्यांचा समोर काही कागदे व तो मोबाईल ठेवला.त्यानंतर कुर्ल्याचा हवालदाराने सगळ्यांना कुर्ल्याचा चौकिवर यायला सांगितले. पोलिसांची एकुणच वागण्याची पद्धत बघुन मी तर परेशान झालो होतो.
त्याच वेळेस मित्राने आणि मी कुर्ल्याला जायचे आधी काही तरी खायचे ठरवले. स्टेशन बाहेर पडुन एका ठीकाणी खायला बसलेले असताना सहजच मित्राला विचारले

"तुझा ईतका मोबाईल चोरिला गेला पण तु एकदाही चोरावर हात नाही उचललास" ह्यावर मित्र उत्तरला
"कुठल्या चोराला मारायचे मोबाईल चोरणार्‍याला का त्याचेही ३०२ रुपये चोरणार्‍याला???"

ह्या लेखात मला कुठेही पोलिसांबद्दल किंवा पोलिसखात्याबद्दल काही वाईट लिहायचे नाही. त्यांचे वागणे जसे माझ्या समोर आले तसे मांडायचा प्रयत्न करतोय. हे लिहिण्याचे कारण काय असा बर्‍याच जणांना प्रश्न पडेल त्यावर मी इतकेच सांगु शकतो लिहायचे कारण माझ्या मित्राचे शेवटचे वाक्य. बर्‍याच वेळा आपल्याला पोलिसांसोबत वेगवेगळे अनुभव येतात त्यात पोलिस लोक विचित्र वागतात. साधे दुचाकिवरुन जाताना पकडलेले असो किंवा पोलिसात तक्रार करायला गेलेले असो. कधी आपण जाणुन घ्यायचा प्रयत्नच करत नाही हे लोक असे का वागतात?? आता त्या फौजदार बाईंनी ते ३०२ रुपये परत का नाही केले ह्याचे कारण काय असु शकेल. कदाचित त्यांचा पगार त्यांना पुरत नसेल किंवा अजुन काहीतरी असेल. आपल्या मिपा वर पोलिसखात्यातिल किंवा पोलिसखात्याचा संबधातिल अनेक लोक आहेत तसेस काही पत्रकार मंडळी आहेत ज्यांना जवळुन पोलिस खात्याचा अनुभव आहे त्यांनी पोलिसांच्या मानसिकते बद्दल काही तरी प्रकाश टाकावा अशी विनंती मी त्यांना करतो. लहानपणी कधी तरी ऐकलेले समुहगीत आज आठवत आहे त्याचा ओळी "पोलिसांतिल माणुस तुम्ही जाणुन घ्या हो जरा" अश्या काहीतरी होत्या. बाकी तो पर्यंत चोराला आधी हिंदु का मुसलमान असे विचारण्यामागे काय कारणे असतिल ह्याचा मी विचार करतो.




सोसायटी आणि बॅचलर

शनिवारी सकाळी लवकरच भद्रा मारुती दर्शनाला निघालो. गाडी चालवताना फोन वाजला, बघितल तर घरमालकांचा फोन.




घरमालकः- निखिल कुठे आहात??? मुंबई मधे आहात का???

मी:- नाही हो, सध्या मी घरी आलेलो आहे.

घरमालकः- तुमच्याशी थोडे बोलायचे होते.

मी:- सध्या गाडी चालवत आहे, तुम्हाला साधारण तासभरात फोन करतो.

घरमालकः- ठीक आहे पण आठवणीने फोन करा

माझ्या डोक्यात पहिला विचार आला आज तर दोन तारीख आहे ह्यांना लवकर घरभाडे पाहिजे असणार ह्या वेळेस. तसेच सगळे काम आटपुन एक तासाच्या आत घरी पोहचतच होतो तेव्हा परत त्यांचा फोने आला. ह्या फोन मधे झालेला संवाद खालील प्रमाणे

मी:- नमस्कार सर, आताच घरी आलो, तुम्हाला करणारच होतो फोन

घरमालक:- ठीक आहे, थोडा प्रॉब्लेम झाला आहे. तुमच्याशी थोडे बोलायचे आहे.

मी: कशा संदर्भात???बोला ना???

घरमालकः- सोसायटी मधे थोडा प्रॉब्लेम झाला आहे. ५२ नं मध्ये काहि मुले रात्री मुलींना घेउन आले होते आणि त्यांना नको ते चाळे करताना पकडले गेले.

मी:- अच्छा (स्वगत :- आता बहुतेक हा घर सोडायला सांगणार)

घरमालक:- तुमच्या खाली राहाणार्‍या लोकांनी सांगितले आहे की काल तुमच्या कडे पण मुली आल्या होत्या.

मी:- तुमच्याशी मी ह्या विषयावर सोमवारी आल्या नंतर बोललेले चालेल का??? ह्या गोष्टी फोन वर बोलण्या पेक्षा प्रत्यक्ष बोललेले चांगले असे मला वाटते.

घरमालकः- ठीक आहे.

खरे तर मी कधिच माझ्या कुठल्याही मैत्रीणिला माझ्या रुमवर घेउन गेलो नाहिये. माझ्या रुममेट च्या मैत्रिणि येतात हे मला माहित होते. त्यामुळे वस्तुस्थिती जाणुन घेण्यासाठी त्याला फोन लावला असता कळले. काल त्याची होणारी बायको दुपारी चार वाजता येवुन साधरणता सहा वाजेच्या सुमारास दोघेही बाहेर गेले होते. त्यावर मित्राला मी घरमालकांसोबत झालेले बोलणे सांगितले. त्यानंतर आमच्या घरमालकांना भेटायला गेला. तेव्हा त्याने सर्व परिस्थीती त्यांना समजावुन सांगितली.

माझा ह्या मित्राचे लग्न ठरले आहे, रीतसर घरच्यांनी साखरपुडा करुन दिलेला आहे. आता त्याची होणारी बायको आमच्या घरापासुन जवळच राहते. त्यामुळे सहाजिकच शनिवार्-रविवार ते बराच वेळ सोबतच घालवतात. कधी तिच्या रुमवर तर कधी आमच्या. बरेच वेळेस मी पण घरी असतो. मला त्यांच्या वागण्यात काहिच वावगे वाटत नाही. साधारणता सर्वसाधारण सभ्यतेचे नियम पाळुन तो किंवा ती कधिच एकमेकांकडे रात्री ९ नंतर थांबत नाहित. आता वस्तुस्थीति जाणुन घेतल्यावर आमच्या मालकांचे म्हणने पडले पहा जर टाळता आले तुम्हाला तर टाळा.

ह्या सगळ्यावर विचार करत असताना मला आठवले मि पा वरचा परा चा प्लेटॉनिक मैत्रीचा धागा. अजुनही समाज एका मुलिची आणी मुलाची विशुद्ध मैत्री असते असे मानत नाही का??? एक बॅचलर मुलगा आणि एक मुलगी सोबत आल्यावर नेहमी नको ते चाळेच करतात का??? आता माझ्या मित्राने काय करावे??? नेहमी भेटायला बाहेर कुठेतरी जाणे हे शक्य होत नाही. सार्वजनिक ठिकाणी ह्यांना प्रेमीयुगुल म्हणुन पोलिस त्रास देणार नाही कश्यावरुन??? एका व्यक्तिच्या बेजवाबदार वागण्यामुळे सर्वांना त्रास का???

असो तर आज रात्री मालकांना भेटायला जात आहे. त्यांना वरिल व अजुन काही प्रश्न विचारायची इच्छा आहे. बघा तुम्हाला काय वाटते. मी फक्त हे प्रश्न विचारुन घर बदलावे लागणार नाही अशी आशा करतो.

माझी गादी

(हा एक अतिशय फालतु लेख आहे त्या मुळे वाचणार्‍यांनी स्वः जवाबदारीवर वाचावा.)

मित्रांनो ही कथा आहे एका गादीची. मला वारसाहक्काने मिळालेल्या गादिची. गेल्या काही वर्षापासुन ह्या गादिवर हक्क सांगणार्‍या लोंकामधुन आता फक्त माझा ह्या गादीवर हक्क आहे ह्याचा आनंद काहीतरी वेगळा आहे. ह्याच गादीसाठी आमच्या घराण्यात अनेक वेळा भांडण तंटे झाले. तर अशीही आमची गादी. काय रे कोण म्हणतोय पानाची गादी म्हणुन. पानाची किंवा कोणत्या महाराजांची हक्कानी मिळणारी गादी नाही हो.(तसे हे महाराजांच्या गादीचे प्रकरण मस्त असते, एखादा दोन मुले असलेला माणुस जेव्हा त्याचा वडीलांच्या जागी महाराज बनुन गादी सांभाळतो तेव्हा काही तरी मजेशीर वाटते) तर ही गादी म्हणजे आमच्या घरातली एक भारतीय बैठक.

साधारण मी दहावीत असताना बैठकिचा खोलीमध्ये बसायला आसने कमी पडत असल्यामूळे भारतीय बैठक घालण्यात आली. जेव्हा सर्वप्रथम ह्याची जागा ठरवताना बराच वाद झाला. कारण ह्या नुसार घरातल्या बाकी सामानाची जागा ठरणार होती. सगळ्यावादातुन ह्या गादीची अशी जागा ठरली की ह्यागादीवरुन टी व्ही बघणे एकदम सोपे झाले. आता सोफा व इतर बैठकीचे महत्त्व कमी झाले कारण तिकडे लोळुन टी व्ही पाहाणे शक्यच नव्हते. तर अश्या ह्या जागे मुळेच आमच्या घरात वादाला सुरवात झाली.

तर मुख्य वाद होता तो माझ्या आणी ताई मध्ये. दोघांनाही तिथेच बसायचे असायचे. त्यातुन वाद काही वेळा मारामारी पर्यंत गेला. ह्या गादीचे अजुन एक महत्त्व म्हणजे, जो ह्या गादीवर बसेल रीमोट त्याचाच कडे असायचा. अहो आमचा रीमोट खराब झालेला. गादीवरुन त्याचा अँगल मस्त पकडला जायचा. त्या मुळे आमच्या मधले वाद अजुनच वाढायला लागले. माझी क्रिकेट बघण्यासाठीची मरमर तर ताई चे नेहमी सिरियल. ह्यात कधी कधी बाबासुद्धा त्यांचा व्हेटो वापरुन घ्यायचे. उन्हाळ्यात ह्या गादीचा अजुन एक फायदा म्हणजे कुलर ची सरळ हवा ह्या गादीवर यायची. आमच्या दोघांमधे तिसरा वाटा मागायला आमचा चुलत भाउ सुट्ट्या लागल्या की लगेच हजर व्ह्यायचा. हा सगळ्यात लहान असल्या मुळे आई बरेच वेळा त्याचीच बाजु घ्यायची. लहान आहे रे त्याला पण झोपु दे त्या गादि वर.
तर आमच्या कडची ही गादी म्हणजे लहान मुलांचे स्पेशल आकर्षण. ह्याचे कारण ह्या गादीची उंची. ह्या गादीवर कुठल्याही रांगु शकणार्‍या मुलाला स्वःताहुन चढता उतरता यायचे. आजही कोणीही छोटे आले की सरळ ह्या गादीवर जाउन बसते. तर अश्याह्या गादीवर मागचे चार दिवस झाले मी लोळत पडलो आहे. पण आता ती मजा नाही. मी एकटाच ह्या गाडी वर हे काही पटत नाही असे वाटते की आताच ताईला फोनकरावा व तिच्याशी खुप खुप भांडावे. तुम्हाला वाटत असेल की ह्याने हे एवढे सगळे कशाला खरडले असेल. तर ह्या गादीवर चार दिवस लोळुन तीच्या बद्दलचे प्रेम मला कुठे तरी करायचे होते म्हणुन.

आज तुझा वाढदिवस

आज तिचा वाढदिवस.........

काल सकाळी उठुन ऑफिसला पोहचायचे होते, पण सोमवार रात्रीच्या बियर मुळे उशिरच झाला. धावत पळत माझ्या जागेवर पोहचलो तर आजुबाजुचा जागेवरचे सगळे गायब, मरुदे म्हण्त त्तसेच जागेवर बसलो व मि पा उघडले. थोड्या वेळाने आमचे साहेब प्रकटले, आमची मि पा ची खिडकी उघडिच होती. त्याकडे रागाने बघत म्हणाले "आज तारिख काय माहिती आहे तुला???" (आमचे साहेब व आम्ही शुद्ध मराठी मधे बोलतो सगळ्या भैयांसमोर) माझ्या चेहेर्‍यावर एक खुप मोठे प्रश्नचिन्ह जे मला पण दिसत होते. मनात आले "सकाळी सकाळी ह्याला काय झाले" (मनात थोडी विषेशणे लावली होति आम्हि, पण आम्हला संशय आहे की तो पण इकडे वाचनमात्र आहे.) साहेब जोरात आवाज करुन आमच्यावर ओरडले "अरे आज २४ तारीख आज आपला रिव्हु होता." "झाला???" अचानक माझ्या तोंडातुन निघुन गेले, आणि व्ह्यायचे तेच झाले त्याने मला शिव्यांचि लाखोळी वाहीली व निघुन गेला. बाजुच्या खुर्चीवर बसणार्‍याने लगेच आपले नाक खुपसले "यार २४ मार्च लक्षात नाही ठेवता येत का???झाले सकाळी सकाळी जे आठवु नये ते आठवले. आज २४ मार्च म्हणजे उद्या तिचा वाढदिवस.

मन आठवणीत रमायला लागले, डोळ्या समोर आला तो मागचा २४ मार्च, काय काय केले होते मी तुला सरप्राईज करायला. बारा वा़जता तझ्या घरि केक घेउन आलो होतो. आठवतय तुला??? काळ वेळ विसरुन मी हरवलो तुझ्या आठवणीत, तुझ्या सोबत घालवलेले ते क्षण. तासन तास तुझ्याशी ते फोन वर बोलत बसणे, तुझ्या सोबत समुद्र किनार्‍यावर घालवलेल्या ती संध्याकाळ. तुझ्या सोबत खाल्लेली ति तिखट मिसळ, तिखट मिसळ खाउन तुझे लालबुंद झालेले नाक. असेच आठवत होतो सर्व काही. सहजच हात फोन कडे गेला आणि इछ्छा झाली तुला फोन लावायची. तुला फोन लावणार तितक्यात तु आलिस डोळ्या समोर सांगताना "आपल्या मधले सगळे संपलय, आज पासुन आपले नाते ते फक्त मैत्रीचे.

तिला फोन लावावा की नाही हे द्वंद मनात चालु असतानाच परत आमच्या साहेबाने पकडले. माझ्या हातात फोन, मी फोन कडे पाहात बसलो आहे, समोर मि पा ची खिडकी उघडि आहे, आणि साहेब माझ्या जागेवर. वा!!! काय छान योग आहे हा????? साहेबाने आम्हला परत एकदा आपादमस्तक न्याहाळ्ले. आणि आज्ञा दिली "कम विथ मी एन वॉर रुम" परत एक प्रश्नचिन्ह. आमच्या खुद के साथ बाता सुरु झाल्या. "ईग्रंजि मधे बोलतोय??? आणि वॉर रुम मधे??? आता कोणाशी युद्ध करायचे वॉर रुम मधे जाउन??? कसे बसे तिथे जाउन बसलो तर साहेब सुरु झाले. "निखिल आज तब्येत बरी नाही का?? सकाळ पासुन खुप विचित्र वागत आहेस??? मि काही तरि थातुरमातुर उत्त्तर दिले. साहेबाने पुढची गुगली टाकली "आज जर बरे वाटत नसेल तर लवकर घरि जा" मी मनात " काय काम आहे लवकर सांग आता" "फक्त जायच्या आधी तो रिपोर्ट मला पाठवुन दे". कसे बसे बाहेर आलो व कामाला लागलो. नेहमी प्रमाणे स्वःताची समजुत घातली. काम तसे फार मोठे नव्हते पण संपवे पर्यंत पाच वाजले.

कसे बसे स्टेशन वर आलो, लवकर ऑफिस मधुन निघाल्या मुळे तेथे गर्दी नव्हतिच. चहावाल्या जवळचे बाकडे रिकामे होते. आठवत आहेत का तुला ह्या इथेच बसुन कितिदा तु माझी वाट पाहीलि होतिस. उशिर झाला म्हणुन धावत पळत मी आल्या वर तुझे ते खोटे रागवणे. मग हळुच जेव्हा मी पुला वरील आज्जी कडुन घेतलेले गुलाबाचे फुल तुला द्यायचो तेव्हा जे काही भाव तुझ्या चेहर्‍यावर असायचे ते मी आजपण विसरलो नाहिये. मागच्या तुझ्या वाढ्दिवसाच्या आद्ल्या दिवशि इथेच आपण भेटलो होतो. परत एकदा हात खिश्या मधे गेला, फोन बाहेर आला. परत तेच आले डोळ्या समोर मी तिथेच बसुन राहीलो.

थोड्यावेळानी बघतो आजुबाजुला अंधार पडला होता . तसेच उठुन मी ट्रेन पकडली व घरि निघुन आलो. घरि आल्या आल्या मला लक्षात आले की आज आपण एकटेच आहोत. रुममेट तर गावाला गेला आहे. तसाच निरिछेने बसुन राहीलो. सुचत नव्हते काही म्हनुन उचलला फोन, तुला लावणार होतो ग पण टाळुन जुन्या मित्राला लावला. ज्या मित्राशी एक वर्षात बोललो नव्हतो त्याला फोन लावला. तुझा सोडुन सगळ्या विषयावर मी मो़कळे पणे बोललो. तुझा विषय निघाल्यावर नेट्वर्क नाही म्हणुन फोन काटला. नउ वाजताच घरात अंधार करुन झोपलो. झोप येत नव्ह्ति तरि तसाच पदुन राहीलो. रात्री बारा चे टोल पडल्यावर परत फोन कडे हात गेला, समजवले मनाला नवर्‍या सोबत करत असशील साजरा. पण माझे मन आले तुझ्या घरी केक घेउन. तुला नवर्‍या सोबत आनंदी बघुन तसेच आले परत फिरुन.

मनाला समजावणे सुरु झाले , कि ति आता तिच्या नवर्‍या बरोबर सुखी आहे. आता तिच्या आठवणी काढुन काही एक फायदा नाहीये.आज सकाळी वेळेवर ऑफिसला आलो.सकाळ पासुन टाळत आलो तुला फोन करायचे. समजावत आलो की विसर तिला आता. हा काय वेडेपणा लावला आहे काल पासुन?? गेले काही दिवस तर तु तिची आठवण सुद्धा काढन नव्हतास.  खालच्या ओळी वाचल्या आणि मनाला शांत करायचा प्रयत्न केला.

कुणाची ईतकी ही ओढ नसावी ,

की पदोपदी त्याचीच वाट बघावी !

त्याची वाट बघता बघता ,

आपलीच वाट दिशाहीन व्हावी !



असाच दिवस घालवुन आज घरी पोहचलो अजुन तिला फोने केला नव्हता. आता फोने कडे हात जातही नव्हता. घरी आल्या वर असेच काय करायचे बसुन म्हणुन ह्या रवीवारी घेतलेल्या सि डी ची पिशवी घेतली, त्यातुन हातात आली ति, गुलजार आणि सौमित्र ह्यांचा कवितेची सी डि "तरिही". ह्यातल्या एका कवितेवर मी थबकलोच. ति कविता खाली देत आहे.


उद्या तिचा वाढदिवस मनात नाहीच धरायचा

खुप खुप वाटल तरी फोन नाही करायचा

उद्या तिचा वाढदिवस खुप खुप चालायच

जुने जुने मित्र शोधुन नविन सगळे बोलायच

स्वःता सोबत बोलतानाही उगाच नाही अडायच

संध्याकाळी गर्दी मधुन बाहेर नाही पडायच

गजबजलेल्या प्लॅट्फॉर्म वरती उगाच बसुन रहायच

घरी चाललेया माणसांकडे आपुलकीने पाहयच

गुड्डुप्प करुन काळोख आज लवकर झोपुन जायच

आज मोडायच नियम रात्र जागायच

पण खुप खुप वाटल तरी फोन नाही करायचा

बारा नंतर तिचि खुप आठ्वण येत राहिल

मन उठुन केक घुन तिच्या घरी जाईल

जणु काहिच घडल नाही अशिच ती पाहिल

नवरा घर मुल ह्यांचात पुन्हा रमुन जाईल

आपण पुन्हा रस्त्यावरती एकटे एकटे असतो

मध्यरात्री बारमधे मु़काट पिउन बसतो

आज पासुन असल जगण मुळिच नाही जगायच

आता पुन्हा कधिच वळुन मागे नाही बघायच

आज पासुन आपलाच हात हातात धरायचा

खुप खुप वाटल तरी फोन नाही करायचा



ह्या कवितेचा शेवटी सि डि मधे एक फोन वाजतो.हा लेख लिहित असताना माझाही फोन वाजला. सहज पाहीले तर तिचा नं होता.

गिरिश

(माझे मुख्यतो मिसळपावमी मराठीवर केलेले लेखन परत इकडे प्रकाशीत करत आहे.)

आज सकाळी नेहमी प्रमाणे ऑफिसला निघालो. सोसायटिच्या समोरच्या मैदानात काही मुले क्रिकेट खेळत होते, एक दहा-बारा वर्षांचा मुलगा बॉलिंग करत होता, त्याचा कडे पाहुन माझे पाउल अचानक थांबले, तो पळत आला आणि त्याने डाव्या हाताने जोरात बॉल टाकला आणि त्याने बॅट्समन ला बोल्ड केले. त्याला पाहुन माझ्या डोळया समोर गिरिश उभा राहिला. गिर्‍या माझा बालमित्र माझा शेजारी. असाच गिरिश ला आठवत मी पुढे जाऊ लागलो आणि डोळ्यात समोर उभा राहिलं तो दिवस.




मी असाच घरात लोळत पडलो होतो. पहिल्या पावसाची पहिली सर बाहेर पडत होती. शांत पणे गॅलरी जवळच्या सोफ्यावरबसुन बाहेर मस्त पाउस बघत बसलो होतो. आईने काहीतरी काम दिले म्हणून मी तेथुन उठलो,आत मधे काही तरी आवरत असताना अचानक बेल वाजली. मी दार उघडण्यासाठी बाहेर आलो, दार उघडुन बघतो तर बाहेर कॉलनीतले राजेश, पप्पु व अमित अर्धवट भिजलेल्या अवस्थेत उभे होते. मी त्यांना विचारले " काय झाले रे??" तिकडुन उत्तर आले "काका आहेत काय???" मी जरा घाबरलोच काय झाले ते तर कळ्त नव्हते, पण कोणि काहि सांगत नव्हते. इतक्यात कोण आले आहे बघायला बाबा बाहेर आले. बाबांनीहि तोच प्रश्न विचारला. त्यावर कोणीतरि म्हणाले " काका गिरिश सापडत नाहीये"



मला तर काहिच कळत नव्हते पण बाबांचि अवस्था सुद्धा तशीच होति. B.com दुसर्‍या वर्षाला असलेला मुलगा जर सापडत नाही असे तुम्हाला जर कोणि सांगितले तर कोणाची काय अवस्था असणार. मी सुन्न होवुन बघत होतो, बाबांनि त्यांना आत बोलवले, कारण खाली गिरिशच्या घराचे दार उघडे होते, त्याची आई घरात एकटी होती, आत बोलवल्यावर त्या तिघांपेकी कोणितरि सांगायला सुरवात केली. आज ते लोक सातारतांडा जवळच्या एका पाझर तलावात पोहायला गेले होते. बाबांनि त्यांना एक नाही अनेक प्रश्न विचारले. काय ते आज मला आठवत सुद्धा नाही. फक्त आठवते ते एवडेच की मी त्या मुलांच्या सोबतच तलावावर जायला निघालो. बाबा गिरिश चा वडिलांना ऑफिसमधे घ्यायला गेले.



गिरिश आणि माझि पहीलि भेट कधि झाली ते मला आठ्वत नाही. गुलमोहर मध्ये असलेल्या आमच्या फ्लॅट मधे आम्हि राहिला आलो तेव्हा मी दुसरि मधे होतो. गिरिश गुलमोहर च्या तळ मजल्यावर राहणारा, माझ्या पेक्षा एकच वर्ष मोठा. आमच्या शाळा वेगळ्या वेगळ्या होत्या. त्यामुळे आमची भेट संध्याकाळीच व्हायची. आम्ही गुलमोहर मधले मुले-मुली सोबत विष्-अम्रुत, लंपडाव असे अनेक खेळ खेळायचो. ह्या खेळामधे गिरिश नेहमी पुढे असायचा. संध्याकाळच्या खेळातला एक आमचा खेळ असायचा फुलपाखरु पकडायचा(आता कळते तव्हा फुलपाखरु पकडताना आई बाबा का ओरडायचे). आम्ही एक चिमणी सुध्या पाळली होती. तर ह्या चिमणी पाळण्यात चिमणि पकडण्याचे काम करणार गिरिशच होता. एकदिवस हा गिरिश शाळेतल्या मित्रांसोबत कुठे तरी खेळायला गेला, नंतर आम्हाला कळ्ले की तो शाखेत गेला होता. त्याने शाखेचे अशाप्रकारे वर्णण केले की दुसर्या दिवसा पासुन आम्ही पण शाखेत. शाखेत सर्व खेळात हा पुढे होताच. पण आमचा शाखेचा जाणे लवकरच बंद झाले, त्याला कारण होते १९९२ चे क्रिकेट वर्ल्ड कप. तेव्हा पासुन सुरु झालेले क्रिकेट वेड पुढे अनेक वर्ष चालत राहीले. क्रिकेट खेळन्यात मला जेमतेमच गति होति ती आजही तशिच आहे. पण गिरिश म्हणजे आमचा वसिम आक्रम होता. तसाच लेफ्ट आर्म बॉलींग करणारा. तशिच बॉलिंग ऍक्ट्न. आमचि नंतर नंतर सकाळी भेटायची एक आईडीया होति, सकाळी सकाळी उठुन घराच्या बाजुस असलेल्या अष्ट्विनायक गणेश मंदिरात जायचे. सकाळी मला बोलवायला आवाज द्यायचा तो गिरिशच. एकदा गिरिश शाळेतुन नाटकाचे तिकित घेवुन आला. आला तो ओरडतच बजरबट्टु बजरबट्टु बजरबट्टु.... तर ह्या गिरिश सोबत आम्ही बघितलेले नाटक बजरबट्टु. मी चौथीत असताना बाबांची अमरावतीला बदली झाली. आम्ही गुलमोहर सोडुन अमरावतीला गेलो. हलु हळु माझा गुलमोहर व गिरिशशि संपर्क कमी होवु लागला.



मी दहावीत असताना आम्ही परत गुलमोहर मधे राहीला आलो. त्या वेळेस गिरिश बराच बदलला होता. कॉलेजला जायला लागला होता. ओठावरति मिश्या फुटायला लागल्या होत्या. पण हळु हळु आमचे क्रिकेट सुरु झाले. तसे दहावीचे वर्ष असल्यामुळे शाळा क्लासेस ह्या मधुन मला खेळायला कमी वेळ मिळत असे, पण जेव्हा पण वेळ मिळे तेव्हा मी गिरिश आणि कंपनी ला जाउन मिळत असे. आता गिरिश चा ग्रुप फक्त गुलमोहर वाल्यांचा नव्हता तर पुर्ण कॉलनिच्या मुलांचा होता. कॉलनी चा क्रिकेट टिम चा ओपनिंग बोलर गिरिशच होता. गिरिशचे बारावी झाल्या नंतर त्याने B.Com ला ऍड्मिशन घेतली. त्या वर्षिच्या गणपती मंडळाचा अध्यक्ष गिरिश झाला होता.रोज संध्याकाळी आपल्या मित्रांना घरा समोर घेउन जमणार गिरिशच होता. संध्याकाळी तास-दोन तास पंधरा- विस मुलांचा घोळका उभा असायचा, पण कधी रस्त्यावरुन जाणार्‍या मुलींना कोणी त्रास दिला असे ऐकण्यात तर नाही आले.कधी कधी मी सुद्धा तिकडे उभा राहुन त्यांचा सोबत गप्पा मारायचो.



मी जेव्हा त्या तलावावर पोहचलो तेव्हा तिथले दृष्य फारच भयानक होते. बाजुच्या गावातले १००-२०० लोक तलावाभोवती गोल उभे होते. आमचे काहि मित्र आधिच ति़कडे पोहचले होते. वाट बघत होते ते अग्निशमन दलाची, थोड्यावेळाने तो डायवर आला, त्याला सुध्या गिरिश ला शोधायला बराच वेळ लागला. तेवढ्या वेळात गिरिश चे वडिल तिकडे पोहचले होते. ते दृष्य पाहुन तर काका खालीच बसले. थोड्यावेळात गिरिश ला बाहेर काढण्यात आले. गिरिश ला तिकडुन लगेच दवाखान्यात नेण्यात आले. पण तो पर्यंत खेळ संपला होता. माझा मित्र गिर्‍या गेला होता. त्या दिवशि काय झाले हे आजहि मला माहित नाहि, कधी विचारले ही नाही. कारण ते जाणुन तरी काय फायदा गिरिश तर गेला होता. त्या नंतर गुलमोहर च्या खालचा कट्टा बंदच झाला.