बुधवार, जानेवारी ०६, २०१०

कातरवेळ

शनिवारी सकाळी लवकर ११-१२ वाजे पर्यंत उठायचा प्लॅन होता. पण कुठले काय??? सकाळी ७ वाजता फोन वाजला... पहातो तर सिंगापुरातुन फोन..!!! नाही हो सिंगापुरच्या काकांचा नव्हता... एक जुना कलिग सकाळी सकाळी एक इश्श्यू मधे अडकला होता. त्याचा प्रॉब्लेम सोडवता सोडवता झोप चांगलीच उडाली.... आता इतक्या भल्या पहाटे(!) उठून काय करावे ते कळतच नव्हते. पेपर वाचून झाला... त्यात काही तरी सचिन च्या कार्यक्रमाच्या आयोजकांनी मराठी वृत्तपत्रांना बोलवले नव्हते तरी दुसर्‍या दिवशीचा अंक सचिन स्पेशल काढण्यात येणार असे लिहिले होते. चालू द्या!!!! म्हणून मी पुढच्या कार्यक्रमाकडे वळायचे ठरवले. सगळ्यात आधी सुचलेले काम म्हणजे माझे आवडीचे..... खायचे काम.


आवरुन सरळ आण्णाच्या हॉटेलात पोहचलो. एक इडली सांबारात बुडवून असे काहीसे बोलल्यावर वेटर माझ्या कडे विचित्र नजरेने बघत होता. त्याचा पुढचा प्रश्न

"साहब, ईडली सांबार मे डुबाके लाऊं क्या?"

आपलीच चूक म्हणायचे झालं आणि परत एकदा चालू द्यायचं....

" हाँ मैने पहले भी आपको वही बताया था
"



इडलीचा 'समाचार' घेता घेता मनात पुढे काय करायचे ह्याचे विचार चालूच होते,तेव्हाच असे जाणवले की आपले केस कानावर खूप आलेले आहेत.... थोडक्यात वाढले आहेत, आणि कापवायची गरज आहे... अण्णाच्या हॉटेलाच्या बाजूलाच एक केशकर्तनालय आहे खरे!!! पण मागच्या चार वर्षात फक्त दोनच वेळा मुंबईत केस कापवले आहेत. ह्याबाबतीत आमचे स्पष्ट मत आहे की मुंबईतल्या केस कापणार्‍यांना मुळीच केस कापता येत नाहीत..... त्यांना फक्त एकच स्टाईल येते.... स्पेशल भैया कट!!!!!

(विचारवंतांनो आम्हाला कबूल आहे, हा पण आमचा एक पुर्वग्रह!!!! ) असो, तरीही कसे बसे ठरवले काहीतरी लै भारी नाव असलेल्या सलून मधे जाऊन केस कापवायचे.



सलूनचे नाव तर जबरदस्त आहे बरे का मंडळी!!!! "सिझर्स ट्रिक". आमच्या त्या संकुलात हे दुकान जरासं आतल्या बाजूला आहे. तिकडे पोहचलो तर एक माणुस आधीच वाट बघत बसला होता. त्यामुळे मलाही वाट पहाणे क्रमप्राप्त होते... बाहेरच्या बाकड्यावर बसलो...टाइमपास म्हणून दुकानात इकडे तिकडे नजर टाकताना लक्षात आले, केशकर्तनालयाच्या काचेच्या तावदानावर वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातम्यांची कात्रणे होती... जरा जवळ जाउन पाहिले तर कात्रणे मराठी वृत्तपत्रातली होती. उगाचच बरे वाटले. वाचायला सुरूवात केली आणि आत मधे काही तरी त्रास व्हायला लागला. पहिले कात्रण "मनसेच्या चार आमदारांचे निलंबन" आणि दुसरे कात्रण "मराठी लोकांना मराठीत न बोलण्यासाठी मराठीतून गांधीगिरीच्या मार्गाने शिकवणार" आणि बाकीची मग अशीच काही तरी. बरे या दोन बातम्यांच्या छायांकित प्रती संपुर्ण दुकानभर लावलेल्या होत्या.

माझी पहिली प्रतिक्रिया दगड उचलुन ते दुकान फोडण्याचीच होती, पण मिपा वरचे विचारवंताचे लेख वाचुन जरा संयमाने वागावे असे उगाचच वाटले. त्यात अजून एक विचारवंती किडा डोक्यात आला " त्या माणसाची ह्या मागची भुमिका तरी समजावुन घ्यावी".

मग सहजच त्या दुकानाच्या मालकाकडे गेलो. त्याला जमेल तेवढ्या शुद्ध हिंदित विचारले....

"ह्या बातम्या ईकडे लावण्याचे प्रयोजन काय?"

त्यावर साहेबांचे उत्तर: " आप मराठी लोग, हिंदीमें बात करने को शरमाते क्यों हो??? हिंदी तो आपकी राष्ट्रभाषा है
आप बंबई मै हिंदी मे बात न करके देश को तोड रहे हो
"

कसा बसा राग आवरत त्याला उत्तर द्यायला सुरवात केली " पहिली बात हिंदी यह राष्ट्रभाषा नहीं है वह अपने संघ की दो में से इक राजभाषा है
अगर पढाई लिखाई जानते हो तो अपने संविधान के अनुच्छेद ३४३ पढ लेना
उसके आगे अगर आप मानते हो की मुंबई महाराष्ट्रमें है
तो संविधान के अनुच्छेद ३४५ कै तहत महाराष्ट्र की राजभाषा मराठी है
"



ह्यावर त्याचे उत्तर "आप संविधान हमे ना सिखाये, हम सातवी कक्षा तक पढा हूँ
और हमारे स्कुलमें हिंदी राष्ट्रभाषा है यह सिखाया है
और रही बात बंबई महाराष्ट्र की है या नही"

माझ्या समोर त्या दिवशीचा पेपर टाकत " 'आपके' सचिन तेंडुलकरने ही आज कहा है मुंबई सबकी है
आप लोगो को मराठी बोलना छोडना चाहिये
"



तेवढ्या वेळात त्या माणसाचे चार कर्मचारी माझ्या बाजूला गोळा झाले. चार खुर्च्यांवर बसलेले जे गिर्‍हाईक होते त्या पैकी दोन लोक फोन वर बोलत होते. आणि ते चक्क मराठीत फोन वर बोलत होते. सगळ्यांनी मला घेरले. कोणीही माझ्या बाजुने बोलायला तयार नव्हते. बाकी दुकानातले सगळे कर्मचारी लोक तर मला मारायच्या तयारीत होतेच. पण राडा करायचा नाही ही शिकवण अशातच मिपावर शिकलो होतो ना!!! त्याला उत्तर द्यायला सुरवात केली

"मुझे एक बात बताओ आप लोग यहापर धंदा करने आये हो आपको मराठी सिखनी चाहिये ना, और रही बात सचिन की ,मुंबई सबकी है ऐसा भी समझ लो पर भारत वर्ष मै सब लोग क्या हिंदी जानते है?? मुझे लगता है आप लोगो को यहा धंदा करनाही नही है
मै अपने बाल आपके यहा कभी नही कटवाउंगा" और सबसे पहिले यह सब यहा से निकाल डालो
"

असे म्हणुन मी ते लावलेले कात्रण फाडुन टाकले. तिथे बसलेले बघे माझ्या कडे काय मुर्ख राडेबाज आहे याच्या मुळे मला घरी जायला उशीर होतोय अशा नजरेने माझ्या कडे बघत होते. दुकानातुन बाहेर पडलो इच्छा झाली मनसेच्या एखाद्या कार्यकर्त्याला सांगावे ह्या लोकांना सरळ करायला. पण परत तोच प्रश्न!!!! राडेबाजी योग्य आहे का??? आजच सचिनला राजकारणावर बोलायची गरज आहे का?? आमच्या देवानेच असे करावे का??? रोज येणारे असे छोटे मोठे अनुभव असेच सहन करत जगायचे काय??? मराठीचा वापर खरेच पूर्ण बंद होईल का??? आमचे विचारवंत म्हणतात भाषा टिकवण्यासाठी सामाजिक चळवळ करावी पण कोणी सांगेल का मला कशी करायची चळवळ??? छे उगाचच विचारवंत झालो आज शरमेने मान तर खाली घालावी लागली नसती..... त्या चार पाच जणांना फोडून आलो असतो तर माझ्या मनाला तरी समाधान मिळाले असते. पण आत मधे बसलेल्या त्या दोघा मराठींचे काय??? त्यांना ह्याबद्दल काही बोलावसे वाटत नाही का??? त्या मूढांना घरी जायला उशीर नको म्हणुन मी तिकडे राडा केला नाही पण सनदशीर मार्गाने बोलायला पण कोणी माझ्या बाजुने उभे राहिले नाही. आपल्यातच ही दुही का??? लोक सरळ मुंबईत हिंदी बोला सांगतात आणि मी काहीच करायचे नाही कारण माझ्या बाकी मराठीत बांधंवांना त्रास होईल. पण ते बांधव खरच हा मुद्दा समजावुन घ्यायला तयार आहेत का??? शेवटी ह्याच ओळी आठवतात हो

" पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी आपुल्या घरात हाल सोसते मराठी".

खरे तर आज त्या दुकाना मधले कर्मचारी आणि ते दोन माझे लाडके मराठी बांधव हे सगळे बरोबर आहेत चुकलो ते मीच. आता आम्ही हिंदी शिकायचे मनावर घेतले आहे तुम्ही ही शिका.



टीप१: हा मला आलेला पहिला अनुभव नाही.... ह्या आधी आणि नंतरही आहेतच. आणि हा अनुभव सत्य आहे.



टीप२:- यातून आम्ही एका घटनेचा दुसर्या घटनेची बादारायण संबध लावला आहे. असो!!!! विचारवंतच ना आम्ही. पण आम्हाला तुम्ही तसे म्हणू शकत नाहीत. कारण काय आम्ही विचारवंत आम्ही परदेशातल्या कुठल्याशा स्मारकाचा आणि इतिहासाचा संबध लावल्यास तो एक उत्कृष्ट लेख ठरतो. एक तरी विचारवंत यावर तोडगा सांगू शकतो का??? मग आमचा दुकान फोडायचा मार्ग चुकीचा एवढेच सांगताय काय??? चैतन्याने भरलेली तरुणाई वाहवत जाउ नये वाटते तर त्यांना काय करावे ह्याचे मार्गदर्शन करा. रोजचे असे अनुभव घेऊन जगण्याचा कंटाळा येतोय आणि मग चुकीच्या का मार्गाने होईना पण कोणी तरी आमुचा (मॅक्स विचारवंत सध्या परदेशस्थीत आहेत, उगाचच निवासि अनिवासि वाद नका घालु) हा प्रश्न सोडवत असेल तर त्याचा मागे का उभे नाही राहायचे????



टीप३:- सर्व विचारवंतांची माफी मागून. धनंजय आणि विकास यांची स्पेशल माफी मागतो. कारण तुमचे विचार पटायला सुरवात झाली होती पण त्याने माझ्या रोजच्या जीवना मधला प्रश्न सुटणार नाहीत. परत एकदा मी या एकाच अनुभवाच्या जोरावर बोलत नाहीए. मुक्तसुनीत ह्यांनी सामाजिक चळवळीने हा प्रश्न कसा सोडवता येईल हे सांगितले होते त्याबद्दल जास्तीत जास्त मार्गदर्शन करावे. आता माझ्यासमोर दगड उचलण्याशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही... चुकीचे असेलही पण सध्यातरी तोच मार्ग दिसत आहे.... इतर काही मर्ग असल्यास सुचवावे.... योग्य मार्गांसाठी तुमच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे... इथं कोण चूक नि कोण बरोबर ही चर्चा अपेक्षित नाही.. तर कोणत्या मार्गानी हे प्रश्न सोडवता येतील यावर विचार व्हावा असे वाटते.. अर्थात त्यासाठी हा प्रश्न आहे हेच पटणं आधी आवश्यक आहे.. नाहीतर आम्हांला हिंदी शिकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही!!!! इतर मुंबईतील विचारवंतांनो तुम्हाला असा अनुभव येत नाही का??? परत एकदा विचारवंत हा शब्द वापरल्याबद्दल माफी. जरा जास्तच भावुक होऊन लेख लिहिला...



शेवटानंतर :-अजून आमचे केस कापवून घ्यायचे बाकीच आहे. चला हजार रुपये खर्च करुन घरी जाऊनच कापवेन.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा