रविवार, मे ०९, २०१०

श्रावण मोडकांचा तिढा

 पुस्तक:तिढा 
 लेखक: मोडक श्रावण
 किंमत: 250.00
 पृष्ठसंख्या: 296


साधारण आठ दहा महिन्यांपुर्वीचा एक विकांत... नेहमीप्रमाणे औरंगाबादला गेलो होतो. काही कामा निमित्त गावात गेलो होतो, तेव्हा बळवंत वाचनालयात एक प्रदर्शन चालू होते. सहज पावले तिकडे वळली आणि त्याच प्रदर्शनात पुस्तक पाहत फिरताना अचानक एका पुस्तकाकडे नजर गेली. लेखकाचे नाव होते "श्रावण मोडक" आणि कादंबरीचे नाव होते "तिढा". अरे हे मराठी जालावर लिहिणारे मोडक का???" हा प्रश्न मनात आलाच. पण काही कारणास्तव त्यादिवशी तिढा घ्यायची राहूनचे गेले. सोमवार पासून पुढे परत मिसळपाव वर आल्यावर सगळ्यात आधी मिसळपाव वरच्या एक-दोन सदस्यांकडे मोडकांनी कादंबरी लिहिली आहे का अशी चौकशी केली, पण फारसे कुणाला माहीतच नव्हते. शेवटी मोडकांनाच विचारले त्यावरुन ही कादंबरी वाचायची उत्सुकता अधिकच वाढली आणि त्याच शनिवारी जाउन तिढा घेऊनच आलो.

मोडकांच्या जालावरती वाचलेल्या नियमित लिखाणावरुन त्यांचा धरणामुळे झालेल्या विस्थापतांशी आणि त्यांच्यासाठी काम करणार्‍या स्वयंसेवी संघटनांशी जवळुन संबध आला असेल हे लक्षातच येते. त्याचप्रमाणे तिढा मधेही प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रश्न व त्याच सोबत त्यांच्यासाठी काम करणर्‍या स्वयंसेवी अंतर्गत कामकाज व त्यातुन निर्माण होणारा वैचारिक आणि भावनिक गुंतागुंत या कादंबरीत मांडलेली आहे.

मांडणगाव जिल्ह्यातील आदीवासी भागात सरकारने एक फुडपार्क उभा करायचे ठरवलेले आहे. या भागात असलेल्या नैसर्गिक वनसंपत्तीवर आधारित हा फुडपार्क आहे. पण ह्याच साधानसंपत्तीवर अदिवासींचे जीवन अवलंबून आहे. यात अदिवासींच्या प्रश्नांवर काम करणारे राजीव व विदिशा हे एक जोडपे आणि त्यांची संघटना. ह्या संघटनेच्या उर्मिला सारख्या इतर कार्यकर्त्यांना हाताशी घेउन विदिशा व राजीव ह्यांनी फुडपार्क विरुद्ध संघर्ष उभा केला आहेच. पण या सगळ्यांचा आधार असलेली आणि कादंबरीतील सगळ्यात महत्वाची व्यक्तिरेखा म्हणजे धर्मा. धर्मा म्हणजे एक क्लिअर विचार असलेला, कुठल्याही गोष्टी कडे त्रयस्थ नजरेने बघु शकणारा असा युवक. ह्या सगळ्या राजकारणात, संघर्षात परिघावर राहुन काम करणारा असा हा धर्मा.  धर्माचे कॅरेक्टर हे तिढा मधले मला आवडलेले कॅरेक्टर..

     पण शेवटी सगळी माणसे हाडामांसाचीच... सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देताना,कामाची आखणी, अंमलबजावणी करताना कार्यकर्त्यांमधे वैचारीक गोंधळ अपरिहार्यपणे असणारच. इच्छा, महत्त्वाकांक्षा तर आल्याच. मग कुणाला उपेक्षित वाटणं, त्याची दुसर्‍याला जाणीव न होणं, एकमेकांत भावबंध गुंतणं हे सगळं त्रांगडं तिथंही होऊन बसतंच. कोणतंही काम करताना कितीही प्रयत्न केला तरी खाजगी आयुष्य सगळीकडे मधून मधून डोकावत राहतंच. या सगळया तिढ्याचे मस्त चित्रण मोड्कांनी रंगवलेले आहे.

ही कांदबरीच्या वाचताना मोडकांचे इतर लिखाणही आठवत जातेच. या पुस्तकवाचना नंतर एक आयुष्यातला पहिलाच नि आगळावेगळा अनुभव मला मिळाला, आणि तो म्हणजे लेखकासोबत पुस्तकाबद्दल चर्चा. हा एक वेगळाच अनुभव होता. मोडकांना जाउन मी सरळ कादंबरी संबधातले माझे विचार कळवू शकलो,त्यांच्या सोबत पुस्तकाबद्द्ल चर्चा करु शकलो.

आणखी काय सांगू तिढाबद्दल? माझ्या कडच्या पुस्तकाच्या प्रतीची दुबईवारीही पुर्ण झाली. आणि सध्या ते काहीही उणे नसलेल्या पुण्यात न उघडलेल्या लगेज बॅगमध्ये अजूनही सुखाने नांदतेय!!! :)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा