शुक्रवार, फेब्रुवारी २६, २०१०

मराठी जालविश्वाची लोकमत मधे ओळख

हा दुवा वाचा


आहो अगदी तुमची नावे.. ज्या सदस्यांची नावे आहेत त्यांचे अभिनंदन, ज्या संकेतस्थळांची नावे ह्यात आहेत त्यांचेही अभिनंदन

हि & हि चा अर्थ पण दिला आहे ;)



त्यातच नवीन सुरू झालेली "मी मराठी" जास्त खेळकर व अनेक नव्या सुविधा असल्याने अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे!



अशी ओळख करुन दिल्या बद्दल लोकमत ऑक्सिजनचे आभार

सोमवार, फेब्रुवारी १५, २०१०

हे बंध रेशमाचे..२

असाच एका विकेंडला आपला चिल्का सरोवर बघायला जायचा प्लॅन होता.... सकाळी मला लवकर उठवायचे कठिण काम तूच फोन करुन केले होतेस. बस तुमच्या बिल्डिंग जवळून सुटणार होती. मी सगळे आवरुन धावत पळतच पोहचलो होतो... बस मधे चढलो तर नेहमी प्रमाणे तु तुझ्या बाजुच्या खुर्चीवरची बॅग उचलून घेतलीस.. नेहमी पेक्षा आज तू वेगळीच वाटत होतीस... बस सुरु झाली आणि एक एक करुन गाणे बजावणे सुरु झाले... बस मधे काय दंगा घातला होता आपण..!!! त्यात सगळ्यात पुढे आपणच दोघेजण होतो हा भाग वेगळा..... मी माझ्या भसाड्या आवजात "प्रथम तुज पाहता" गायला लागताच तुझे ते हसणे आणि नंतर ते लाजणे आजही मला चांगलेच आठवते.... ह्या गाण्याचा वेळेसच मी ठरवले आजच तुला विचारायचे... आपण चिल्काला पोहचलो तिथे मोठ्या बोटीत बसुन डॉल्फिन बघुन आलो.. आणि नंतर कुणीतरी पायडल बोटिंगला जायचे असे ओरडले आणि मग सगळेच तिकडे निघालो... आपण तिथे पोहचेपर्यंत तिथल्या चार माणसांच्या पॅडल बोटस् सगळ्यांनी ढापल्या.. नि आपल्यासाठी दोन लोकांचीच बोट शिल्लक राहिली... न ठरवताच बर्‍याच गोष्टी मला हव्या तशा घडत होत्या!!! नेहमी प्रेमाणच तू तिथे खुललेली होतीस... आपण किनार्‍यापासून बरेच लांब आल्या नंतर अचानक मी बोट थांबवली... तुझ्याकडे बघुन हसलो... अभावितपणे तू पण हसलीस.. मग हळूच मी तुला म्हणालो.. मला तुला काही सांगायचे आहे.... तु अचानक शांत झालीस.. "मी तुझ्यावर प्रेम करतो"!!! तू आधी एक मंद स्मित केलेस आणि म्हणालीस,"चल रे जाउयात" तू उत्तर द्यायचे टाळलेस.. मी परत विचारले तरी उत्तर दिले नाहीस.. आपण तिथून परत निघुन बस मधे परतलो तरी तू शांतच होतीस... परतीच्या प्रवासात आपण एकदाही एकमेकांशी बोललो नाही.. दुसर्‍या दिवशी सकाळी ऑफिसला जाताना बस मधे चढलो पण तुझ्या बाजुला माझ्यासाठी जागा नव्हती... आपण ग्रुप मधे सोबत असायचो पण तू माझ्याशी बोलायचे टाळायचीस... आपल्या ट्रेनिंगच्या शेवटच्या दिवशी मात्र तू माझ्याशी बोलायला आलीस.. "माझे प्रेम म्हणजेच सगळे काही आहे असे समजु नकोस.. मला प्रेमात पडणे शक्यच नाही... मला माझ्या घरच्यांच्या मनाप्रमाणेच लग्न करायचे आहे" एवढे सांगून तू निघून गेलीस.
ट्रेनिंग नंतर आपण सगळेच मुंबईत आलो... पहिल्याच दिवशी आपल्याला वेगवेगळे प्रोजेक्ट्स मिळाले... त्यामुळे आपला कॉन्टॅक्ट कमी झाला.. आधी तू माझ्या आसपास तर असायचीस पण आता आपले भेटणे केवळ एखाद्या विकेंडला जेव्हा सगळा ग्रुप जमायचा तेव्हाच.. त्यातही तुझा मला टाळण्याच प्रयत्न असायचा... कधीच तू मला बोलायची संधी दिली नाहीस.. तसे मला तुझ्या बद्दल इतरांकडून कळायचे.. पण अजुनही तुझ्या कडुन मला समाधानकारक उत्तर मिळालेच नाही. असेच दिवस जात होते आपल्या भेटी कमी होत होत्या... त्यातच आला तुझा वाढदिवस... खरे तर तुला भेटायची खुप इच्छा होती पण शक्य होईल असे मला वाटतच नव्ह्ते.. पण अजुन एक प्रयत्न म्हणुन मी तुला पुष्पगुच्छ पाठवायचे ठरवले... पुजाशी बोलुन मी एक बुके तुझ्या रुमवर पाठवला... तो पुजानेच रिसिव्ह केला.. तु घरी नव्हतीसच... संध्याकाळी घरी आल्या आल्या तुझा मला फोन!!! जाम चिडली होतीस... मी का बुके पाठवला??... तुला विसरुन जा वगेरे अनेक वेळा सांगितले... ह्या पुढे तुझ्याशी कोणताही संपर्क ठेवू नको असे पण सांगीतले... फार खचलो होतो गं मी...!!!

पुढे एक वर्ष आपला कोणताही कॉन्टॅक्ट नव्हता... खरे तर ठेवू नये अशी तुझीच इच्छा होती... तुझ्या पुढच्या वाढदिवसापर्यंत मी तुझ्याशी काहीच संपर्क ठेवला नव्हता... तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी पुजाचा मला फोन आला... "काय प्रेमवीर, आज पाठवणार का बुके???" असा खोचक प्रश्न विचारला.. खरे तर मला आता फारशी आशा उरलीच नव्हती.. पण पुजाच्या सांगण्यावरुन मी तुला बुके पाठवला... ह्यावेळेस दिवसभर फोन वर असल्यामुळे मी तुझा फोन नाही घेऊ शकलो... तु खुप चिडली असणार.. त्यांना कसे फेस करायचे हे मला कळत नव्हते.. शेवटी हिंमत करुन तुला फोन लावला... ह्या वेळेस तू खुप शांत असल्याचे तुझ्या पहिल्याच वाक्यात जाणवले... "मी का तुझ्यावर प्रेम करावे??? मी तर तुला नीट ओळखतही नाही... मग तुझ्याशी लग्न करायचा निर्णय कसा घेणार??? " असे काहीसे तुझे प्रश्न होते... माझ्या उत्तराने तुझे समाधान होत होते का हे मला कळत नव्हते... पण शेवटी आपण एकमेकांना जाणून घ्यायचे आणि त्यानंतरच तू माझ्यावर प्रेम करू शकतेस का नाही हे तू मला सांगणार असे आपले ठरले!!!
आज तुझा वाढदिवस होऊनही आता तीन महिने झाले आहेत... त्यादिवसा पासून आपण रोजच भेटत आहोत...रोज रात्री किती तास फोन वर बोलणे होतंय याचा हिशेबच नाही.. तुझ्या सोबत घालवलेला क्षणन् क्षण मला आठवतोय.. कुठे कुठे नाही फिरलो आपण मुंबई मधे... पुजाच्या मते आता तू परत पहिल्यासारखी खुलली आहेस... या तीन महिन्यात आपण एकमेकांना खुपच ओळखायला लागलो आहोत... आता एक क्षणही मला तुझ्या शिवाय घालवणे शक्य नाहीय... आणि आपण पुढचे आयुष्य एकमेकांसोबत छान व्यतित करू शकतो हा विश्वास आता मला नक्कीच आहे. म्हणूनच आज ह्या प्रेमदिनी मी तुला परत एकदा विचारतोय...
"माझ्याशी लग्न करशील??? तु माझी होशील का???"
तुझाच वेडा!!!

एवढे लिहुन झाले, लवकर पाठवायला हवे आता....
अरे,आता अशा अवेळी कुणी बेल वाजवली असेल???? बारा वाजायला पाचच मिनिटे बाकी आहेत ... मला बाराच्या ठोक्याला पाठवायचे होते!!!
थोड्याशा अनिच्छेनेच दार उघडले तर माझ्यासाठी एक धक्का होता... मिड-नाईट बुके डिलेव्हरी... आणि त्या सोबत एक नोट...

"माझ्याशी लग्न करशील????"
तुझीच वेडी!!!

हे बंध रेशमाचे!!!

प्रिय सखे....

तू हे वाचे पर्यंत प्रेमदिन सुरु झालेला असेल... ह्या प्रेमदिनी मी आज हे प्रेमपत्र लिहित आहे. खरे तर ह्या नंतर तुझी रिअ‍ॅक्शन काय असेल ह्या भीतीने लिहायला हात धजावतच नाहीय पण आता याचीहि सवय होत आहे असेच म्हणावेसे लागेल... गेल्या तीन वर्षा पासुन आपण एकमेकांना ओळखतो... ओळखतो म्हणजे काय? मागचे तीन महिने सोडले तर आपले बोलणे फार कमीच व्हायचे. अर्थात त्याला कारण मीच आहे हे मला मान्य आहेच.. वागलोच होतो मी तसा... त्याची शिक्षा करतोय ना सहन गेले तीन वर्ष.. आता अजुन किती सहन करणार???? माझ्या समोर अजुनही तीन वर्षापुर्वीचीच तू डोळ्या समोर आहेस...

आपला नोकरीचा पहिला दिवस होता... एका लहानशा शहरातून इंजिनीअरिंग करुन मी ह्या मोठ्या कंपनीत नोकरीला लागलो होतो... अर्थात कँपस मधूनच नोकरी मिळाल्यामुळे फारसा प्रश्न नव्हता आला... "पापा कहतें हैं" सारखी आयुष्यासाठी अनेक स्वप्नं डोळ्यांत घेऊन घरातून निघालो होतो... पहिल्यांदाच बाहेर राहणार होतो... त्यात कंपनीने ट्रेनिंगला भुवनेश्वरला पाठवले होते... आजही तो पहिला दिवस स्पष्ट आठवतो आहे.. कंपनीने दिलेल्या राह्यच्या जागेवरुन प्रशिक्षण केंद्रावर मी लवकरच पोहचलो होतो... साधारण नेहमीचेच सगळे सोपस्कार सुरवातीला झालेच.. तेच कंपनीची ओळख करुन देणारे प्रेझेंटेशन आणि भरमसाठ जाँईनिंग फॉर्म्स.. मग हळू हळू प्रत्येकाची बॅच सांगण्यात आली... त्यात आमच्या कॉलेजचे कोणीच माझ्या बॅच मधे नव्हते... त्यानंतर पुढे त्यांनी आपल्या बॅच साठी सी. आर. होण्यास कोण उत्सुक आहे विचारले.... आधी तर कोणाचाच हात वर झाला नाही. मग अचानक मुलींच्या बाजुला लक्ष गेले तर एक गोरासा हात वर झालेला दिसला... त्या गोर्‍या हाताला मग स्टेजवर बोलवण्यात आले....होय तुझाच तो हात.... आजही आठवतेयस मला तु त्याच रुपात... मोरपंखी रंगाचा तुझा तो पंजाबी ड्रेस... मानेवर रुळणारे केस... कसे विसरु तुझे ते रुप... लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट का काय असेच झाले होते... आणि तु अगदी बिनधास्त स्टेजवर जाउन स्वत:ची ओळख करुन देत होतीस...काही सेकंद माझ्यासाठी जगच थांबले होते की काय??? तु जागेवर जाऊन बसे पर्यंत मी तुझ्याच कडे बघत होतो..

कार्यक्रम संपताना आजच्या दिवशीची उपस्थिती प्रत्येकाने सी आर कडे नोंदवायची होती... माझी नजर तुलाच शोधत होती.. आणि मग मी तुझ्याकडे आलो.. तेव्हा पहिल्यांदा तुला जवळून बघितले.... तुझ्या घार्‍या डोळ्यांनी तर मला घायाळच केले म्हणावे!!! त्या मोरपंखी ड्रेस वर मोरापिसाचे कानातले...अगदी आ वासून मी तुझ्या कडे पहात होतो.. कदाचित ते तुझ्या लक्षात आलेही असावे...सगळ्यांची तुझ्याकडच्या कागदावर सही करुन झाली तरी मी तसाच उभा होतो.. शेवटी तूच माझ्या समोर आलीस आणि माझ्या हातात तो कागद दिला "Please sign this"... सही करत असतानाही माझे लक्ष तुझ्याकडेच होते म्हणा... सहीचा कागद तुझ्या हातात देताना आपली नजरा नजर झाली आणि तु माझ्या कडे बघुन गोड हसलीस... अगदी हृदयात कळ यावी असेच होते ते हसू.... आणि त्यानंतर "जोशी, माझ्या कडे बघणे झाले असेल तर वर्गा कडे चला!!!" हा टोला तर खासच होता...
त्यानंतरचे काही दिवस असेच गेले.. म्हणजे आपली ओळख तर झाली होती... आपण योगा योगाने एकाच ग्रुप मधे आलो होतो.. एकाच ग्रुप मधे असल्या मुळे रोज ट्रेनिंग संपल्या नंतर आपण एकत्र असायचो... हळु हळु बोलणेही वाढत होतेच.. ओळखीचे रुपांतर मैत्रीत होत होते... माझ्या प्रत्येक दिवसाची सुरवात तुला एस एम एस करुनच व्हायची आणि शेवट तुझ्याशी फोनवर बोलतच व्हायचा. आपल्या मैत्रीबद्दल आपल्याच ग्रुप मधे अनेक लोकांना आश्चर्य वाटायचे... तुझी तर अखंड बडबड चालू असायची... तुलाही माझ्यासोबत वेळ घालवणे आवडायचे असे वाटायला लागले होते.. त्यात रोज रात्रीच्या त्या कॉफीशॉप मधल्या गप्पा.. तू तुझ्या शेजारची जागा माझ्यासाठी वर्ग, कॉफीशॉप प्रत्येक ठिकाणी राखून ठेवणे.. ह्या सगळ्यांनी मी खरे तर सुखावतच होतो... साधारण महिना भर हे असेच चालले असेल, अगदी आपल्या चिल्का च्या ट्रिप पर्यंत....
(क्रमशः)

वाघोबा

काल रात्री टीव्ही वर "सेव्ह अवर टायगर" अशी काहीशी अ‍ॅड पाहिली तेव्हा पासून डोक्यात वाघोबाच होता... त्या जाहिरातीत नुसार फक्त १४११ वाघ उरलेत तुम्ही त्यांना वाचवू शकता असे काहीसे आवाहन होते. त्यात पुढे तो एअरसेल ह्या कंपनीने सुरू केलेले हे कँपेन आहे असे पण सांगितले... जाहिरातीत दाखवलेले वाघाचे पिलू मला आवडले.. तसे व्याघ्रदर्शन हा दुर्मिळच योग मानला जातो. म्हणजे पिंजऱ्यातले वाघ बघणे सोपे आहे हो. पण ह्या जंगलाच्या राजाला पाहायचे तर त्याच्याच जंगलात. पिंजऱ्यातले वाघाचे दर्शन अनेक वेळा अनेक प्राणी संग्रहालयातून घडत आलेले आहेच... त्यात आमच्या औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयातल्या पांढऱ्या वाघा पासून ते ओरिसा मधल्या नंदन कानन मधल्या खोट्या जंगल सफारी पर्यंत. नंदनकानन मध्ये एका मोठ्या भागाला तारांचे कुंपण घालून आत मध्ये वाघांना बंदिस्त केलेले आहे.. आणि ह्या भागाची बस मध्ये बसून सफर करून लुटुपुटुची जंगल सफारी अनुभवता येते. आता ह्याला लुटुपुटुची म्हणता येईल कारण पाच ते सहा वेगवेगळ्या वेळेस वाघ ह्या प्राण्याला जवळून पाहता आले आहे. अर्थात सगळे अनुभव बरेच जुने आहेत पण त्यातले काही आजही डोळ्या समोर आहेत.

अमरावतीला राहात असताना चिखलदऱ्याला जाणे वारंवार व्हायचे. चिखलदार हे परतवाड्या जवळचे हिलस्टेशन आणि मेळघाट टायगर प्रोजेक्टच्या जवळ आहेच. चिखलदऱ्याला जायला अमरावतीहून सकाळी निघायचे सुरवात भिमकुंड पासून करून शेवट सनसेट पाँईटला करायचा हा आमचा नेहमीचा कार्यक्रम. जर मुक्काम असेल तर मजा असायची. आमच्या ओळखीचा तिथला एक लोकल ड्रायव्हर होता त्याची खास ट्रॅक्स घेऊन तो आम्हाला जंगलात घेऊन जायचा. म्हणजे अगदी टायगर रिझर्व मध्ये नाही पण आजूबाजूला. आश्चर्य म्हणजे ह्या ड्रायव्हरला ऐकू कमी यायचे पण चिखलदरा घाटात गावात त्याचा गाडी चालवण्यात कुणीच हात धरू शकत नसे. असेच कधी तरी एकदिवसीय सहलीला अमरावतीला गेलो होतो. सोबत दर वेळेस गावाहून येणारे नवीन पाहुणे असत. तर असेच एकदा कमांडर किंवा ट्रॅक्स ज्याला फक्त साइडने ताडपत्री असायचे दार नाही अशी गाडी घेऊन प्रवास चालू होता... लहान असताना नेहमीचा हट्ट करून ड्रायव्हर शेजारची समोरची जागा मी पटकावली होतीच. परतीचा प्रवास चालू होता, गाडीत गाणी अंताक्षरी वैगेरे चालू होते... ड्रायव्हर ने जोरात ब्रेक दाबला... "साहेब वाघ" हे त्याचे उच्चार कानावर पडायच्या आधीच वाघ उजव्या बाजूला असलेल्या डोंगरावरून रस्ता ओलांडत होता. त्या लाइटच्या उजेडात पहिल्यांदाच बघितलेल्या मुक्त वाघाचे रूप म्हणजे काय वर्णावे.. आणि गाडी आणि माणसाची चाहूल लागूनही तो तसाच रस्त्याचा कडेला उभा होता. एकक्षण असाच गेला सगळे शांत त्याने आमच्या कडे वळून पाहिले आणि तो तसाच पुढे दरीत उतरून निघून गेला. हेच वाघाचे पहिले झालेले दर्शन.

ह्या चिखलदऱ्या पासून साधारण १५-२० किमी अंतरावर थोडे जंगलात उतरून गेल्यावर सेमाडोह नावचे गाव लागते. ह्या गावापासूनच मेळघाट व्याघ्रप्रकल्पात बस द्वारे जंगल सफारी करवून आणण्यात येते, साधारण दहा वर्षापूर्वी पर्यंत येथून चार वाजता एक आणि पाच वाजता एक अश्या दोन बसेस जंगल सफारी साठी सोडण्यात येते, इथे माझ्या आठवणी नुसार जंगलात सरकारी रिसॉर्ट सारखे काही तरी आहे. त्या रिसॉर्टच्या आवारातूनच बसेस सुटतात. तसे हे रिसोर्ट सुद्धा एका नदीच्या किनारी आहे असे काहीसे आठवते. ही बसची जंगल सफारी मी आठ ते दहा वेळा केली असेल पण त्या सफरीत मला एकदाही वाघाचे दर्शन झालेले नाही. पण असेच एकदा आम्ही दुपारी साधारण तीन वाजता इथे पोहचलो तिथल्या फॉरेस्ट ऑफिसरने माहिती दिल्या प्रमाणे चारची बस आधी पासूनच फुल्ल होती मग काय करायचे. त्यादिवशी जादा बस सोडणे शक्य नव्हते कारण एका गावकऱ्यावर वाघाने हल्ला चढवला होता व त्या गावकऱ्यास हॉस्पिटलात घेऊन जाण्यासाठी एक बस वापरण्यात आलेली होती. आता पाच च्या बस चे बुकिंग करून पुढे काय करायचे तर कोलकास रेस्टहाऊसला कडे जायचे ठरवले. तसे ह्या कोलकास गेस्टहाउन हे सेमाडोह पासून जवळच पण जंगलात एका शांत जागी सिपना नदीच्या किनारी आहे. इथून नदीचा व्हयू खूपच छान आहे, आणि नदीत पाणी प्यायला येणारे वाघ ह्या जागेहून बघता येतात. ह्या गेस्टहाउस मध्ये इंदिरा गांधी सुद्धा थांबल्या होत्या हि माहिती इथल्याचं गार्डने दिलेली आहे. हा तर आम्हाला सेमाडोह इथून जंगल सफारी मध्ये जागा न मिळाल्यामुळे कोलकास कडे जाताना रस्त्यात एका डोंगरावर गव्याचा कळप लागला... आम्ही गाडी थांबवून साधारणता त्या कळपापासून सेफ अंतरावर राहून पाहत होतोच. जिथे गवा असतात त्याचा आसपास नेहमी वाघ असू शकतो अशी माहिती स्थानिकांनी आम्हाला दिलेली होती. नेहमी प्रमाणे वाघाचे दर्शन न झाल्यामुळे पुढे जाण्यासाठी आम्ही निघालो दोन वळणे पुढे गेलो तोच काहीतरी रस्त्यावर असल्याची जाणीव झाली. परत एकदा रस्त्यावर दर्शन देणारा तो एक वाघ होता. साधारण पाने रो वाघ तरून असावा... गाडीची चाहूल लागताच वाघाने पटकन दरी कडे धाव घेतली. हे सगळे घडले असेल साधारण अर्धा मिनिटभरता. पण ते दर्शनही सुखावणारे होते. सेमाडोह ला परत आल्या आल्या आम्ही त्या फॉरेस्ट ऑफिसरचे आभार मानले.

आज पर्यंत व्याघ्रदर्शनाचा सगळ्यात चांगला आलेला अनुभव हा कान्हा नॅशनल पार्क (मध्य प्रदेश) मधला. आम्ही ज्यावेळेस गेलो होतो तेव्हाच ह्या टायगर प्रोजेक्ट मधल्या वाघांची संख्या १००+ होती. इथे जाऊन व्याघ्र दर्शन न घेता परत येणे म्हणजे दुर्दैवच. ह्या जंगलात तिथेच कुठे तरी एक म्युझियम आहे. सफारीला जाण्याआधी ह्या म्युझियम ला भेट दिली होती. त्यात एक आवाजासहित वाघाच्या शिकारीचे मॉडेल होते. अतिशय व्यवस्थित रित्या वाघाच्या शिकारीच्या वेळेस कसे बदल घडतात हे दाखवून दिलेले होते. तर ह्या जंगलात आमची सफर झाली ते एका ओपन रुफ जिप्सी मधून. जाळी नाही काही नाही तसेच तुम्ही जंगलाचा आनंद घेऊ शकता. जंगलातून जाणारी फक्त एक जीपवाट. आमच्या सफारीत आम्हाला बिबट्याचे पिले आधी दिसले होते पण बिबट्या किंवा वाघाचे दर्शन नव्हतेच. त्यातच समोरून येणाऱ्या जीपच्या ड्रायव्हरने आमच्या ड्रायव्हरला ह्या भागात वाघ दिसल्याची बातमी सांगितली. खरे तर त्या जीपच्या मागे मागे वाघ पाच दहा मिनिटे जीप वाटेवरून चालला असे काहीसे त्या जीप मधल्या लोकांनी सांगितले. आमची तर सफारी संपत आलेली पण आमच्या जीप ड्रायव्हरने आम्हाला वाघ दाखवायचे ठरवलेलेच होते. तडक जिप्सी वाघ दिसलेल्या भागा कडे वळवली. साधारणता एका जागी आल्यानंतर त्याने सगळ्यांना शांत राहिला सांगितले आणि उभे राहून तो इकडे तिकडे पाहू लागला. उजव्या बाजूला एक काळविटाचा कळप दिसत होता. त्यामुळे वाघ तिकडेच असण्याची शक्यता होती. सगळी कडे एक वेगळ्याच प्रकारची शांतता होती. अगदी त्या मॉडेल मध्ये दाखवल्या प्रमाणे माकडे झाडावर चढून एक वेगळाच आवाज काढून इतर प्राण्यांना सावध करत होती. आणि त्या काळविटाच्या कळपा मध्ये तर हलकल्लोळ माजला होता... कोण कुठे पळतंय कळत नव्हते. हे सगळे घडत होते ते आमच्या पासून १०० फुटावर. अगदी कातरवेळ का काय तसे वातावरण.. त्यातच गवतामागून काही तरी हालचाल जाणवली.. काळविटाचा कळप आधीच पांगायला लागला होता.. आणि अचानक त्याने मागे राहिलेल्या काळविटावर झडप मारली. आजही तो सीन डोळ्यापुढे घडला असेच वाटते. काही क्षणाचा रोमांच पण वाघाची शिकार अनुभवायला मिळाली. त्यानंतर बराच वेळ आम्ही तिथेच थांबलो गवतातून तो बाहेर पडेल म्हणून. अगदी काळविटाचा कळप परत त्या जागी आला जणू पंचनामा करण्यासाठीच. पण तो काही दिसला नाही. शेवटी वाघाच्या शिकारीचा अनुभव घेऊन आम्ही परतलो.

जाता जाता वाघाला वाचवणे गरजेचे आहे हे पटते पण त्यासाठी कोणता मार्ग योग्य ते कळत नाही. सुरवातीला लिहिलेल्या प्रोजेक्ट बद्दल अधिक माहिती इथे मिळेल. पण ह्यात वाघांची भारतातील संख्या १४११ सांगण्यात आलेली आहे. पण त्यासाठी जो माहितीचा स्रोत म्हणून देण्यात आला आहे.


ह्यानुसार भारतात २००० साली वाघांची संख्या ३६४२ होती. जर १० वर्ष ती अर्ध्यावर आली असेल तर व्याघ्र प्रकल्पांचा उपयोग काय??? ह्यावर त्या प्रोजेक्ट वाल्यांकडून अधिक माहिती मागवली आहे. पण ह्या प्राण्याला माझ्या पुढच्या पिंढ्यांनाही।यांनाही जंगलात पाहता यावे ही इच्छा आहेच.

झोप!!!

आज सकाळी नेहमी प्रमाणे अलार्म पुढे ढकलत ढकलत ७. ३० ला कसे बसे उठलो... आरामात आवरले आणि ऑफिसला यायला निघालो... ऑफिसला पोहचायला साधारण दोन स्टॉप चे अंतर राहिले असेल तोच मला एक जांभई आली. झोपेतून उठून साधारण दोन तास झाले नव्हते तरीही मला परत झोप येण्याची चिन्हे!!! मग थोडे आठवायचा प्रयत्न केला साधारणता रात्री कधी झोपलो असेल ते!!! काल रात्री तर साडे अकरा पर्यंत झोप लागली होती. म्हणजे साधारण ८ तासाची झोप मिळाली असेल. मग तरीही मला जागे होवून दोनच तास झाले असताना परत का झोप येत असावी??? बरे उठल्यावर मस्त गरम पाण्याने अंघोळ आणि एक कप चहा झालेला होता.... तरीही साधारण हे सगळे झाल्यानंतर अर्ध्यापाऊण तासातच झोप यायला लागली!!! असे आज काल वारंवार होत आहे खरे... बरेच वेळा एखाद्या ग्रुप मध्ये बसले असताना जांभई देणे सभ्यतेच्या शिष्टाचाराला धरून नाही.. मग काय कारण असावे??? एम आय डिप्राईव्हड ऑफ स्लीप????
असेच बसल्या बसल्या मग गुगल सर्च सुरू झाले. स्लीप ह्या विषयावर मराठीतून माहिती शोधायचा प्रयत्न केला, विकिपीडियावर एकच वाक्य सापडले.. "प्राण्यांमधील नैसर्गिक विश्रांतीची अवस्था. जगण्यासाठी नियमित झोपेची गरज असते." आपण का झोपतो हे पाहता असताना ह्या सापडला. ह्यानुसार आपण का झोपतो ह्याचे सुयोग्य कारण कोणालाही माहीत नाही पण आपल्या सामान्य क्रिया चालू राहण्यासाठी झोपेची आवश्यकता असते. तसेच झोपल्याने शरीरातली ऊर्जा वाचते हा ही एक असाच(!) समज आहे. झोपेची कमतरता असण्याचे परिणाम काय आहेत??? तर बराच काळ झोपेच्या कमतरतेने मृत्यू सुद्धा होवू शकतो. सामान्यता झोपेच्या कमतरतेमुळे अंग दुखणे, डोके दुखणे, तोंड कोरडे पडणे हे झोप येण्याचे किंवा कमी असण्याचे लक्षणे आहेत... पण सगळ्यात कॉमनली आढळणारे लक्षण म्हणजे जांभई. काही संशोधकांच्या मते जांभई देणे हे मेंदू शांत ठेवण्याचा प्रक्रियेचा भाग आहे. काही शास्त्रज्ञांनुसार जी रसायने मेंदू मध्ये भावना निर्माण करतात त्याच केमिकल मुळे जांभई येते. अजून एका मतानुसार शरीरात कार्बन डायॉक्साईड च्या कमतरते मुळे जांभई येते व त्यामुळेच शरीरात प्राणवायूचा पुरवठा केल्या जातो. ह्या दुव्यावर जांभई मेंदू चे तापमान निश्चितीकरता वापरल्या जाते ह्याचा निश्चितीसाठी केलेल्या प्रयोगाचे निरीक्षणे आहेत.

हे सगळे वाचूनही मला माझ्या झोप येण्याचे किंवा जांभई का येते त्याचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही. ह्यामुळेच ह्या दुव्यावर जाऊन मी माझी झोप माझ्या शरीराच्या गरजेनुरुप आहे का नाही हे तपासून घ्यायचा प्रयत्न केला. त्या नुसार मी जितक्या वेळ झोपतो तितकी जेमतेम गरजेपुरती आहे. दुपारी जर १५ मिनिटे झोपलो तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आता हे तर काही शक्य नाही म्हणून अजून नवीन कारणे आणि नवीन उपाय शोधायला जातोय..

(हा लेख लिहायचा उद्देश माझी झोप उडवणे व तुम्हाला झोप यायला लावणे असा काहीसा होता.. पहिला भाग तर सफल झालाय पुढचे बघूयात)

वावटळ

आज नेहमी प्रमाणे एक प्रश्न माझ्या मनात रेंगाळत आहेच... कुठे जायचे.... खरे तर ह्या प्रश्नाचे उत्तर मला माहीत नाहिये कारण निरर्थक भटकायचे म्हणूनच मी घरातून निघालेए??? आता मला खरंच कळत नाहिए का घराबाहेर पडले आहे???.... असे काय घडले आहे आज??? "आज"... आताश्या तर हे रोजचेच झाले आहे, कंटाळा आला आहे ह्या जगाचा... वाटते सगळे संपवावे!!! पण त्यातून काय हशील होणार??? का मी हे जीवन संपवावे??? त्यातून मला काय मिळणार??? त्रासातून सुटका होईल... बरे ज्यांचा कडून त्रास दिला जातोय ते कोण आहेत तर माझे सगेसोयरे... का हे लोक मला समजावून घेऊ शकत नाहीत...

लग्नाचे वय ओलांडले तरी माझे लग्न जमत नाही ह्यात माझा खरे तर काय दोष???? पण हे कोणीही समजावून घेत नाही... समाजात लग्न न करिता राहणे हे स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या मुलीला एवढे अवघड आहे का??? आज मी नवऱ्या नावाच्या प्राण्याशिवाय जगू शकते हा विश्वास नक्कीच माझ्या मध्ये आहे. पण घरचे.. त्यांनी हे समजावून घ्यायला नको का??? आईने कष्ट करत सौंसाराचा डोलारा सांभाळला... तीच्या कष्टामुळेच आज मी शिकून मोठी झाले आहे... जे काही आहे ते फक्त आणि फक्त तीच्याच मुळे.... पण आजकाल तीही विचित्र वागायला लागलेली आहे.... दिवसातून ४ वेळा फोन करून विचारते त्या मंत्राचा जप केलास का??? मंत्र कोणी दिला तिला हा??? आणि का सांगितले की ह्या मंत्राच्या पठणाने माझे लग्न जमणार आहे???? सगळे सांगतात लग्न जमण्यासाठी पोरीच्या जातीने थोडे तरी ऍडजस्ट करायला पाहिजे!!!! आहो पण किती??? आणि काय काय म्हणून??? माझ्या पेक्षा वयाने मोठा असलेला मुलगा जेव्हा तोंड वर करून मला विचारतो माझे लग्न का झाले नाही अजून??? अरे तो तर माझ्या पेक्षा वयाने पाच दहा वर्ष मोठा आहे??? त्याचे का नाही जमले लग्न??? त्याचा का कोणी असे हात धुऊन मागत नाही???? कॉंम्प्रमाईज करायचे पण किती आपल्या पेक्षा अर्ध्या पगाराच्या माणसाशी मी का म्हणून लग्न करायचे??? हे असेच ह्या समोरून येणाऱ्या रहदारी मध्ये चालत जावे आणि सगळे संपवावे....

खरेच इतके कठीण आहे का मला समजावून घेणे... माझ्या अपेक्षा फार माफक होत्या... सुरवातीला ह्या सगळ्या प्रकाराला मी पण न कंटाळता पुढे जात होतेच... एक नवरा नावाचा हक्काचा खांदा मिळावा हे माझे पण स्वप्न होतेच ना... इतर मुलींसारखे मी पण ती कांदेपोह्यांची प्लेट थरथरत्या हाताने पाहुण्यांना दिलेली आहे.... पण जसे जसे आयुष्य पुढे सरकत गेले तसे माझे मन ह्या गोष्टीतून उठत गेले.... कशासाठी दरवेळेस एका नवीन मुलासमोर नटून थटून उभे राहावे???? बरे ते करायची तयारी ठेवली तरी समाज शांत बसू देतो का??? घरचे तर चिंते पोटी बोलतात..... पण ज्यांचा काही संमंध नाही असे लोक पण लग्न का होत नाही ह्याचा जाब मला विचारतात... ऑफिसात.. मैत्रिणीचा घरी... गल्लीत... नातेवाईकांमधे नेहमी एकच प्रश्न लग्न कधी करणार???? एकदाचे मोकळे व्हावे ह्यातून... कुणीच नाहिए का ह्या जगात माझे जे मला समजावून घेईल??? माझ्या मैत्रिणी सुद्धा मला ह्यांवरून छेडतात... काहींना खरी चिंता तर काहींचा ढोंगी पणा.... शेवटी आता चालताना लक्षात येत आहे ती एकच गोष्ट

"My shadow is the only thing that wals beside me
my shallo hearts is the only thing thats beating"

कुठवर चालत आलेली आहे मी..... किती वेळ झाला असेल??? का चालत आहोत आपण??? जीव देण्याची हिंमत आहे का आपल्यात??? खरे तर जीव देणे हे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही हे मान्य पण ह्या संधिप्रकाशातून मी अंधकाराकडे जात आहे पण... हे काय होतंय... माझ्या आजूबाजूला एवढी गाड्यांची गर्दी का आहे??? अरे बापरे!!! मी रस्त्याच्या मधून चालतेय!!!! आणि हे लाइट्स कसले??? ती बस माझ्या कडे का झेपावत आहे... आईssss!!!!... हे काय होत आहे??? कोण मला खेचते आहे??? कोण हा मुलगा?? माझ्या डोळ्या पुढे अंधारी का येत आहे??? ....

(एकविसाव्या शतकात सुद्धा परिस्थिती फारशी बदललेली नाहिए.... अश्या घटना बरेच वेळा घडतात. )